UP Election : योगी, प्रियंका, अखिलेश सगळे मैदानात उतरले असताना मायावती कुठे आहेत?

    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका काही महिन्यांत होणार आहेत.

याठिकाणी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव विजय रथ यात्रा काढत आहेत, तर काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी एकापाठोपाठ सभा घेत आहेत. महिलांना 40 टक्के उमेदवारी आणि विद्यार्थिनींना स्मार्टफोन तसंच स्कुटी देण्याच्या घोषणाही त्यांनी केल्या आहेत. तरुण आणि महिलांना आकर्षित करण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न आहे.

भाजपही निवडणुकीच्या प्रचारात मागे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये सहा वेळा पूर्वांचलचा दौरा केला आहे. यावरून त्याचा अंदाज येतो. तसेच यूपीचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डादेखील सातत्यानं उत्तर प्रदेशात सभा घेत आहेत.

मात्र, एक चेहरा उत्तर प्रदेशच्या रणांगणातून बेपत्ता असल्याचं जाणवत आहे, तो म्हणजे बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांचा.

मायावती कुठे आहेत?

2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांनी 19 जागा जिंकत तिसरं स्थान पटकावलं होतं.

त्यामुळं यावेळी रणांगणातील त्यांच्या अनुपस्थितीमुळं चर्चांना उधाण आलं आहे. चारवेळा यूपीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती यावेळी सक्रिय का दिसत नाहीत? याबाबत राजकीय विश्लेषक आश्चर्य व्यक्त करत आहेत. सध्या मायावतींचे सगळे आमदार इतरत्र गेले असून त्यांच्या पाठीशी मोजक्या एखाद-दुसऱ्या आमदाराचच पाठबळ असल्याची स्थिती आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणावर करडी नजर असलेल्या तज्ज्ञांच्या मते, मायावती यांची या निवडणुकीतील निष्क्रियता त्यांच्यावर सुरू असलेल्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामुळं असू शकते.

ज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठी यांनी मायावती कुठेत दिसत नाहीत ही आश्चर्याची बाब असल्याचं म्हटलं आहे.

"त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर असलेल्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी प्रकरणामुळं त्या दबावात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळंच त्यांनी विधानसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मला गरज वाटली तर भाजपला मदत करेल, असं वक्तव्यही केलं होतं," असं त्रिपाठी म्हणाले.

जातीवर आधारीत मतदार

राम मंदिर आंदोलनापासूनच दलित मतदारांना आपल्या बाजूनं ओढण्याचं भाजप आणि संघाचं धोरण राहिलेलं आहे. तसं घडलंही आहे. त्यात आता मायावती अशा दबावामुळं निष्क्रिय झाल्या तर कदाचित त्यामुळं त्यांचा फायदाच होईल, असं बीबीसीबरोबर बोलताना रामदत्त त्रिपाठी म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान यांनीदेखील रामदत्त त्रिपाठी यांच्याशी सहमती दर्शवली. मायावती यांच्यावर असलेल्या सीबीआय आणि ईडीच्या टांगत्या तलवारीच्या भीतीनेच त्यांनी निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

तसंच त्यांनी असंही म्हटलं की, मायावती यांचा विशिष्ट जातीतील ठरलेला मतदार वर्ग आहे. त्यांची मतं त्यांना मिळतातच. पण या लढाईत त्यांचं अस्तित्वच दिसत नाही.

ज्येष्ठ पत्रकार सुनिता एरॉन यांनी मात्र, यापेक्षा काहीसं वेगळं मत नोंदवलं आहं.

मायावतींच्या कामाच्या पद्धतीचा विचार करता त्या नेहमीच निवडणुकीच्या तोंडावरच सभांना सुरुवात करतात. मात्र गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत त्यांची गती मंदावली आहे हेही खरं, असं सुनिता एरॉन म्हणाल्या.

"मायावती त्यांच्या कार्यकर्त्यांना गोळा करतात. बूथ पातळीवर तयारी करतात आणि कोणत्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करायचं आहे, ते ठरवतात" असंही त्या म्हणाल्या.

तसंच भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा असू शकतो, पण हा मुद्दा जनतेचा नाही, असंती सुनिता एरॉन म्हणाल्या.

"भाजप याचा वापर त्यांच्या विरोधात करत आहे अशी चर्चा आहे. मात्र नेत्यांबाबत अशी चर्चा होतच असते. तसं असलं तरीही, निवडणुकीच्या काळामध्ये तर नेते मैदानामध्ये उतरतच असतात," असं त्या म्हणाल्या.

नेत्यांनी सोडली मायावतींची साथ

इंद्रजित सरोज, लालजी वर्मा आणि सुखदेव राजभर यांनी बहुजन समाज पार्टी सोडण्यामागे मुख्य कारण हे त्यांची राजकीय निष्क्रीयता असल्याचं सांगितलं जात आहे.

सुखदेव राजभर बसपाचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्षही राहिलेले आहेत. त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. सुखदेव यांनी त्यांच्या मुलाला अखिलेश यादव यांच्या पक्षात पाठवलं होतं. तर नुकतंच हरीशंकर तिवारी यांनीही त्यांची मुलं आणि भाचे यांना सपाच्या सायकलवर स्वार केलं आहे. यामुळं पूर्वांचलच्या राजकारणात आता ओबीसी आणि ब्राह्मण हे दोन चेहरे पक्षातून जाणं हादेखील मायावतींसाठी धक्का ठरू शकतो, असं म्हटलं जात आहे.

त्याचवेळी ब्राह्मणांना जोडण्यासाठी मायावती यांनी पक्षाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्र यांना जबाबदारी दिली आहे. यादरम्यान त्यांच्या पत्नी कल्पना मिश्र यांचंही ब्राह्मण समाजातील महिलांना संबोधित करतानाचं भाषणही सोशल मीडियावर समोर आलं होतं.

पक्षातील तरुणांचं नेतृत्व समजले जाणारे आकाश आनंद आणि कपिल मिश्र तरुणांना पक्षाबरोबर जोडण्याचा काम करत आहेत, तसंच सोशल मीडियावर रणनीती आखत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्या सर्वच पक्षांचे आयटी सेल आणि सोशल मीडिया आहे. मात्र तुलना केली असता भाजप आणि सपाची टीम याबाबतीत बसपापेक्षा पुढं आणि अधिक उत्तम आहे.

मायावतींचा घसरता आलेख

"मायावती यांचं नाव प्रमुख दावेदारांमध्ये नाही. त्या केवळ काही जणांना पाठवून ब्राह्मण संमेलन घेणं, प्रसिद्धी पत्रक जारी करणं किंवा ट्विट करणं अशी कामं करतात. त्यामुळं त्यांच्याशी जोडले जाणारे मतदार एवढ्या मर्यादीत प्रयत्नांनी त्यांच्याबरोबर कसा जोडला जाणार?" असं शरत प्रधान म्हणाले.

मायावती 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 19 जागा जिंकून तिसऱ्या स्थानावर राहिल्या होत्या. त्या सत्तेत असतात तेव्हा त्यांचा आलेख वर जातो आणि सत्ता नसल्यानंतर घसरतो. आकडे पाहता 2007 नंतर 2012 आणि 2017 मध्ये त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे.

मात्र, 2007 मध्ये सोशल इंजिनीअरिंगद्वारे त्यांनी ब्राह्मण जोडण्याचा प्रयत्न केला आणि दलित-ब्राह्मण एकता नावानं संमेलनंही घेतली होती. त्याचा परिणाम पाहायला मिळाला मात्र, त्याकाळात मुलामयसिंह यादव यांच्या विरोधात असलेली लाटही कारणीभूत होती, असंही अभ्यासकांचं मत आहे.

त्या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली होती आणि त्याचा फायदा मायावतींना झाला.

राज्यात जवळपास 22 टक्के दलित लोकसंख्या आहे. मायावती यावेळी आरक्षण असलेल्या मतांवर लक्ष केंद्रीत करत धोरण आखत आहेत, असं दिसतंय.

रामदत्त त्रिपाठी यांनी याबाबत तर्क देत आरक्षित जागांवरचं गणित समजावून सांगितलं आहे.

"आरक्षित जागांवर दलित मतं विभागली जातात. कारण प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा दलित किंवा मागासवर्गीय असतो. अशा जागा या इतर समुदाय ज्यांच्याबरोबर आहेत, तेच जिंकतात. या प्रयत्नात मायावती सध्या तरी यशस्वी होताना दिसत नाहीत," असं ते म्हणाले.

सुनीता एरॉन यांच्या मते, यावेळी राज्यात भाजपची स्थिती मजबूत असल्याचं दिसत आहे.

भाजपसाठी सत्ताविरोधी नाराजीची लाट आणि मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी, कृषी कायदे किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळणं, असे मुद्दे त्रासदायक ठरू शकतात. मात्र ते बूथपासून विधानसभा मतदारसंघापर्यंत काम करत आहेत. त्यांची संघटना मोठी आहे, असं त्या म्हणाल्या.

त्यांच्या मते, स्थिती मजबूत असूनही जे एवढी तयारी करत आहेत, तर ज्यांच्या जागा कमी आहेत त्यांना आणखी परिश्रम करावे लागतील. त्यात अखिलेश यांनीही उशिरा सुरुवात केली आहे. मात्र त्यांच्या सभा, कार्यक्रमांमध्ये गर्दी आणि उत्साह जाणवत आहेत. प्रियंका गांधीदेखील मायावतींपेक्षा जास्त मैदानात दिसत आहेत.

अशा परिस्थितीत सर्वच पक्षांसाठी निवडणुका कठिण आहेत. मायावती लवकरच प्रचार सुरू करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्याउलट त्याचं लक्ष पंजाबच्या राजकारणावर असल्याचं दिसत आहे.

विश्लेषकांना असंही वाटतं की, मायावती AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींसारखी भूमिका बजावून भाजपला फायदा आणि सपाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांची नेमकी रणनीती निवडणुकीच्या निकालांनंतरच स्पष्ट होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)