हिवाळी अधिवेशन: आवाजी मतदानावर आक्षेप असेल तर विरोधकांनी अविश्वास ठराव आणावा - अजित पवार

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"परीक्षांच्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. ज्या अधिकार्‍यांना अटक केली. त्यांना कधीपासून परीक्षा घेण्याचा अधिकार देण्यात आला? कोणत्या सरकारच्या काळात त्यांना नेमण्यात आलं? ही सर्व माहिती समोर येईल.

पोलिसांचा अहवाल आल्यानंतर दोन्ही भरतीबाबत घोळ झाला हे समोर आलं तर ती भरती रद्द केली जाईल", असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित चहापान कार्यक्रमावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सीबीआय चौकशीचा संबध येत नाही. महाराष्ट्र पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पुढचं अधिवेशन नागपुरात व्हावं यासाठी प्रयत्न

हे अधिवेशन कायम नागपूरला होतं, आम्हीही त्यासाठी आग्रही होतो. पण मुख्यमंत्र्यांना प्रवासाची बंधनं आहेत म्हणून हे अधिवेशन मुंबईत होतंय.

पण पुढचं अधिवेशन हे नागपुरात व्हावं यासाठी आम्ही आणि आमचे विदर्भातील आमदार आग्रही आहेत. तसा विचार आम्ही करू. शुक्रवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक होऊन अधिवेशन किती वाढवायचं हे ठरेल, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सरकार तयार

विदेशी मद्यावरचा कर 300% होता. इतर कुठल्याही राज्यात इतका कर नव्हता. त्यामुळे आम्ही हा कर कमी करण्याचा निर्णय घेतला. 5 विधेयकं या अधिवेशनात येतील.

त्यामध्ये शक्ती कायदा, कृषी कायद्यांसंदर्भातील 3 विधेयकं मागे घेतली जातील. इतर विभागाची काही विधेयकं आहेत.

12 आमदारांचंच निलंबन व्हावं हा योगायोग

आमदारांचं निलंबन कुठलाही विषय डोळ्यासमोर ठेवून केलं नव्हतं. त्यावेळी जी परिस्थिती सभागृहात ज्यांनी पाहिली त्यानुसार तो निर्णय घेतला गेला.

काहींचा समज होता की, राज्यपाल 12 आमदारांना परवानगी देत नाहीत म्हणून आम्ही 12 आमदार निलंबित केले. पण तसं नाहीये. तो योगायोग होता, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

राज्यपालांचे अधिकार कायम

कुलगुरूंच्या अधिकाराबाबत काहीतरी वेगळे चित्र दाखवलं गेलं. राज्यपालांकडेच नावं जाणार आहेत. त्यात राज्यपालांचे कोणतेही अधिकार कमी होणार नाहीत.

ओबीसींच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेही अनेकदा सहभागी झालेले आहेत. त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. याबाबत काही विस्तृत भूमिका अधिवेशनात आम्ही मांडू असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे

"मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे. आज त्यांनी वर्षावर बैठक घेतली. उद्या त्यांनी 9 वाजता सत्ताधारी विधीमंडळाच्या सदस्यांची बैठक लावली आहे.

मुख्यमंत्री कॅबिनेट घेतात, कोरोनाच्या आढावा बैठका घेतात. अनेक विषय मंजूर केले जातात. अध्यक्षांची निवडणूक या अधिवेशनात होणार हे मागेच सांगितलं होतं. त्यांना आवाजी मतदानावर आक्षेप असेल तर त्यांना अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार विरोधकांना आहे", असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

विरोधी पक्षाचा चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार

भाजपची महाराष्ट्र विधीमंडळ गटाची बैठक आज ( 21 डिसेंबरला) पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला केला. अधिवेशनापूर्वीच्या चहापानावर फडणवीस यांनी बहिष्कार टाकल्याचं स्पष्ट केलं.

ठाकरे सरकारला 170 आमदारांचा पाठिंबा नाही असं देखील ते म्हणाले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली.

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बंगळुरूतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमान प्रकरणावर भाष्य केलं. फडणवीसांनी बंगळुरूतील घटनेचा निषेध केला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांना या प्रकरणावर विचारण्यात आलं.

फडणवीस म्हणाले, "कर्नाटकमध्ये जो अवमान झाला, तो कर्नाटकात होवो किंवा कुठेही होवो, महाराजांचा अवमान सहन केला जाणारच नाही."

"त्यासंदर्भात कर्नाटक सरकारनंही स्पष्ट भूमिका मांडली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासह त्यांचं विधान कसं ट्विस्ट करण्यात आलं, हे दाखवलंय. ते म्हणालेत की, छत्रपती शिवाजी महाराज असो वा तिथले एक महनीय व्यक्ती आहेत, त्यांच्या पुतळ्याला इजा पोहोचवण्यात आली. अशाप्रकारचं कृत्य चुकीचंच आहे, असं स्पष्टपणे त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. त्यांचं स्टेटमेंट ट्विस्ट करण्यात आलं," असंही फडणवीस पुढे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)