Ajaz Patel ने मुंबई कसोटीत एकाच डावात 10 विकेट्स कशा घेतल्या?

एका डावात 10 विकेट्स घेण्याचा दुर्मीळ विक्रम भारतीय वंशाच्या पण न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या एझाझ पटेलने नावावर केला. असं करणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत एझाझने हा विक्रम नावावर केला. एझाझचे आकडे असे आहेत 47.5-12-119-10

याआधी कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम इंग्लंडचे जिम लेकर आणि भारताचे अनिल कुंबळे यांच्या नावावर होता. दुर्मीळ अशा मांदियाळीत एझाझचं नाव समाविष्ट झालं आहे.

एझाझने पहिल्या स्पेलमध्ये 24 ओव्हर्समध्ये 10 मेडन ओव्हर टाकल्या. 57 धावांच्या मोबदल्यात एझाझने 4 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या छोटेखानी स्पेलमध्ये एझाझच्या 5 ओव्हर्समध्ये भारतीय फलंदाजांनी 16 धावा केल्या.

तिसऱ्या महत्त्वपूर्ण स्पेलमध्ये एझाझने 6 ओव्हर्समध्ये 16 धावात 2 विकेट्स घेतल्या. चौथ्या आणि अंतिम स्पेलमध्ये एझाझने 12.5 ओव्हर्समध्ये 2 मेडनसह 30 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेत अनोख्या विक्रमावर शिक्कामोर्तब केलं.

कोण आहे एझाझ पटेल?

9 टेस्ट, 7 ट्वेन्टी20 सामन्यात 33वर्षीय एझाझने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. एझाझचा जन्म मुंबईचा पण आठव्या वर्षी आईवडिलांसह तो न्यूझीलंडला रवाना झाला.

त्याच्या वडिलांनी तिथे गॅरेज उभारलं. त्याची आई मुंबईत असताना शाळेत शिक्षिका होत्या.

वेगवान गोलंदाज म्हणून एझाझने खेळायला सुरुवात केली. प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार एझाझ फिरकी गोलंदाज झाला.

68 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये एझाझच्या नावावर 251 विकेट्स आहेत.

न्यूझीलंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर एझाझला तीन वर्षांपूर्वी पदार्पणाची संधी मिळाली.

पदार्पणाच्या कसोटीतच 7 विकेट्स घेत एझाझने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला होता.

एझाझचा न्यूझीलंड संघातील सहकारी मिचेल मक्लेघान आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी खेळायचा. मिचेलच्या निमित्ताने एझाझला मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये नेट बॉलर म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती. मिचेल मुंबई इंडियन्स संघाचा भाग असताना एझाझ वानखेडे स्टेडियमवर काही सामने पाहायला आला होता.

कौटुंबिक सोहळ्यांसाठी एझाझ मुंबईत नियमितपणे येत असतो.

आयसीसीने 'नाव लक्षात ठेवा' म्हणून एझाझचं कौतुक करत ट्वीट केलं आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही एझाझवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आज कसोटीत काय घडलं?

मयांक अगरवाल, शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रवीचंद्रन अश्विन, वृद्धिमान साहा, अक्षर पटेल, जयंत यादव, मोहम्मद सिराज या सगळ्यांना बाद करत एझाझने दुर्मीळ विक्रम नावावर केलं.

याआधी 1956 साली इंग्लंडच्या जिम लेकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर इथे खेळताना 51.2-23-53-10 अशी कामगिरी केली होती.

1999 मध्ये भारताच्या अनिल कुंबळे यांनी दिल्लीत फिरोझशाह कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्ध हा अनोखा विक्रम केला होता. कुंबळे यांची आकडेवारी होती 26.3-9-74-10

भारत-न्यूझीलंड मालिकेतला कानपूर इथे झालेला सामना अर्निर्णित झाला होता. रचीन रवींद्र आणि एझाझ पटेल यांनीच तासभर चिवटपणे खेळ करत न्यूझीलंडला पराभवातून बाहेर काढलं होतं.

वानखेडे कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने मयांक अगरवालच्या शतकाच्या बळावर 325 धावांची मजल मारली. परंतु जन्मभूमीत डावात 10 विकेट्स घेत एझाझने शनिवारचा दिवस गाजवला.

भारतातर्फे मयांकने 17 चौकार आणि 4 षटकारांसह 150 धावांची खेळी केली. अक्षर पटेलने 52 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)