Corona Virus : ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शोध कसा लागला?

वुहानमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा सापडलेल्या नॉव्हेल कोरोनाव्हायरसपासून आतापर्यंत SARS-COV-2 ची अनेक म्युटेशन्स झाली. यातलं सर्वांत नवीन म्हणजे ओमिक्रॉन.
कोरोनाच्या म्युटेशन्सचं दोन गटांत वर्गीकरण केलेलं आहे. जे काळजी करण्यासारखे आहेत त्यांना व्हेरियंट ऑफ कन्सर्न (VOC) म्हणतात. काही लक्ष ठेवण्यासारखे आहेत ज्यांना व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट (VOI) म्हणतात.
व्हेरियंट ऑफ कन्सर्नमधला पाचवा आणि सगळ्यांत नवीन व्हेरियंट म्हणजे ओमिक्रॉन.
ओमिक्रॉनमध्ये 50 म्युटेशन्स आहेत. यातली 32 ही त्याच्या खिळ्यांवर म्हणजे स्पाईक प्रोटीनवर आहेत. 10 म्युटेशन्स त्याच्या त्या भागांवर आहेत जो आपल्या पेशींशी थेट संपर्क करतो. याला 'रिसेप्टर बाईंडिंग डोमेन' असं म्हणतात.
आणखीही काही म्युटेशन्स इतरत्र आहेत. जगात सर्वाधिक पसरलेला आणि ज्याला आपण सगळ्यात गंभीर मानत होतो त्या डेल्टा व्हेरियंटच्या याच भागात फक्त 2 म्युटेशन्स होती. त्यामुळे ओमिक्रॉन जास्त संसर्गक्षम आहे अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे.
या व्हेरियंटचा शोध कसा आणि कुणी लावला?
सगळ्या जगाला काळजीत टाकणाऱ्या या कोरोना व्हायरसच्या या नव्या व्हेरिएंटचा शोध कसा लागला आणि कोणी लावला?
ओमिक्रॉनचा उदय आणि सुरुवातीचा प्रसार आफ्रिकेत झालेला दिसतोय. याची माहिती सर्वांत आधी दक्षिण आफ्रिकेने WHO ला दिली. द. आफ्रिकेच्या गाउटेंग प्रांतातल्या जवळपास 90 टक्के केसेस याच व्हेरियंटच्या असू शकतात असा एक अंदाज आहे.

आफ्रिकेत बोत्सवाना, नामिबिया, लेसोथो, झिम्बाब्वे या देशांमध्येही या केसेस सापडल्या आहेत. युरोपात युके, बेल्जियम, जर्मनी, चेक रिपब्लिक, इटली नेदरलँड्समध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेत.
दक्षिण आफ्रिकेच्या डॉ. अँजेलिक कोइटझी यांना कोरोना व्हायरसचा हा नवा व्हेरिएंट लक्षात आला.
दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरिया या शहरात डॉ. अँजेलिक जनरल फिजिशियन म्हणून काम करतात. त्या साउथ आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत तसंच दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य मंत्रालयाच्या सल्लागार म्हणूनही काम करतात.
हा नवा व्हेरिएंट त्यांच्याच निदर्शनास पहिल्यांदा आला.
'30 वर्षांचा रुग्ण माझ्याकडे आला...'
डॉ. अँजेलिक कोइटझी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं की, "माझ्याकडे तिशीचा एक पेशंट आला. मला म्हणाला की गेले दोन दिवस मला प्रचंड थकवा येतोय, माझं अंग दुखतंय आणि डोकंही दुखतंय. आता त्याच्या लक्षणांचं हे वर्णन तसं अर्धवटच होतं."
त्या पुढे म्हणतात, "त्याला खोकला येत नव्हता. त्याची चव आणि वास घेण्याची क्षमता गेली नव्हती. पण तरीही त्या व्यक्तीला जाणवत असणारी लक्षणं जाणवायला नको असं मला वाटलं. म्हणून आम्ही त्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातले सगळे लोक पॉझिटीव्ह होते.
पण या सगळ्यांची कोव्हिडची लक्षणं अतिसौम्य होती असंही त्या म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
"मग त्या दिवसभरात असे अनेक पेशंट आले ज्यांना थकवा होता, अंग दुखत होतं आणि पहिल्या व्यक्तीला होती तशी लक्षणं दिसत होती. त्या सगळ्यांच्या टेस्ट आम्ही केल्या आणि ते सगळे पॉझिटिव्ह आले," त्या पुढे सांगतात.
जसजशी ही वेगळी लक्षणं दिसणाऱ्या कोव्हिड पेशंटची संख्या वाढत गेली तसं डॉ. अँजेलिक कोइटझी यांनी दक्षिण आफ्रिकन सरकारच्या आरोग्य मंत्रालयाला याबद्दल कळवलं.
"मी सल्लागार समितीवर होतेच. त्यांना संपर्क करणं मला सोपं होतं. मी म्हटलं की काहीतरी गडबड आहे. मला आज जे दृश्य दिसलं आहे, ते डेल्टा व्हायरसचं जे चित्र आपल्यापुढे आहे त्यात फिट बसत नाही. हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे स्पष्ट झालं की हा एक नवा व्हेरिएंट आहे," त्या म्हणतात.
'घाबरण्याची गरज नाही पण..'
पण तरीही या व्हेरिएंटचा संसर्ग ज्यांना ज्यांना झालाय त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणं आहेत. कोणालाही दवाखान्यात दाखल करायची गरज पडली नाहीये. त्या म्हणतात, "मला आता तरी असं वाटतंय की घाबरण्याची गरज नाहीये, पण कदाचित येत्या दोन आठवड्यांनी चित्र वेगळं असेल."
कोरोनाच्या या नव्या विषाणूला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आहे. व्हायरसच्या इतर व्हेरियंटना देण्यात आलेल्या अल्फा आणि डेल्टा अशा ग्रीक नावांप्रमाणे या व्हेरियंटला Omicron - ओमिक्रॉन नाव देण्यात आलंय.
या विषाणूमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल - म्युटेशन्स झाल्याचं आढळलं आहे. विषाणूच्या बदलामध्ये अत्यंत असामान्य असे काही घटक आढळून आले आहेत. त्यामुळं इतर व्हेरीएंटच्या तुलनेत हा प्रकार अत्यंत वेगळा आहे, असं दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक तुलिओ डि ऑलिव्हिरा यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ कोइटझी यांनी भारतीय माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, "कोरोना व्हायरसची 30 हून जास्त म्युटेशन्स झाली आहेत. त्यामुळे लोक घाबरली आहेत. लोकांना काळजी वाटतेय की आपण ज्या लशी घेतल्या आहेत त्या काम करतील ना. पुन्हा आधीसारखीच गंभीर परिस्थिती होईल का? आणि आपल्या वैद्यकीय सुविधांवर आधी आला होता तसाच ताण येईल का? मी सध्यापुरतं हे सांगू शकते की आता सापडणाऱ्या पेशंटची लक्षणं सौम्य आहेत. यातले बहुतांश लोक हे तरूण, चाळीशीच्या आतले आहेत. उद्या हीच परिस्थिती असेल असं सांगता येत नाही."
या व्हेरिएंटमुळे लहान मुलांनाही संसर्ग झाला आहे, पण ती मुलंही गंभीररित्या आजारी पडलेली नाहीत. लस न घेतलेल्यांना आणि इतर कोमॉर्बिडी असणाऱ्या लोकांना जेव्हा या व्हेरिएंटचा संसर्ग होईल तेव्हाच आपल्याला पूर्ण माहिती मिळू शकेल असं त्या म्हणतात.
'काळजी घेणं आवश्यक'
पण हा व्हेरिएंट वेगाने पसरतोय असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे कोणीही या व्हेरिएंटला कॅज्युअली घेऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे.
कोरोनाच्या 'ओमिक्रॉन' या नव्या व्हेरियंटनं जगभर भीतीचं वातावरण निर्माण केलं असताना, भारतातही खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात झालीय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनासोबत चर्चा करून, यासंबंधी आवश्यक पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने वेगवेगळे निर्बंध लादले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








