Omicron : आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 100 प्रवाशांच्या पुन्हा चाचण्या होणार #5मोठ्याबातम्या

विमानतळ

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 100 प्रवाशांच्या पुन्हा चाचण्या होणार

आफ्रिकेतून मुंबईत दाखल झालेल्या 100 प्रवाशांची पुन्हा चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. गेल्या 15 दिवसांत आफ्रिकेतल्या देशांतून एकूण 466 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

यापैकी 100 जण मुंबईचे आहेत तर 366 प्रवासी मुंबईबाहेरचे असल्याचं लोकसत्ताने त्यांच्या बातमीत म्हटलंय.

मुंबईतलया 100 प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यापैकी कोणालाही कोव्हिड -19 झाला नव्हता. पण दक्षता म्हणून या प्रवाशांच्या पुन्हा एकदा चाचण्या करण्यात येणार आहेत.

ठाण्यामध्ये दाखल झालेल्या 7 प्रवाशांचाी शोध घेण्यात येणार असून त्यांच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत. दरम्यान अद्याप भारतामध्ये ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.

2. ममता बॅनर्जी आजपासून मुंबई दौऱ्यावर; शरद पवार, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

पश्चिम बंगालच्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज संध्याकाळी मुंबईत दाखल होत आहेत. त्या दोन दिवस मुंबईत असतील.

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, Getty Images

या मुंबई दौऱ्यादरम्यान त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतील

पुढच्या महिन्यात बंगालमध्ये होऊ घातलेल्या जागतिक व्यापारी परिषदेच्या निमित्ताने त्या 1 डिसेंबरला उद्योग जगातील व्यक्तींना भेटणार असल्याचं लोकमतने त्यांच्या बातमीत म्हटलंय.

ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धीविनायकाचं दर्शन घेतील आणि नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतरच्या स्वागत सोहळ्यालाही त्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बुधवारी 1 डिसेंबर रोजी मुंबईतल्या उद्योगपतींना त्या भेटतील आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन बंगालला परततील.

3. मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चूक - बच्चू कडू

मंत्र्याच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार पगार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच असल्याचं म्हणत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय.

उद्धव ठाकरे, बच्चू कडू

फोटो स्रोत, TWITTER/FACEBOOK

सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये ते कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनात बोलत होते.

आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने असलो तरी ही आंदोलनाची वेळ नसल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटल्याचं टीव्ही 9 मराठीने बातमीत म्हटलंय.

शेतकऱ्याला फक्त 8 तास वीज मिळत असेल आणि पूर्ण बिलाची वसुली केली जात असेल तर ते ही चुकीचं असल्याचं कडू यांनी म्हटलंय.

4. विरोधक ठरवणार संसदेच्या हिवाळी सत्रासाठीचं धोरण

सोमवार (29 नोव्हेंबर) पासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी सत्रासाठीचं धोरण आज विरोधक ठरवणार आहेत. काँग्रेस आणि इतर 13 पक्षांचे खासदार संपूर्ण सत्रावरच बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.

सोमवारी संसदेत कृषी कायदे रद्द करणारं विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आलं. तर राज्यसभेत 12 विरोधक खासदारांना निलंबित करण्यात आलं.

संसद

फोटो स्रोत, Getty Images

23 डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार घालायचा की निषेध व्यक्त करत कामकाजात व्यत्यय आणायचा याविषयीचा निर्णय आज घेण्यात येणार असल्याचं हिंदुस्तान टाईम्सने म्हटलंय.

5. 10 कंपन्यांच्या IPO ला सेबीकडून मान्यता

सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने आणखी 10 कंपन्यांच्या आयपीओ - इनिशियल पब्लिक ऑफरला मान्यता दिली आहे.

यामध्ये डेटा पॅटर्न्स इंडिया, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया, जेमिनी एडिबल्स आणि फॅट्स इंडिया, इंडिया1 पेमेंट्स, हेल्दियम मेडटेक, CE इन्फो सिस्टीम्स, VLCC हेल्थकेअर, AGS ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजी, मेट्रो ब्रँड्स आणि गोदावरी बायोरिफायनरीजचा समावेश आहे.

मिंटने याविषयीची बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)