गलवानवर भारताचाच झेंडा, मोदी सरकारमधल्या मंत्र्यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

'गलवानवर भारताचाच झेंडा आहे', असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी म्हटलं. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनीही एक फोटो प्रसिद्ध केला. तसंच नवीन वर्षाच्या निमित्तानं भारतीय जवानांनी गलवान खोऱ्यात तिरंगा फडकावल्याचं सांगितलं.

धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी एक प्रश्नही उपस्थित केला. "राहुल गांधी चिनी प्रपोगंडाचं समर्थन कोणत्या नाईलाजामुळं करतात," असं त्यांनी विचारलं. प्रधान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे एएनआय वृत्तसंस्थेच्या ट्वीटला रिट्विट केलं आहे.

ANIने त्यांच्या या ट्वीटमध्ये तिरंग्यासह भारतीय सैनिकांचे दोन फोटो पोस्ट केले आहे. "नव्या वर्षाच्या निमित्ताने गलवान खोऱ्यात भारतीय जवान", असं म्हणत हे फोटो पोस्ट केले आहे. एएनआयनं या फोटोंसाठी संरक्षण क्षेत्रातील सूत्रांना क्रेडिट दिलं आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनीही तिरंग्यासह भारतीय सैनिकांचे तीन पोटो पोस्ट केले आहेत. "नवीन वर्ष 2022 च्या निमित्तानं गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराचे शूर जवान," अशी पोस्ट त्यांनी केली.

भाजपच्या अनेक नेत्यांनीही तिरंग्यासह भारतीय सैनिकांचा फोटो पोस्ट करत, राहुल गांधींना प्रश्न विचारला आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातील गलवान खोऱ्यात चीननं झेंडा फडकावल्याच्या मुद्द्यावरून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला होता.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं, "गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच चांगला दिसतो. चीनला उत्तर द्यावं लागेल. मोदीजी, आतातरी बोला."

राहुल गांधी यांनी वर्षाच्या शेवटच्या दिवशीही एक ट्वीट करत चीननं अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांचं नवीन नामकरण केल्याप्रकरणी मोदींवर हल्ला केला होता.

त्यादिवशी राहुल गांधींनी वर्तमानपत्रात छापून आलेला एक लेख शेअर करत ट्विटमध्ये म्हटलं, "काही दिवसांपूर्वी आपण 1971च्या युद्धात कसा विजय मिळवला, याविषयीचा गौरव दिन साजरा करत होतो. देशाच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णयांची गरज असते. पोकळ जुमल्यांनी विजय मिळत नसतो."

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्यावरून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवदेन प्रसिद्ध करत विरोध केला होता. चीननं यापूर्वीही असे प्रयत्न केले आहेत, पण यामुळे सत्य परिस्थिती बदलत नाही, असं या निवदेनात म्हटलं होतं.

पण, गलवान खोऱ्यात झेंडा फडकावण्याच्या घटनेविषयी भारत सरकारनं अद्याप काहीही म्हटलेलं नाहीये.

गलवानमध्ये चिनी झेंडा

चीनच्या सत्ताधारी पक्षाचं मुखपत्र ग्लोबल टाईम्सनं 1 जानेवारीला एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ज्यात म्हटलंय की, गलवान खोऱ्यात चीनचा झेंडा फडकावण्यात आला आहे.

या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, "नवीन वर्ष 2022च्या पहिल्या दिवशी देशभरात चीनचा 5 ताऱ्यांचा (स्टार) लाल झेंडा फडकावण्यात आला. यात हाँगकाँगचं विशेष प्रशासित क्षेत्र आणि गलवान खोऱ्याचा समावेश होता."

या रिपोर्टनुसार, वर्तमानपत्राला एक व्हीडिओ पाठवण्यात आलाय. ज्यात दिसतंय की, भारताच्या सीमेवरील गलवान जवळील एका टेकडीवर "एक इंच भी जमीन नहीं छोड़ो" या घोषवाक्यासमोर उभं राहून चिनी सैनिक चीनच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.

या व्हीडिओत आमच्या सीमांचं रक्षण करू, असा दावा मातृभूमीला करतोय, असं चिनी सैनिक जोशाने म्हणत आहेत.

ग्लोबल टाईम्सनुसार, यानंतर एका ड्रोनचा वापर करून चीनचा झेंडा वरती नेण्यात आला. त्याठिकाणी ट्रेनिंग करत असलेल्या चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या सैनिकांनी त्याला सलामी दिली आणि देशाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

ग्लोबल टाईम्सनं यानंतर दोन ट्वीट केले आहेत. ज्यात भारतीय माध्यमांचा हवाला देत म्हटलं आहे की, नवीन वर्षाच्या निमित्तानं वास्तविक नियंत्रण रेषा एलएसीवर भारत आणि चीनच्या सैनिकांनी शुभेच्छा दिल्या आणि मिठाईचं वाटप केलं. यात संघर्षग्रस्त लडाखच्या पूर्वेकडील भागांचाही समावेश आहे.

जरं हे सत्य असेल तर ऑक्टोबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये कमांडर स्तरावर जी चर्चा झाली, त्याकडे सकारात्मकपणे पाहायला हवं, असं ग्लोबल टाईम्सनं पुढे म्हटलंय.

वृत्तसंस्था पीटीआयनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं होतं की, नवीन वर्षाचं औचित्य साधून भारत आणि चीनच्या सैनिकांनी एलएसीवरील अनेक चौक्यांवर मिठाईचं वाटप करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यात पूर्व लडाखमधील चौक्यांचाही समावेश आहे.

दोन्ही देशांकडून हे पाऊल अशावेळी उचलण्यात आलंय, जेव्हा दोन्ही देशांमध्ये गेल्या दीड वर्षापासून अनेक जागांवर संघर्षमय स्थिती आहे.

गेल्या वर्षी 5 मे रोजी लडाखच्या पूर्वेकडील पेंगॉन्ग लेक परिसरात दोन्ही देशांच्या सैन्यांत हिंसक संघर्ष झाला होता. त्यानंतर दोन्ही देशाच्या सैन्यानं या परिसरात मोठ्या प्रमाणतात सैन्य तैनात केलं होतं.

गलवान संघर्ष

भारत आणि चीनच्या सीमेवर 2020च्या 15 आणि 16 जूनला दोन्ही देशांच्या जवानांमध्ये संघर्ष झाला. यात 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला. तर यात 4 जवानांचा मृत्यू झाल्याचं चीननं नंतर स्पष्ट केलं होतं.

भारत आणि चीन या दोन्ही देशांनी या घटनेसाठी एकमेकांना जबाबदार ठरवलं होतं.

गलवान खोरं अक्साई चीनमध्ये येतं. गलवान खोरं लडाख आणि अक्साई चीनच्या मधे भारत-चीन सीमेजवळ आहे. या भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अक्साई चीनला भारतापासून वेगळं करते.

भारत आणि चीनदरम्यान जवळपास 3440 किलोमीटर लांबीची सीमा आहे. पण, 1962च्या युद्धापासून या सीमेवरील बहुतांश भाग स्पष्ट नाहीये आणि दोन्ही देश याविषयी वेगवेगळे दावे करत आले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)