You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलन: '...तर आम्ही इथून अजिबात जाणार नाही'
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
"सरकारच्या 'नियत'मध्ये आम्हाला जराही खोट वाटली तर आम्ही इथून अजिबात जाणार नाही," हे म्हणणं आहे सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या रणज्योतसिंग यांचं...
दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवर शेतकरी करत असलेल्या आंदोलनाला एक वर्षं झालंय.
ज्या तीन कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत ते कायदे खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेण्याची घोषणा केली आहे.
पण जोपर्यंत ते कायदे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात नाही तोपर्यंत सिंघू सीमेवरून मागे न हटण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे.
बरोबर वर्षभरापूर्वी आम्ही तुम्हाला भर थंडीत या आंदोलनातली रात्र कशी असते याचा रिपोर्ट दाखवला होता. आज बरोबर एक वर्षानंतर पुन्हा एकदा रात्रीच्यावेळी या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी मी पोहोचलो.
(वर्षभरापूर्वीचा रिपोर्ट तुम्ही इथं वाचू शकता :- ‘तुम्हाला माहिती आहे देश विकला गेलाय, कसं माहिती असेल तुमचे तर डोळेच बंद आहेत’)
रात्री 11 वाजताच्या सुमारास आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा पोलिसांनी आमची गाडी 2 किलोमीटर आधीच आडवली.
मग आम्ही दुसऱ्या मार्गाने जायचं ठरवलं.
19 नोव्हेंबरला ज्यादिवशी नरेंद्र मोदींनी कायदे मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा याच रस्त्यामार्गे आम्हाला आंदोलनात जाऊ दिलं होतं...
मग काय 4 किलोमीटरचा वळसा घालून आम्ही मागच्या दिशेने आंदोलनात पोहोचलो. तेव्हा रात्रीचे 12 वाजत आले होते.
संपूर्ण आंदोलन स्थळ शांत होतं. पाहारा देणारे निहंग जत्थेदार आणि इतर पाहारेकरी मात्र जागे होते.
आंदोलनातल्या पहिल्या तंबू पासून फेरफटका सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
तिथूनच थोड्या अंतरावर एका शेकोटीजवळ काही तरुण शेकत बसले होते. त्यातली काही मंडळी फिरोजपूरहून थोड्यावेळापूर्वीच आंदोलनस्थळी दाखल झाली होती. आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ते वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी इथं आले होते.
त्यातलेच एक होते 28 वर्षांचे प्रिन्स चोप्रा. एका कॉर्पोरेटमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या प्रिन्स यांच्या कुटुंबात कुणीच शेतकरी नाही. आईवडील, बहिण आणि ते स्वतः नोकरीच करतात.
पण शेतकऱ्यांसाठी इथं आल्याचं ते सांगतात. शेतकरी टिकला तरच अर्थव्यवस्था टिकेल आणि तरच माझी नोकरी टिकेल, असं प्रिन्स यांना वाटतं.
शेतकऱ्यांसाठी कायदे करताय तर त्यांना विश्वासात घेऊन कायदे करा, एसीत बसून कायदे आखू नका, असा सल्लासुद्धा प्रिन्स यांनी जाता जात दिला.
प्रिन्स यांच्याशी गप्पाटप्पा संपवून आम्ही आंदोलनाच्या मुख्य स्टेजपाशी आलो. दोन वयस्कर माणसं तिथं पाहारा देण्याचं काम करत होते. काही आंदोलनकर्ते स्टेज समोरच्या शामियान्यात ब्लॅंकेट पांघरून झोपले होते.
त्यातले मंजिंदर आणि गुरमेल सिंग हे अनुक्रमे 18 आणि 21 वर्षांचे तरुण मोबाईलवर काहीतरी पाहत बसले होते. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अमृतसरच्या या दोघांची आंदोलनात ड्युटी लागली होती म्हणून ते तिथं पोहोचले होते. पडेल ते काम आम्ही इथं करतो असं त्यांनी सांगितलं.
तिथंच आम्हाला मूळचे गुरुदासपूरचे असलेले 72 वर्षांचे बलकार सिंग भेटले. रात्रीच्या पाहाऱ्याची जबाबजारी त्यांच्यावर देण्यात आली होती.
वर्षभरापूर्वी आंदोलनात पाहारा देण्याचं कारण वेगळं होतं, आता मात्र वेगळं आहे.
वर्षभरापूर्वी आंदोलकांचं सर्वच साहित्य, रसद आणि झोपणं उघड्यावर होतं. बऱ्याचअंशी शेतकरी ट्रॉली किंवा छोट्या तंबूत राहात होते. आता मात्र शेतकऱ्यांनी बांबू आणि ताडपत्रीच्या झोपड्या उभारल्यात. आता या झोपड्यांना आग वगैरे लागू नये म्हणून खबरदारी घेत असल्याचं पाहारा देणारे सांगतात.
तसंच सिंघू सीमेवरील आंदोलनात काही दिवसांपूर्वी हत्येचं आणि टिक्री सीमेवरील आंदोलनात बलात्काराचं प्रकरण घडलं होतं.
या घटना पाहाता आंदोलनात इतर कुठला अनुचित प्रकार घडू नये, कुठल्याही प्रकारे आंदोलनाला लागबोट लागू नये म्हणून जागता पाहारा देणं गरजेचं असल्याचं पहारेकऱ्याचं म्हणणं होतं.
आंदोलनाच्या स्टेजपासून काहीच अंतरावर पुढे गेल्यावर्षी मुस्लिम फेडरेशन ऑफ पंजाबचा डेरा होता. तो मात्र यंदा गायब होता. गेल्यावर्षी या डेऱ्याच 24 तास 'मीठे चावल'चं वाटप सुरू होतं. पण तिथून पुढे असलेला 24 तास लंगर मात्र वर्षभरानंतरही सुरू होता. दाल आणि रोटीचं वाटप मध्यरात्रीसुद्धा तिथं सुरूच होतं. पण गेल्यावर्षी सारखी गर्दी मात्र तिथं नव्हती.
तिथून पुढे गेल्यावर आमची भेट अमेरिकेतून आलेल्या जीत यांच्याशी झाली, थेट विमानतळावरून ते आंदोलन पाहाण्यासाठी आले होते.
रात्र पुढेपुढे सरकत होती आणि थंडीसुद्धा वाढत होती. चहा वाटत फिणाऱ्याकडून चहा घेतला आणि आम्ही पुढे निघालो. तोच लोखंडी तारांचं कुंपण आणि छोटी भिंत बांधून अडोसा तयार करण्यात आलेल्या एका डऱ्यात चुलीवर चहा तयार करण्याचं काम करणारे रणज्योत सिंग दिसले.
दुधाचे व्यापारी असलेले रणज्योत सिंग गेल्या 6 महिन्यांपासून इथंच आहेत. आधी काही काळ आंदोलनाची फोटोग्राफी आणि डॉक्युमेंटरी करण्याचं काम त्यांनी केलं आता मात्र त्यांच्यावर रात्रीचा पाहारा आणि चहा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आलीय.
मोदींनी तर आता आश्वासन दिलंय आता तुम्ही परत जाल का, असं विचारल्यावर मात्र त्यांनी काहीसा अविश्वास दाखवला.
"आमच्या ज्येष्ठ मंडळींनी 1 वर्ष रस्त्यावर काढलंय. गरमी, थंडी, मच्छर, उंदीर अशा सगळ्या स्थितीत ते राहिलेत. पाऊस त्यांनी झेलला आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य झाल्यातर आम्ही निघून जाऊ, पण सरकारच्या नियतीमध्ये जराही खोट वाटली तर मात्र आम्ही जाणार नाही, पण हा सरकारने सर्व मान्य केलं तर मात्र आम्हा जाऊ," असं रणज्योत सिंग म्हणाले.
वर्षभरापूर्वी रात्रीच्यावेळीसुद्धा इथं तरुणांची मोठी गर्दी दिसत होती आता मात्र ती फारशी नव्हती. प्रत्येक डेऱ्यात किंवा तंबूत वर्षभरापूर्वी फळं, भाज्या, अन्नधान्य, पीठ, दूध, तयार अन्नाची पाकीटं यांची मोठी रसद पडलेली दिसून येत होती. आता मात्र ती दिस नव्हती किंवा झोपड्यामुळे ती झाकली गेली असावी.
पुढे गेल्यावर आंदोलनात उभारलेल्या एका चेकपोस्टवर काही तरूण पाहारा देण्याचं काम करत होते. तिथं त्यांच्याशी चर्चा करताना 2 तरुण बाईकवर आले आणि थांबून शेतकऱ्यांची प्रशंसा करू लागले.
प्रशंसा करता करता त्यांनी राकेश टिकैत इथं आहेत का त्यांना प्लीज आत्ताच भेटवा अशी मागणी करायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की हे तरूण दारू पिऊन तिथं आले होते. तेव्हा मला बलकार सिंग यांचं म्हणणं आठवलं...
गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही आंदोलनाच्या ठिकाणी एन्ट्री पॉइंटवरच फक्त पोलिसांची सुरक्षा होती पुढे 5 ते 7 किलोमीटरच्या आंदोलनाच्या पट्ट्यात एकही पोलीस सुरक्षा देताना दिसला नाही.
गेल्यावर्षी मध्यरात्री हुक्का पित बसलेली हरियाणातली ताऊ मंडळी यंदा मात्र दिसली नाही. वर्षभरापूर्वी संपूर्ण रात्रभर दिसणारी हालचाल आता मात्र नव्हती. आता मात्र मध्यरात्री आंदोलनात बरीच शांतात होती.
आधी रात्रीच्यावेळी आंदोलन पाहाता पाहाता पहाट कधी झाली हे लक्षात आलं नव्हतं. पण यंदा मात्र रात्री 3 वाजेपर्यंतच आंदोलन फिरून झालं होतं. काही काळ हातात असल्यामुळे मग आम्हीसुद्धा एका तंबूत काही काळ विश्रांती घेतली...
पण सकाळी उठल्यानंतर मात्र आम्हाला दिसलेलं चित्र फारच चकित करणारं होतं...
कारण वर्षभरापूर्वी एखाद्या जत्रे सारखं वाटणारं आंदोलनाचं चित्र आता मात्र पूर्णपणे पालटलं आहे...
क्रमशः
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)