बिपिन रावत यांच्याबरोबर अपघातात मृत्युमुखी पडलेले लष्करातील 11 जण

भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातून बचावलेले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्रकृतीही सध्या गंभीर आहे.

अपघातात जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्याशिवाय लष्करातील इतर 11 जणांचं निधन झालं. त्यात एअर फोर्सच्या हेलिकॉप्टर चालक दलाच्या चार सैनिकांचा समावेश होता.

ब्रिगेडियर लखबिंदर सिंह लिड्डर

हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्याचे रहिवासी. जनरल रावत यांचे ते संरक्षण सल्लागार होते..

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. "तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये झालेल्या अपघातात शहीद झालेले पंचकुलाचे वीर पुत्र 'ब्रिगेडियर लखविंदर सिंह लिड्डर' यांना माझी विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्याला ईश्वराच्या चरणी स्थान मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो," असं त्यांनी म्हटलं.

माजी मंत्री, माजी लष्करी अधिकारी, ऑलिम्पिक पदक विजेते खासदार आणि भाजप प्रवक्ते राज्यवर्धन सिंह राठौड यांनीही ब्रिगेडियर लखबिंदर सिंह यांच्याबाबत ट्विट केलं.

"आम्ही एनडीएमध्ये एकत्र प्रशिक्षण घेतलं. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढलो. ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांच्या रुपानं देशानं अत्यंत शूर अधिकारी आणि मी एक मित्र गमावला. एक उत्तम सैनिक, काळजी घेणार पती, प्रेम देणारा पिता - तुझी कमतरता कायम राहील, टोनी." असं ट्विट त्यांनी केलं.

राज्यवर्धन राठोड यांनी आणखी एक ट्विट करत अपघातातील इतर सैनिकांनाही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्याचे रहिवासी. जनरल रावत यांचे ते स्टाफ ऑफिसर होते.

लान्सनायक विवेक कुमार - 1 पॅरा (स्पेशल फोर्सेस) - जनरल रावत यांचे पीएसओ

हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्याचे रहिवासी

"तमिळनाडूच्या कुन्नूरमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरभूमी हिमाचलच्या जयसिंहपूरचे सुपुत्र आणि सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे पीएसओ, लांस नायक विवेक कुमारही शहीद झाले," असं हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विट करत लिहिलं आहे.

नायक गुरुसेवक सिंग - 9 पॅरा (स्पेशल फोर्सेस)

पंजाबच्या तरनतारण जिल्ह्याचे रहिवासी

लान्स नायक बी साई तेजा - 11 पॅरा (स्पेशल फोर्सेस)

आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्याचे रहिवासी

नायक जितेंद्र कुमार - 3 पॅरा (स्पेशल फोर्सेस)

मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यातील धामंदा गावचे रहिवासी

31 वर्षीय जितेंद्र कुमार यांच्या मुलीचं वय चार वर्ष आणि मुलाचं वय एक वर्ष आहे.

सिहोरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी नायक जितेंद्र कुमार यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर धामंदा गावात त्यांच्या घरी जावून शोक व्यक्त केला.

हवालदार सतपाल राय

पश्चिम बंगालच्या दार्जिंलिंग जिल्ह्याचे रहिवासी. जनरल रावत यांचे ते पीएसओ होते.

दार्जिलिंगचे खासदार राजू बिष्ट यांनी हवालदार सतपाल राय यांच्या मृत्यूनंतर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली. "हवालदार सतपाल राय सीडीएस जनरल रावत यांचे पीएसओ होते. ते दार्जिलिंगच्या तकडाहचे रहिवासी होते. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला कधीही भरून न निघणारं हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

हवाई दलातील चौघांचा समावेश

मृतांमध्ये लष्कराच्या या सात अधिकाऱ्यांसह हवाई दलाचे चार अधिकारीही होते.

विंग कमांडर पीएस चौहान

ज्या एमआय-17 हेलिकॉप्टरचा अपघात झाला ते विंग कमांडर पीएस चौहान उडवत होते. चौहान सुलूरमध्ये 109 हेलिकॉप्टर युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते.

बीबीसीचे सहयोगी पत्रकार मोहर सिंह मीणा यांच्या मते, विंग कमांडर पीएस चौहान मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. मात्र, अनेक वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब जयपूरमधून उत्तर प्रदेशच्या लखनऊत स्थायिक झालं आहे. सध्या विंग कमांडर चौहानचे कुटुंबीय आग्रा येथे राहत आहेत.

न्यू आगरा परिसरातील त्यांच्या घरी नातेवाईक आणि शुभचिंतकांनी गर्दी केल्याचं, आगरा येथील स्थानिक पत्रकार नसीम अहमद यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

त्यांचे 72 वर्षीय पिता सुरेंद्र सिंह मुलगा पृथ्‍वी यांच्या निधनानं खचले आहेत.

मुलाच्या मृत्यूची बातमी मुंबईत राहणारी सर्वात मोठी मुलगी शकुंतलाकडून मिळाली. तिनं टिव्हीवर पाहून पृथ्वी यांच्या पत्नी कामिनी यांना फोन केला असं सुरेंद्र यांनी भरलेल्या डोळ्यांनी सांगितलं.

42 वर्षीय पृथ्वीसिंह चौहान भावडांमध्ये आणि सर्वात लहान होते, असं त्यांच्या मोठ्या बहिणीनं सांगितलं. सर्व बहिणींमध्ये ते एकुलते एक भाऊ होते.

त्यांचा विवाह 2007 मध्ये वृंदावन येथील रहिवासी कामिनी यांच्याशी झाला होता त्यांची मुलगी आराध्या 12 वर्षांची तर मुलगा अविराज नऊ वर्षांचा आहे.

पृथ्‍वी यांना रिवा येथील लष्करी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं. त्याठिकाणाहून त्यांची एनडीएमध्ये निवड झाली. 2000 मध्ये ते हवाई दलात सहभागी झाले. सध्या ते कोईम्बतूरच्या एअरफोर्स स्टेशनवर तैनात होते.

पृथ्‍वी यांची पहिली पोस्टिंग हैदराबादमध्ये झाली होती. त्यानंतर ते गोरखपूर, गुवाहाटी, ऊधमसिंह नगर, जामनगर, अंदमान निकोबारसह इतर एअरफोर्स स्‍टेशन्‍सवर तैनात होते.

त्यांना एका वर्षाच्या खास ट्रेनिंगसाठी सुदानलाही पाठवण्यात आलं होतं. त्या ट्रेनिंगनंतर त्यांना हवाईदलातील धाडसी पायलट म्हणून ओळखलं जात होतं.

स्क्वॉड्रन लीडर कुलदीप सिंह

स्क्वॉड्रन लीडर कुलदीप सिंह दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे को-पायलट होते. ते राजस्थानच्या झुंझंनू जिल्ह्याचे रहिवासी होते.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार या अपघाताच्या वृत्तानंतर झुंझंनूमध्ये सगळीकडे शोक पसरला आहे. ते अतिशय उत्तम अधिकारी होते आणि त्यांच्या जाण्यानं संपूर्ण देशाचं मोठं नुकसान झालं, असं स्क्वॉड्रन लीडर कुलदीप सिंह यांचे चुलत भाऊ म्हणाले.

जेडब्ल्यूओ राणा प्रताप दास

ओडिशाचे तालचेर जिल्ह्याचे रहिवासी

राणा प्रताप यांचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे, असं बीबीसीचे सहयोगी पत्रकार संदीप साहू यांनी दिली. त्यांचं पार्थिव गुरुवारी रात्री गावात पोहोचेल असं त्यांचे मेहुणे संकल्प दास यांनी सांगितलं.

जेडब्ल्यूओ प्रदीप

केरळच्या त्रिची जिल्ह्याचे रहिवासी

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)