सत्यपाल मलिक : पुलवामावरून नरेंद्र मोदींवर आरोप करणारे सत्यपाल मलिक कोण आहेत?

जम्मू-काश्मीरमध्ये 2019 साली घडलेल्या पुलवामा हल्ला प्रकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी अनेक सनसनाटी दावे केले आहेत.

2019 साली काश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या (CRPF) ताफ्यावर झालेला हल्ला हा यंत्रणेची निष्क्रियता आणि निष्काळजीपणाचा परिणाम होता, असा आरोप मलिक यांनी केला.

भ्रष्टाचाराप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित 'झीरो टॉलरन्स' धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मलिक म्हणाले, "पंतप्रधानांना भ्रष्टाचाराबद्दल काहीएक अडचण नाही."

सत्यपाल मलिक यांच्या आरोपानंतर सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. अनेक जण या मुद्द्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुलाखतीचे व्हीडिओ ट्विट करत आहेत.

'मोदींनी शांत राहण्यास सांगितलं'

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिम कॉर्बेट पार्कमधून फोन केला. तेव्हा आपण या मुद्द्यांबद्दल बोललो पण पंतप्रधानांनी मला शांत राहायला सांगितलं, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.

हीच गोष्ट एनएसए अजित डोभाल यांनीही सांगितल्याचं मलिक म्हणाले.

या मुलाखतीत मलिक म्हणाले, तेव्हाच या सरकारला हल्ल्याचं खापर पाकिस्तानवर फोडून त्याचा निवडणुकीत लाभ घेण्याचा हेतू असल्याचं आपल्याला समजलं होतं.

मलिक यांनी या हल्ल्याला गुप्तचर यंत्रणांचं अपयशही जबाबदार असल्याचं सांगितलं. पाकिस्तानातून 300 किलो आरडीएक्स एखाद्या ट्रकने येतं आणि ते जम्मू-काश्मीरमध्ये 10 ते 15 दिवस फिरत राहातं तरीही गुप्तचर यंत्रणांना समजलं नाही असा दावा त्यांनी केला.

सत्यपाल मलिक यांनी भाजपा नेता राम माधव यांच्यावर केलेला आरोप पुन्हा एकदा केला.

ते म्हणाले, राम माधव यांचा एकेदिवशी सकाळी सात वाजता फोन आला आणि पनबिजली योजना आणि रिलायन्सची एक विमा योजनेला मंजुरी दिली तर त्यांना 300 कोटी मिळू शकतात असं ते म्हणाले.

हा प्रस्ताव आपण नाकारला आणि अयोग्य काम करणार नाही असं राम माधव यांना सांगितल्याचं मलिक सांगतात.

पंतप्रधान मोदी जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत अनभिज्ञ होते असं सांगत त्यांना या राज्याबद्दल चुकीची माहिती मिळते असं सांगितलं. या राज्याचा विशेष दर्जा रद्द करणं ही एक चूक अंसल्याचं मलिक संबोधतात.

मलिक यांनी नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचारावरील झिरो टॉलरन्स धोरणावर बोलताना पंतप्रधानांना भ्रष्टाचाराची फार काही घृणा वाटत नाही असं म्हटलं आहे.

मोदींना म्हटलं होतं 'अहंकारी'

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधत त्यांना 'अहंकारी' म्हटले आहे. सत्यपाल मलिक हे राज्यपाल होण्याआधी भाजपमध्ये होते. भाजपनेच त्यांना बिहार, जम्मू काश्मीर आणि मेघालय या राज्यांचे राज्यपाल बनवले आहे.

त्यांनी कृषी कायद्यावरून दुसऱ्यांदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कृषी कायदे परत घ्यावे असं ते थेट म्हणत असत. कृषी कायदे परत घेतल्यावर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.

मोदी सरकारनं तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले आहेत. मात्र, त्यावरून मोदी सरकारवरील टीका काही थांबता थांबत नाहीये.

कृषी कायद्यांच्या निमित्तानं मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला होता.

वृत्तानुसार, सत्यपाल मलिक यांनी एका कार्यक्रमात सांगितलं की, "कृषी कायद्यांच्या निमित्तानं मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो, तेव्हा ते अहंकारी वाटले."

हरियाणातील दादरीमध्ये एका सामाजिक कार्यक्रमात सत्यपाल मलिक सहभागी झाले होते. तेव्हा ते म्हणाले, "मी जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो, तेव्हा माझा पाच मिनिटं त्यांच्यासोबत वाद झाला. ते अहंकारी वाटले. जेव्हा मी त्यांना सांगितलं की, आपले 500 शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत. तर ते म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेले आहेत का?"

"मी म्हटलं, तुमच्यासाठीच तर मृत्युमुखी पडले. तुम्ही राजा बनला आहात. माझा वाद झाला. मग ते म्हणाले, तुम्ही अमित शाह यांना भेटा. मग मी अमित शाह यांना भेटलो. अमित शाह म्हणाले, सत्यपाल, तुम्ही बिनधास्त राहा. त्यांना कधी ना कधी समजेल."

यावेळी सत्यपाल मलिक यांनी MSP च्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, "आपल्याला MSP बाबत कायदेशीर हमी देण्याबाबत अजूनही त्यांची मदत हवीय. त्यामुळे असं काही करू नका की ज्यामुळे सर्व बिघडेल."

"काही मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांविरोधात प्रकरणं आहेत. सरकारनं नम्रपणे ते मागे घ्यावेत. त्याचप्रकारे MSP लाही कायद्याने हमी दिली पाहिजे," अशीही मागणी सत्यपाल मलिक यांनी केली.

सत्यपाल मलिक यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवरून अनेकदा मोदी सरकारवर टीका केलीय. नोव्हेंबरमध्ये जयपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या मागण्यांचं समर्थन करताना म्हटलं होतं की, जेव्हा कधी मी या विषयावर बोलतो, तेव्हा शंका वाटते की मला दिल्लीत बोलावलं जाईल.

अद्याप या विषयावर भाजपच्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. ती आल्यावर या ठिकाणी देण्यात येईल.

सत्यपाल मलिक कोण आहेत?

सत्यपाल मलिक हे मेघालयचे राज्यपाल आहेत. याआधी देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कृषी कायद्यावरून निशाणा साधला होता.

मेघालयचे राज्यपाल होण्याआधी मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल राहिले आहेत. त्या आधी त्यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले होते.

आज तकने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की सत्यपाल मलिक हे राम मनोहर लोहिया यांच्याकडून प्रेरणा घेऊन राजकारणात आले. मेरठ या ठिकाणी त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.

1974 मध्ये त्यांनी चौधरी चरण सिंह यांच्या भारतीय क्रांती दलाकडून निवडणूक लढवली होती. तेव्हा ते उत्तर प्रदेशाच्या विधानसभेवर निवडून गेले होते. 1980 ते 1992 या काळात ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते.

2004 मध्ये ते भाजपमध्ये आले. आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. चरण सिंह यांचे चिरंजीव अजित सिंह यांनी त्यांना पराभूत केले होते.

बिहारचे राज्यपाल होण्याआधी ते भाजपचे उपाध्यक्ष होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)