You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत - चीन सीमा वाद : गलवान झटापटीच्या वर्षभरानंतरही परिस्थितीत फरक नाही
- Author, एथिराजन अनबारासन
- Role, बीबीसी न्यूज, पँगाँग त्सो, लडाख
भारत आणि चीनच्या सीमाभागात असणाऱ्या ब्लॅक टॉप पहाडावरून चढ उतार करून भारतीय लष्कराला साहित्य पुरवण्यात नवांग दोर्जी यांचे अनेक महिने गेले.
62 वर्षांच्या नवांग दोर्जींचं मेराक गावामध्ये किराणा मालाचं लहानसं दुकान आहे. दारुगोळा आणि इतर गरजेचं सामान कडेकपाऱ्यांमधून शिखरापर्यंत वाहून नेताना त्यांना अनेकदा जीव जाण्याची भीती वाटली.
गेल्या वर्षी या दोन देशांमधला सीमाभागातला तणाव वाढल्यानंतर या परिसरातल्या गावांमधल्या दोर्जींसारख्या शेकडो जणांना कामावर घेण्यात आलं.
"आम्ही चिनी सैनिकांच्या अगदी जवळ आलो होतो, आम्हाला वाटलं आता ते आमच्यावर हल्ला करणार," ते सांगतात.
लडाखमध्ये आपल्या प्रदेशामध्ये घुसखोरी केल्याचे आरोप भारत आणि चीनने वर्षभरापूर्वी एकमेकांवर केले. प्रत्यक्षात साधारण 3,440 किलोमीटर्स लांबीच्या सीमेबद्दल 1962च्या युद्धापासून वाद सुरू असून दोन्ही देशांचं स्वतःच्या सीमेबद्दल वेगवेगळं मत आहे.
चिनी सैन्याने तंबू ठोकले, खंदक खोदले आणि भारतीय भूभाग मानल्या जाणाऱ्या परिसरात अनेक किलोमीटर आता अवजड वाहनं आणि उपकरणं आणली आणि त्यानंतर हा वाद सुरू झाल्याचं भारतीय माध्यमांनी म्हटलंय.
भारतीय लष्कर बेसावध असताना चीनी बाजूने अचानक केलेल्या या हालचालीला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने हजारोंची कुमक आणि अधिकची शस्त्रात्रं लडाखमध्ये आणली. जूनमध्ये या तणावाचं पर्यावसान गलवान खोऱ्यातल्या हिंसक झटापटीत झालं आणि यात 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला. या झटापटीत आपले 4 सैनिक मारले गेल्याचं नंतर चीनने म्हटलं.
यानंतर या पँगाँग त्सो तलावापाशी जाणं कठीण झालंय. पर्यटकांना या भागात जाण्याची परवानगी जानेवारीमध्ये देण्यात आली. तर या परिसरातल्या मेराक गावापर्यंत जाण्याची परवानगी ज्या मोजक्या माध्यमांना देण्यात आली त्यापैकी बीबीसी एक आहे. या गावाची लोकसंख्या साधारण 350 आहे.
त्यापैकी अनेक भटक्या जमातींचे आहेत. पण इथलं आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. पारंपरिक वेशातल्या महिला याक आणि पश्मिना जातीच्या मेंढ्यांची राखण करतात. या गावावर कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही.
पण या नजरेला सुखावणाऱ्या दृश्यावरच्या सततच्या टांगत्या तलवारीची आठवण करून देणाऱ्या गोष्टीही दिसत राहतात. पुरवठ्याचं सामान आणि सैनिकांना घेऊन जाणारे सैन्याचे ट्रक आणि वाहनं आता या लहानशा रस्त्यावरून सतत जाताना दिसतात.
भारत आणि चीनमध्ये असणाऱ्या तणावाचं सावट गेली अनेक दशकं या भागावर आहे.
"हिवाळ्यामध्ये इथले लोक आणि जवळच्या चुशुल भागातले लोक याक आणि मेंढ्या घेऊन पलीकडच्या डोंगरांवर चरायला न्यायचे. पण गेल्या काही वर्षांमध्ये चीनने भारताचा भाग ताब्यात घेतला आणि प्राण्यांसाठीची कुरणं कमी झाली," दोर्जी सांगतात.
गेल्या वर्षी सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीचे पडसादही इथे अजूनही जाणवतात.
"गेल्या वर्षी सीमेवर झालेल्या झटापटीमुळे भारत - चीन द्वीपक्षीय संबंध मोठ्या प्रमाणात बदलले," भारतीय सैन्याविषयीचे जाणकार अजय शुक्ला सांगतात. ते पूर्वी लष्करात कर्नल होते.
"पूर्वी 1959मध्ये चीनने दावा करताना मांडलेली सीमारेषा चीनने पुन्हा एकदा मांडली आहे. भारताने जर ती स्वीकारली तर एक मोठा भूभाग हातून जाईल," ते सांगतात.
शुक्ला आणि इतर अनेक तज्ज्ञांच्या मते, चीनने पूर्व लडाखमध्ये शेकडो चौरस किलोमीटर पुढे येणं म्हणजे भारत जी जमीन स्वतःची सांगतो, ती चीनच्या ताब्यात जाणं.
चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही बाजूंच्या सैन्याने पँगाँग त्सो तलावाभोवतीच्या पर्वतांमधून आपापलं सैन्य माघारी घ्यायची तयारी दाखवली. पण क्याम (गरम पाण्याचे झरे असणारा भाग), गोग्रा पोस्ट आणि देस्पांग पठार या लडाखच्या भागामधून माघार घेण्याची कोणतीही चिन्हं चीनने दाखवलेली नाहीत.
लडाखच्या आणखी पूर्वेला असणाऱ्या अक्साई चीन पठारावर आधीपासूनच चीनचा ताबा आहे. या भागावर भारताने दावा केला असला तरी धोरणात्मकदृष्ट्या हा भाग बीजिंगसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण इथे शिनजियांग प्रांत थेट पश्चिम तिबेटशी जोडला गेलेला आहे. भारताच्या चिथावणीखोर कारवायांमुळेच लडाखमध्ये सध्याची तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा चीनने सातत्याने केलाय.
"चीनचं असं म्हणणं आहे, की त्यांच्या सीमेमध्ये येणाऱ्या लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारतीय सैनिकांनी रस्ते बांधले आणि इतर पायाभूत सुविधा उभारल्या," चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमधून निवृत्त झालेल्या सीनियर कर्नल झोऊ बो यांनी बीबीसीला सांगितलं.
"पारंपरिक सरहद्दीला चीन-भारत सीमा मानण्यात यावं, असं आमचं चीनी बाजूचं म्हणणं आहे. तर 1962 च्या युद्धापूर्वीची प्रत्यक्ष सीमारेषा (लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल) मानण्यात यावी, असं भारताचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षामध्ये ही लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल कुठे आहे यावरून मूळ मतभेद आहेत."
पण या तणावामुळे या डोंगररांगातल्या पँगाँग त्सो तलावाच्या भागातल्या गावकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः काही भागातून सैन्य काढून घेण्याचं दिल्लीने मान्य केल्यानंतर या अडचणी वाढल्या आहेत.
"हिवाळ्याच्या काळात आम्ही ज्या कुरणांमध्ये गुरं चरायला न्यायचो तिथे ती नेण्याची परवानगी भारतीय लष्कर देत नाहीये," चुशुल या सीमेवरच्या गावाच्या पंचायतीचे प्रतिनिधी कॉनचॉक स्टाझिन सांगतात.
थंडीच्या काळामध्ये गुरांना ब्लॅक टॉप आणि गुरुंग हिल परिसरातल्या ठिकाणी चरायला नेणं गरजेचं असल्याचं स्टाझिन सांगतात.
"हे भटके मेंढपाळ जाऊन त्या डोंगरांमध्ये गुरांसाठी तंबू आणि गोठे उभारतात तेव्हा त्यातून खुणा निर्माण होतात. सीमेबद्दलच्या वाटाघाटी करताना या खुणा महत्त्वाच्या ठरतात. जर मेंढपाळांना त्यांच्या पारंपरिक ठिकाणी गुरं चरायला नेण्यापासून थांबवण्यात आलं, तर पुढचा विचार करता हा निर्णय तोट्याचा ठरेल, " ते सांगतात.
स्टाझिन यांना उत्तर देताना भारतीय लष्कराने एप्रिल महिन्यात म्हटलं होतं, "लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलची नेमकी आखणी करण्यात आलेली नसल्याने त्याचा नागरिकांकडून चुकीचा अर्थ लावला जातो. पूर्व लडाखमधल्या सध्याच्या परिस्थितीमुळे मेंढपाळांना त्यांच्या गुरांचा वावर मर्यादित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे."
भारताला कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा दुसरा भीषण तडाखा बसल्यानंतर या सीमेवरच्या तणावाविषयीच्या बातम्या माध्यमांमध्ये फारशा दिसत नाहीत. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भविष्यात या मुद्दाचा त्रास होण्याची शक्यता असल्याचं जाणकार सांगतात.
अशा प्रकारची कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचं नरेंद्र मोदींनी त्यावेळी म्हटलं होतं आणि संरक्षण क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांनी याविषयी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यानंतर परिस्थितीत फारसा फरक पडला नसल्याचं शुक्ला सांगतात.
"चीनच्या ताब्यामध्ये आपला कोणताही भूभाग गेला नसल्याचं भारतातलं राजकीय नेतृत्त्वं भासवतंय. सरकारला त्यांचं अपयश लपवायचंय. पण आपण भूभाग गमावलेलाच नाही असं भासवत राहिले, तर तो परत मागून कसा घेणार?" ते म्हणतात.
लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत चीन आपल्यापेक्षा प्रबळ असल्याची जाणीव भारताला आणि त्यासोबतच चीन हा भारताचा एक मोठा व्यापारी सहकारी आहे. चीनकडून होणारी आयात आणि गुंतवणूक यांच्याशिवाय भारतातल्या अनेक उद्योगांना अस्तित्त्वं टिकवणं कठीण जाईल.
कोव्हिडच्या लाटेचा तडाखा बसलेल्या भारताकडून सध्या जीवनावश्यक वैद्यकीय उपकरणं आणि वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची उपकरणं चीनकडून आयात केली जात आहेत.
म्हणूनच दोन्ही देशांनी सध्याच्या तणावाच्या भूमिका सोडून देत सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यावर भर द्यावा असं आवाहन करण्यात येत आहे.
"दोन्ही देशांतल्या संबंधांबद्दलचा हा अतिशय महत्त्वाचा निर्णय नसला तरी हा निर्णय महत्त्वाचं वळण देऊ शकतो," झोऊ सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)