भारतीय पायलटनं केली पाकिस्तानी असल्याची बतावणी, पण 'कलमा' वाचता आला नाही आणि...

फोटो स्रोत, JAWAHAR LAL BHARGAV
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पाच डिसेंबर 1971 रोजी 9 वाजून 20 मिनिटांनी फ्लाइट लेफ्टनंट जवाहरलाल भार्गव यांच्या मारूत विमानाने पाकिस्तानातील नयाछोर या भागात बॉम्बवर्षाव करण्यासाठी खालच्या बाजूला झेप घेतली, तेव्हा त्यांच्या विमानला एक तोफगोळा येऊ आदळला.
कॉकपिटमध्ये लाल दिवे लागले आणि विमानाचं डाव्या बाजूचं इंजिन बंद पडलं. भार्गव यांनी तत्काळ हल्ल्याची योजना सोडून देऊन भारतात परतायचा प्रयत्न केला. त्यांच्या खालच्या बाजूला सिंध प्रांताचं अथांग वाळवंट होतं.
त्यांना जमीन जवळ येताना दिसली, तसं त्यांनी देवाचं नाव घेऊन सर्व ताकदीनिशी इजेक्शनचं बटण दाबलं.
1971 मधील लढाईसंदर्भात अलीकडेच प्रकाशित झालेल्या '1971 : चार्ज ऑफ द गोरखाज्' या पुस्तकाच्या लेखिका रचना बिष्ट-रावत सांगतात, "भार्गव यांच्या विमानाची वरच्या बाजूची कॅनॉपी उघडली आणि एका क्षणात ते हवेत उडाले. थोड्याच वेळात ते वाळवंटात कोसळले. ते जमिनीवर पडायच्या आधी त्यांचं विमान बाजूला आदळलं होतं."
"विमानात ठेवलेल्या शस्त्रास्त्रांचा स्फोट होऊ शकतो, याचा अंदाज असल्यामुळे त्यांनी स्वतःचा पॅराशूट लगेच वाळूत गाडलं आणि वेगाने तिथून दूर जाण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी त्यांनी पायलट सर्वायव्हल किट उचललं- त्यात स्लिपिंग बॅग, स्टोव, चॉकलेट, चाकू, होकायंत्र आणि 100 मिलिलीटरच्या पाण्याच्या चार बाटल्या होत्या."
पटौदी यांच्या नावावरून मन्सूर अली खाँ हे असं नामकरण
पण भार्गव यांना त्या वेळी नकाशाची निकड होती आणि नेमका तो त्यांना किटमध्ये सापडला नाही. आता होकायंत्राच्या मदतीने पूर्व दिशेने चालत जायचं आणि सीमा पार करून भारतात पोचायचा प्रयत्न करायचा, असं त्यांनी ठरवलं.
लगेच त्यांनी घड्याळातील वेळ पाकिस्तानी प्रमाणवेळेशी जुळवून घेतली. वाटेत पकडलो गेलो तर आपण पाकिस्तानी हवाई दलाचे अधिकारी आहोत आणि आपलं नाव मन्सूर अली खाँ आहे, असं सांगायचं त्यांनी ठरवलं.

फोटो स्रोत, PENGUIN
मन्सूर अली खाँ हे नाव ठेवण्यामागे काही विशेष कारण होतं का, असं मी सध्या पंचकुला इथे राहणारे एअर कॉमोडोर जवाहरलाल भार्गव यांना विचारलं. यावर ते म्हणाले, "माझे वडील पटौदीचे नवाब इफ्तिखार अली खाँ पटौदी यांच्याकडे काम करायचे आणि मी त्यांचा मुलगा मन्सूर अली खाँ पटौदी (जे कालांतराने भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान झाले) यांच्या सोबत क्रिकेट खेळलो होतो. आम्ही दोघं रणजी ट्रॉफीसाठी आपापल्या राज्यांच्या संघांमधून खेळलो होतो. पटौदी दिल्लीसाठी खेळत असत, तर मी पंजाबच्या संघात होतो. मन्सूर हे नाव घ्यायचं मला पटौदी यांच्या नावावरून सुचलं."
भार्गव यांच्यकडे 300 पाकिस्तानी रुपये होते. पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी जाणाऱ्या सर्व वैमानिकांकडे असे पैसे दिले जातात.
उंटांसाठीचं घाण पाणी प्यावं लागलं
भार्गव यांनी चालायला सुरुवात केली, तेव्हा दूरदूरपर्यंत त्यांना मानवी वस्तीच्या खुणाही दिसत नव्हत्या. तीन किलोमीटर चालून होतंय तोपर्यंत उन्हामुळे त्यांना तहान लागली. सोबतच्या बाटल्यांमधलं पाणी कधीचंच संपलं होतं. आता त्यांच्याकडे थेंबभरही पाणी नव्हतं. तेव्हा त्यांना उंचवट्यापाशी एक गाव दिसलं. ते एका उजाड झोपडीसमोर जाऊन उभे राहिले. तिथे धोतर नि कुर्ता घातलेला एक दाढीधारी माणूस उभा होता.

फोटो स्रोत, JAWAHAR LAL BHARGAV
जवाहरलाल भार्गव सांगतात, "मी वाकून त्या व्यक्तीला अभिवादन केलं, पण त्याने प्रतिसादादाखल वालेकुम अस्सलाम म्हटलं. मी पाकिस्तानी हवाई दलातील फ्लाइट लेफ्टनंट मन्सूल अली खाँ आहे असं आत्मविश्वासाने सांगितलं. माझं विमान खाली कोसळलं असून मला प्यायला पाणी हवंय, असं मी म्हणालो. तेव्हा त्या म्हाताऱ्याने कोरडेपणाने उत्तर दिलं की, तिथे पाणी नाहीये.
जवळ सिमेंटच्या हौदात पाणी असल्याचं मला दिसलं. त्यावर म्हातारा म्हणाला, ते उंटांना पिण्यासाठीचं पाणी आहे, तुम्हाला हवं तर त्यातलं प्या. आजकाल आरओचा काळ आलेला आहे. पण तेव्हा मी ते घाण पाणी प्यायलो, इतकंच नव्हे तर पुढे लागेल म्हणून माझ्याकडच्या चार बाटल्यांमध्ये भरूनही घेतलं. माझ्याबद्दल कोणाला सांगू नये, अशी विनंती करून मी त्या माणसाला वीस रुपये दिले."
गावकरी भार्गव यांना गावात घेऊन गेले
त्या गावाचं नाव काय आहे, अशी चौकशी भार्गव यांनी त्या माणसापाशी केली, तेव्हा तो म्हणाला, 'ये पिरानी का पार है.' ते ऐकल्यावर भार्गव यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना ते भिटाला गाव वाटत होतं.
ते भारताच्या दिशेने जाण्याऐवजी पाकिस्तानच्या दिशेने चालत आल्याचं आता त्यांना लक्षात आलं.
त्यांनी दिशा बदलली आणि पुन्हा चालायला लागले. थोड्या वेळाने आराम करण्यासाठी ते एका खड्ड्यासारख्या जागेवर थांबले. अंधार झाल्यावरच पुढे वाटचाल करायचं त्यांनी ठरवलं.

फोटो स्रोत, JAWAHAR LAL BHARGAV
त्यांचा डोळा लागत होता इतक्यातच कोणीतरी लोक आपल्याला बघत असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांनी डोळे उघडले तेव्हा तीन लोक आणि एक मुलगा त्यांना निरखून पाहत असल्याचं त्यांना दिसलं. 'तुम्ही कोण आहात?' असं त्यांनी भार्गव यांना विचारलं.
भार्गव यांनी पुन्हा आधीसारखंच ठरलेलं उत्तर दिलं- 'मी फ्लाइट लेफ्टनंट मन्सूल अली खाँ आहे. भिटालापाशी भारतीय सैन्याने माझं विमान पाडलं.' यावर त्या लोकांनी त्यांना त्यांच्या सोबत गावात बोलावलं.
'मला कराचीला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर येणार आहे,' असं भार्गव यांनी त्यांना समजावायचा प्रयत्न केला. पण गावकरी ऐकायला तयार नव्हते. 'तुम्ही भारताच्या दिशेने जात आहात. त्यापेक्षा आमच्या गावात चला,' असं ते म्हणाले.
इथून सीमा किती अंतरावर आहे, असं भार्गव यांनी विचारलं. तेव्हा गावकरी म्हणाले- 15 किलोमीटर. यानंतर इच्छा नसतानाही भार्गव यांना त्या गावकऱ्यांसोबत जावं लागलं.
रावळपिंडीला राहत असल्याचं सांगितलं
गावात भार्गव यांना एका तागाच्या चारपाईवर बसवण्यात आलं. गावच्या शाळेचे मुख्याध्यापक तिथे आले. 'तुम्ही पाकिस्तानच्या कुठल्या भागात राहता,' इत्यादी प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, JAWAHAR LAL BHARGAV
भार्गव सांगतात, "मी आत्मविश्वासाने त्यांना रावळपिंडीत राहत असल्याचं सांगितलं. त्यावर, रावळपिंडीत कुठे राहता, असं त्याने विचारलं. मला रावळपिंडीची काहीही माहिती नव्हती. तरीही मी मॉल रोड असं सांगून टाकलं. योगायोगाने रावळपिंडीत एक मॉल रोड होता. इथे जवळ एखादं पोलीस स्टेशन आहे का, असं मी त्यांना विचारलं. पण तिथे दूरदूरपर्यंत कुठेच पोलीस स्टेशन नव्हतं, असं मला कळलं आणि माझ्या जीवात जीव आला."
"माझ्याबाबत रेंजरांना माहिती कळवण्यात आल्याचं त्यांनी मला सांगितलं. रेंजर इथे पोचायला किती वेळ लागेल, असं मी विचारलं. तर, 'अजून तीन-चार तास तरी लागतील' असं ते म्हणाले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. त्यांनी मला चहा करून दिला. दरम्यान माझी पाठ दुखायला लागली होती."
अचानक पाकिस्तानी रेंजर गावात पोचले
या सगळ्यात संध्याकाळची 7 वाजून 40 मिनिटं झाली होती. आता इथून पळून जाण्याचा प्रयत्न करायचा, अशी योजना भार्गव मनातल्या मनात आखत होते. त्यांनी सोबत एक चाकू आणि पाण्याच्या चार बाटल्या ठेवल्या आणि किटमधलं बाकीचं सामान गावातील मुलांमध्ये वाटलं.
इतक्यात चार पाकिस्तानी रेंजर त्या झोपडीत आले. आवाज अली हे त्यातले नायक होते. भार्गव यांनी पुन्हा आधीचीच माहिती दिली- ते फ्लाइट लेफ्टनंट मन्सूर अली खाँ असल्याचं सांगितलं. मग त्यांनी लघवीला जायचं असल्याचं सांगितलं.

फोटो स्रोत, JAWAHAR LAL BHARGAV
आवाज अली यांनी त्यांच्या सोबत दोन शस्त्रसज्ज रेंजर पाठवले. इथून पळून जावं असं क्षणभर भार्गव यांना वाटलं, पण ती पौर्णिमेची रात्र होती, त्यामुळे चारही दिशांना उजेड होता.
त्या दोन रेंजरांपाशी ऑटोमेटिक रायफली होत्या. पळून जायचा प्रयत्न केला तर हे रेंजर आपल्यावर गोळ्या झाडतील याची भार्गव यांना खात्री होती. त्यामुळे अनिच्छेने ते झोपडीत परतले.
रेंजरने 'कलमा' वाचायला सांगितला
भार्गव सांगतात, "मी परत आलो तेव्हा, माझ्या किटमधल्या मुलांना वाटलेल्या वस्तूंची तपासणी आवाज अली करत होते. त्यातल्या एका छोट्या चाकूवर 'मेड इन इंडिया' लिहिल्याचं त्याला दिसलं. त्याने माझं घड्याळ बघितलं. त्यात पाकिस्तानी वेळ दिसत होती. 'तुम्ही भारतीय असाल असा आम्हाला संशय आहे,' असं त्याने मला स्पष्टच सांगितलं.
आता माझ्या अडचणी वाढल्या. तरीही मी प्रचंड आत्मविश्वासाने त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवायला सांगितलं. त्यावर आवाज अलीने तोच अधिकारी असल्याचं सांगितलं. पण तो अधिकारी नसून नायक आहे, असं मी कडक शब्दांत म्हटलं."

फोटो स्रोत, JAWAHAR LAL BHARGAV
"आवाज अलीने माझी शेवटची परीक्षा घेण्यासाठी मला विचारलं, 'बरं, तुम्ही मुसलमान असाल तर आम्हाला कलमा वाचून दाखवा.' 'कलमा' म्हणजे काय असतं हेही मला तोवर माहीत नव्हतं. मला फक्त 'कलम' माहीत होतं. मी त्यांना मूर्ख बनवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. 'आवाज अली, मी खूप पूर्वी कलमा वाचला होता, आता मला काहीही आठवत नाही आणि माझी पाठसुद्धा दुखते आहे.' यावर तो म्हणाला, 'ठीक आहे, मग मी कलमा म्हणतो. तुम्ही माझ्या मागून म्हणा.' तरीही मी कलमा म्हणायला नकार दिला. मी कलमा चुकीचा म्हटला तर सगळे गावकरी मिळून मला मारतील असं मला वाटत होतं."
भारतीय वैमानिक असल्याचं भार्गव यांनी कबूल केलं
भार्गव आपल्याला फसवत असल्याचा आवाज अली यांचा संशय आणखी दृढ झाला. त्यांनी रायफलचा बट जमिनीवर दाबून म्हटलं, 'तुम्ही कोण आहात ते सांगा, नाहीतर खरं काय आहे ते बाहेर काढण्याचे इतर मार्ग आम्हाला माहीत आहेत.'
आता आपलं नाटक उघडकीस आल्याचं भार्गव यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, "मी भारतीय हवाई दलातील फ्लाइट लेफ्टनंट जवाहरलाल भार्गव आहे. आता तुम्ही माझं जे काही करायचंय ते करू शकता."

फोटो स्रोत, JAWAHAR LAL BHARGAV
परंतु, तोवर गावकऱ्यांना भार्गव यांच्याविषयी सहानुभूती वाटू लागली होती. भार्गव सांगतात, "जेवल्याशिवाय त्यांना तिथून जाऊ देणार नाही, असं गावकऱ्यांनी रेंजरांना सांगितलं. 'आप बडे का गोश्त खाते हैं या छोटे का?' असं त्यांनी मला विचारलं."
"मला हे बडा-छोटा यातलं काहीही माहीत नव्हतं. त्यांनी मला समजावून सांगितल्यावर मी 'बडे का गोश्त' खात नसल्याचं सांगितलं. मग त्यांनी माझ्यासाठी खास चिकन करी आणि भात असं जेवण तयार केलं. जेवण शिजत असताना इतक्या अवघड परिस्थितीतसुद्धा मी पलंगावर झोपून गेलो."
"रात्री अकरा वाजता कोणीतरी मला उठवलं आणि जेवण तयार असल्याचं सांगितलं."
भार्गव यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना उंटावर बसवण्यात आलं
जेवून झाल्यावर रेंजरांनी भार्गव यांना उंटावर बसवलं. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्यांच्या दोन्ही हातांना बेड्या घातल्या. भारतीय सीमा जेमतेम १५ किलोमीटरांवर असताना आपण पाकिस्तानी रेंजरांच्या हाती सापडलो, याबद्दल ते स्वतःच्या नशिबाला नावं ठेवू लागले.
तीन उंटांचा काफिला तिथून बाहेर पडला. मधल्या उंटवर फ्लाइट लेफ्टनंट भार्गव बसले होते. हा उंट रेंजर मोहब्बत अली हाकत होते. दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता त्यांना डोक्यावर विमानांचे आवाज ऐकू आले.
उंटांना खाली बसवावं नाहीतर भारतीय विमानं त्यांना लक्ष्य करतील, असं भार्गव यांनी काफिल्याला सांगितलं. रेंजरांनी त्यांचं ऐकलं. इतक्यात रेंजरांचं आणखी एक पथक तिथे पोचलं. त्यातल्या एकाने भार्गव यांना विचारलं की, त्यांनी सैनिकी गणवेश का घातलेला नाही. आपला जी-सूट जास्त वजनाचा होता, त्यामुळे तो काढून आपण जमिनीत गाडल्याचं ते म्हणाले.

फोटो स्रोत, JAWAHAR LAL BHARGAV
भार्गव सांगतात, "मी गुप्तहेर असेन असा संशय त्या रेंजरला आला होता. त्याने आवाज अलीला पंजाबीत सांगितलं, 'गोली मार डल्ले नू.' मी घाबरलो नि म्हणालो, 'मला गोळी मारणार असाल तर माझ्या डोळ्यांवरची पट्टी तेवढी काढा.' पण असं काही आपण करणार नसल्याचं सांगून आवाज अलीने त्यांना आश्वस्त केलं."
पाकिस्तानी अधिकाऱ्याचं औदार्य
पाच दिन सलग चालून झाल्यानंतर फ्लाइट लेफ्टनंट भार्गव यांना कराचीत पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर आणण्यात आलं. वाटेत त्यांची ओळख पाकिस्तानी सैन्यातील कॅप्टन मुर्तझा यांच्याशी झाली.
मुर्तझा यांनी भार्गव यांच्या डोळ्यांवरची पट्टी आणि हातातील बेड्या काढायला सांगितलं. शिवाय, त्यांनी भार्गव यांना सिगरेटही देऊ केली आणि दाढी करण्यासाठी स्वतःकडील शेविंग किट दिलं. आपण शत्रू आहोत आणि भार्गव आपल्या कैदेत आहेत, असं त्यांनी एकदाही जाणवू दिलं नाही.
अखेरीस 12 डिसेंबरला विमानाने रावळपिंडीतील युद्धकैद्यांच्या छावणीत नेण्यात आलं. तिथे आधीच पकडले गेलेले 12 भारतीय वैमानिक होते.

फोटो स्रोत, JAWAHAR LAL BHARGAV
नाताळच्या दिवशी त्या छावणीच्या कमांडरने या सर्वांसाठी केक मागवला. तिथल्या उपस्थितांपैकी सर्वांत वरिष्ठ भारतीय अधिकारी असणारे विंग कमांडर कोएल्हो यांनी केक कापला.
पाकिस्तानी सैनिकांनी ढाक्त भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली असल्याची बातमी तोपर्यंत या छावणीतही पोचली होती. भार्गव आणि त्यांचे सहकारी पाकिस्तानी तुरुंगात एक वर्ष राहिले.
आधी अडथळा, मग सुटका
30 नोव्हेंबर 1972 रोजी लायलपूर तुरुंगात राहणाऱ्या सर्व भारतीय युद्धकैद्यांना सांगण्यात आलं की, त्यांना देण्यात आलेला पाकिस्तानी सैन्याचा खाकी गणवेश घालावा. मग त्यांना विशेष ट्रेनने लाहोरला नेण्यात आलं.
एक डिसेंबरला बसमध्ये बसवून त्यांना वाघा सीमेवर आणण्यात आलं. दुसऱ्या बाजूला भारतीय बाजूने पाकिस्तानी युद्धकैद्यांना आणण्यात आलं होतं. दोन्ही देशांचे युद्धकैदी आपापल्या देशात परत जात होते. भारतीय युद्धकैद्यांना वाघा सीमेपासून 100 मीटर मागे असणाऱ्या एका तंबूत ठेवण्यात आलं.
आधी लष्करातील सैनिकांनी सीमा पार केली, त्यानंतर अधिकाऱ्यांची वेळ होती. सर्वांत शेवटी भारतीय वैमानिकांची वेळ आली. इतक्यात त्यांना थांबवण्यात आलं. भारतीय वैमानिकांना परत जाता येणार नाही, असं एका पकिस्तानी अधिकाऱ्याने तिथे येऊन सांगितलं.

फोटो स्रोत, DHIRENDRA JAFA
त्या दिवशीची आठवण सांगताना भार्गव म्हणतात, "तिकडे बँड वाजत होते, लोक नाचत होते आणि आम्हाला परत जाता येणार नाही असं इथे सांगितलं जात होतं. आमची हिरमोड झाला. पण या संदर्भात थेट राष्ट्राध्यक्ष भुट्टो यांच्याशी चर्चा सुरू आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. भारताने पश्चिमेकडील भागात पकडलेल्या सर्व पाकिस्तानी युद्धकैद्यांना परत पाठवलं होतं, पण पाकिस्तानी वैमानिकांना सोडलं नव्हतं, त्यामुळे हा अडथळा आला. पण भुट्टो यांनी भारतीय वैमानिकांना परत भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला."
"दुसऱ्या दिवशी भारतीय लष्कराचे प्रमुख सॅम माणेक शॉ स्वतः विमानाने पाकिस्तानी वैमानिकांना पाकिस्ताना जाऊन सोडून आले."
अमृतसर आणि दिल्ली इथे अभूतपूर्व स्वागत
साडेअकरा वाजता भारतीय वैमानिक वाघा सीमा ओलांडून भारतात आले. तिथे पंजाबचे मुख्यमंत्री ग्यानी झैल सिंग यांनी गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं.
भारतीय सैन्याच्या काळ्या अॅम्बेसेडर गाडीतून त्यांना हवाई दलाच्या अमृतसरमधील तळावर नेण्यात आलं.
तिथे या लोकांनी वर्षभराने पहिल्यांदाच ताजं गरम जेवण खाल्लं आणि ते बिअर प्याले. त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता अमृतसरमधील कंपनी बाग इथे युद्धकैद्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
मग या वैमानिकांना विमानातून पालम विमानतळावर आणण्यात आलं, तिथे हवाई दलाचे अध्यक्ष पी. सी. लाल व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचं स्वागत गेलं.
भार्गव यांच्या चार वर्षांच्या मुलाने त्यांना 'अंकल' अशी हाक मारली, तेव्हा त्यांना स्वाभाविकपणे अश्रू अनावर झाले.
एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचा मुलगा वडिलांचा चेहरा विसरून गेला होता. पाकिस्तानात जो कलमा न म्हणता आल्यामुळे अटक झाली, तो कलमा भार्गव यांना आता मात्र चांगला पाठ आहे- 'ला इलाह इल्लल लाहू, मुहमद्दुर रसूलुल्लाह.'
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








