You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेव्हा संभाजी ब्रिगेडने गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली होती
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
नाशिक इथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या मुख्य स्थळी बॅटरी गाडीतून येत असताना हे घडलं. संभाजी ब्रिगेडच्या दोन व्यक्तींनी कुबेरांवर शाईफेक केली. वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण या परिसंवादाचे कुबेर अध्यक्ष होते. परिसंवादाआधी हा प्रकार घडला.
गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केला आहे असं शाईफेक करणाऱ्यांचं म्हणणं होतं. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन रोटे पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेरांवर शाईफेक केल्याला दुजोरा दिला.
'लोकसत्ता'चे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांचं 'रेनेसाँ स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र' हे इंग्रजी भाषेतील पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं. महाराष्ट्राची जडण-घडण उलगडून दाखवताना त्यांनी 'डेक्कन आफ्टर शिवाजी' या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय झालं, याची मांडणी केली होती.
शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची हत्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनीच केल्याचा उल्लेख या पुस्तकात होता.
कुबेर लिहितात: 'अखेर वारशाचा वाद संपुष्टात आणण्यासाठी संभाजींनी सोयराबाई आणि त्यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांना ठार केलं. त्यांपैकी काही जण शिवाजींच्या अष्टप्रधान मंडळातील होते. या रक्तपातामुळे शिवाजींनी तयार केलेल्या मौल्यवान अशा कतृत्ववान मंडळीच्या फळीचा अंत झाला. नंतर संभाजींना याची मोठी किंमत चुकवावी लागली.'
शाईफेकीचा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी- शरद पवार
"लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. लेखक म्हणून व्यक्त होण्याची भूमिका ते घेऊ शकतात. या लिखाणाला विरोध करणारे घटक असू शकतात. देशात आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्वीकारलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं असताना, एखाद्या लेखनासाठी लेखकावर वैयक्तिक हल्ला करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार म्हणाले. साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभासाठी ते आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
"आम्ही कुणीही त्याचा पुरस्कार करत नाही. जे झालं ते निंदनीय आहे. अशा गोष्टी महाराष्ट्राला शोभत नाहीत. विशेषत: तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावाने मराठीजनांचा सोहळा उत्साहाने आयोजित करण्यात आला अशा परिसराच्या जवळ हा प्रकार घडणं, कुठेही घडणं चुकीचं आहे", असं त्यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही पुस्तक वाचलं आहे. पुस्तकातील संभाजी महाराज आणि सोयराबाई यांच्यासंदर्भातील लिखाणावर तुमचं काय असं विचारलं असता पवार म्हणाले, "मी इतिहासतज्ज्ञ नाही. मी त्या खोलात गेलो नाही. लेखक म्हणून लिहिणं हा त्यांचा हक्क. त्याचा प्रतिवाद होऊ शकतो. पण हल्ला करणं योग्य नाही".
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असं कृत्य अयोग्य-संजय राऊत
"या घटनेचा मी निषेध करतो. त्यांनी केलेल्या लिखाणासंदर्भात मतभेद असू शकतात. त्यांनी काय लिहिलंय हे किती लोकांनी वाचलंय. साहित्य संमेलन सुरू असताना असं कृत्य करणं कोणालाही मान्य ठरणार नाही", असं सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, "त्यांनी जे लिहिलं त्यासंदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या. साहित्य संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं व्यासपीठ. कुबेरांना धक्काबुक्की, त्यांच्यावर शाईफेक हे संभाजीराजे यांच्या प्रतिमेला डागाळण्यासारखं आहे. ज्यांना त्यांचं पटत नाही त्यांच्याशी वाद घालावा. तुमच्या लिखाणाला आधार नाही हे सप्रमाण दाखवून द्यावं. वाद-चर्चा होऊ शकतो. धिक्कार होऊ शकतो. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असं कृत्य होणं योग्य नाही".
शाईफेकीची घटना दुर्देवी- बाळासाहेब थोरात
"विचारांचा लढा विचारांनी व्हावा. संभाजी ब्रिगेडनं हे समजून घ्यायला हवं. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकल्याची घटना दुर्दैवी. या घटनेचं समर्थन नाही. अभ्यासपूर्ण लेखन असावं, पटलं नाही तर वैचारिक लढा करावा. योग्य त्या सरकारी यंत्रणा कारवाई करणार", असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
संभाजी ब्रिगेडच्या हल्ल्याची कुणकुण-भुजबळ
"संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करणार याची कुणकुण लागली होती. ते येऊन लेखी निवेदन देतील, निषेध करतील असं वाटलं होतं. मी आणी माझा मुलगा पंकज भुजबळ कुबेर यांना घेऊन फिरलो. पुण्यातुन 2 जण मोटरसायकल वर आले होते. काळी पावडर त्यांनी कुबेर यांच्या अंगावर फेकली.
"व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झालं आणी त्या दोघांनी काळी पावडर फेकली. पंकज भुजबळ यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवली आहे. संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील असं मला वाटलं होतं", असं अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
शाईफेक अयोग्य मात्र समाजात तेढ पसरवणारं लिखाणही होता कामा नये- प्रवीण दरेकर
"संमेलनात शाईफेकीचं कृत्य योग्य नाही. मात्र त्याचवेळी असं लेखन योग्य नाही. स्वत:ला जे विचारवंत समजतात त्यांनी आपल्या लिखाणातून समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. समाजातील विविध घटकांची दैवतं आहेत त्यांचा अपमान होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.
"त्यांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी सुजाण म्हणवणाऱ्यांनी घेतली पाहिजे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे छत्रपतींचे मावळे आहेत. त्यांनी आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर दिलं. ते समर्थनीय नसलं तरी ते कृतीला मिळालेलं प्रत्युत्तर आहे", असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले.
मुंबई प्रेस क्लबकडून निषेध
गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आल्याचा निषेध मुंबई प्रेस क्लबकडूनही करण्यात आला आहे.
या कृत्याचा निषेध करताना प्रेस क्लबने म्हटलं आहे की, शारीरिक संघर्ष हा विचारांच्या सुसंस्कृत लढाईचा भाग नसल्याचं आम्ही मानतो. वैचारिक लढाई ही तर्कसंगत युक्तिवाद आणि चर्चेच्या आधारेच लढायला हवी, असं आम्ही मानतो.
अर्थात, या कृत्याचा निषेध म्हणजे एखाद्याने या पुस्तकातील आशय आणि हेतू यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापासूनच परावृत्त व्हावं असा नाही. गिरीश कुबेर यांच्या महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भातील पुस्तकाचे विवेचन आणि सादरीकर यावर वाजवी टीका करण्यात आली याचीही आम्ही दखल घेतो.
या पुस्तकातील काही त्रुटींमुळे हे पुस्तक इतिहासाचं काहीसं मोडतोड केलेलं स्वरुप समोर आणतं जे लोकशाही आणि तर्कसंगत वादविवादासाठी अनुकूल समाजासाठी पोषक नसल्याचंही प्रेस क्लबनं म्हटलं आहे.
सोयराबाई कोण आहेत?
शिवाजी महाराजांची पट्टराणी म्हणून मान मिळालेल्या सोयराबाई या मोहिते घराण्यातल्या. धाराजी मोहिते आणि संभाजी मोहिते या मातब्बर लढवय्यांनी शहाजी राजेंच्या सैन्यात पराक्रम गाजवला. त्यातील संभाजी मोहिते यांची मुलगी सोयराबाई. शिवाजी महाराजांसोबत त्यांचा विवाह झाल्याची निश्चित तारीख सापडत नाही. त्यांना पुढे बाळीबाई उर्फ दीपाबाई आणि राजाराम ही दोन अपत्ये झाली.
6 जून 1674 या दिवशी रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सोयराबाईंना पट्टराणीचा मान मिळाला. त्यावेळी सोयराबाईंखेरीज महाराजांच्या इतर तीन पत्नी हयात होत्या.
संभाजी दोन वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा बाळंतपणानंतरच्या आजारपणात मृत्यू झाला होता.
पुस्तकातील उल्लेखासंदर्भात कुबेरांचं काय म्हणणं?
पुस्तकावरून झालेल्या वादावर बीबीसी न्यूज मराठीने लेखक गिरीश कुबेर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गिरीश कुबेर यांना पाठवलेल्या प्रश्नांवर त्यांनी हे लेखी उत्तर दिलं: "रेनेसाँ स्टेट ही सातवाहनापासून आधुनिक काळापर्यंतच्या महाराष्ट्राची 'कहाणी' आहे.
असं पुस्तक छत्रपती शिवाजी आणि त्यांचे वारसदार यांच्यावरील प्रकरणाशिवाय पूर्ण झालं नसतं. मी जे काही लिहिलंय त्यासाठी जदुनाथ सरकार आणि जसवंत लाल मेहता यांच्यासारख्या अनेक मान्यवर इतिहासकारांनी लिहिलेल्या विद्वत्तापूर्ण कामांचे संदर्भ घेतले आहेत. संदर्भासाठी घेतलेल्या स्रोतांची यादी पुस्तकाच्या अखेरीस समाविष्ट करण्यात आली आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)