You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलनाचं 1 वर्ष : दिल्लीच्या सिंघू सीमेवर वसलं संपूर्ण गाव
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
बाजार, दवाखाना, दुकानं, टेलरिंग शॉप, लॉन्ड्री, बकऱ्या, घोडे, पालेभाज्यांचे मळे, पाळीव प्राणी आणि बरंच काही....
हे वर्णन पंजाबमधल्या कुठल्या खेड्याचं नाही तर हे चित्र सध्या दिल्ली-हरयाणा दरम्यानच्या सिंघू बॉर्डरवर दिसून येत आहे. हो! तिच सिंघू बॉर्डर जिकडे गेल्या वर्षभरापासून पंजाब आणि हरियाणातले शेतकरी आंदोलन करत आहेत.
ज्या तीनही कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत ते कायदे खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेण्याची घोषणा केली आहे. पण जोपर्यंत ते कायदे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत सिंघू सीमेवरून मागे न हटण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे.
"आता एक वर्ष झालंय आंदोलनाला. वर्षभरात आम्ही रस्त्यावर आमचे किल्ले आणि महाल बनवले आहेत. सरकारनं केलेल्या घोषणेनं आम्ही संतुष्ट नाही.
"आमचा एमएसपीचा मुद्दा अजूनही सुटायचा आहे. आमच्या इतरही मागण्या आहेत. सरकारनं त्या मान्य केल्या तर आम्ही जाऊ नाहीतर आम्ही 2024 पर्यंतसुद्धा इथं राहू," असं बापू निशेद्दर सिंग गरेवाल यांनी सांगितलं.
बापू निशेद्दर सिंग गरेवाल गेल्या एक वर्षापासून सिंघू सीमेवर आंदोलन करत आहेत आणि वेळ पडली तर पुढेसद्धा आंदोलन करत राहण्याची त्यांची तयारी आहे.
गेल्या एका वर्षभरापासून शेतकऱ्यांनी सिंघू सीमेवरचा साधारण 5 ते 7 किलोमीटरचा रस्ता अडवून ठेवला आहे.
सुरूवातीला फक्त ट्रॅक्टर, ट्रॉली आणि तंबू असं दिसणारं चित्र आता मात्र तिथं पूरतं बदलून गेलं आहे.
पाऊस, थंडी, गरमी, कोरोनाची लाट आणि दिल्लीतलं प्रदूषण यांचा सामना करत वर्षभर रस्त्यावर आंदोलन करत राहाणं सोपं नाही. या सर्वांचे परिणाम इथं वर्षभरानंतर फिरताना पदोपदी दिसून येतात.
आंदोलनाच्या स्टेजवर आता पत्र्याचं छत आलंय. समोर एक भलामोठा पत्र्याचा शामियाना तयार करण्यात आलाय.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला लंगर आजही तिथं आहे. शेतकऱ्यांच्या तंबूंची जागा आता अद्ययावत बांबूंच्या झोपड्यांनी घेतली आहे. अनेक जत्थ्यांमध्ये आता लोखंडी रॉड वापरून मांडव घालण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या झोपड्या किंवा तात्पुरत्या घरांमध्ये आता एसी, टीव्ही, कुलर, फ्रिज, हिटर, गिझर, पंखा, गॅस, भांडी, शोभेची झाडं अशा सगळ्या गरजेच्या गोष्टी या झोपड्यांमध्ये दिसून येतात. लाखो रुपयांचा खर्च या झोपड्यांवर केलेला दिसून येतो.
मग तुम्ही विचार करत असाल की या सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी वीज कुठून येते. एकतर अनेक ठिकाणी जनरेटर आहेत किंवा मग सरळ बाजूच्या सरकारी वीजेच्या खांबांवरून वीज जोडण्यात आलीय.
आता शेतकरी जिथं जमतील तिथं शेतीचे प्रयोग तर होणारच..
अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावरच्या फुटपाथवर मुळा, मेथी, पालक अशा पालेभाज्या लावल्या आहेत. काही ठिकाणी मोठी झाडंसुद्धा लावण्यात आलीयेत.
आंदोलनाच्या स्टेजजवळ आधी एक दलदल आणि कचऱ्याचा ढीग तयार झाला होता. आता तिथं एक छोटं पार्क तयार करण्यात आलंय.
आंदोलन करणारे बहुतांश शेतकरी हे वयस्कर आहेत. त्यामुळे इथं इमर्जन्सी आरोग्य सेवा देणारं 6 खाटांचं हॉस्पिटलसुद्धा उभारण्यात आलं आहे.
स्थानिक लोकांना येण्याजाण्यासाठी आता या आंदोलनातून रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये रोजगारासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची रहदारी सकाळच्या वेळेत इथं दिसून येते.
पण आंदोलनस्थळाच्या आजूबाजूच्या दुकानदारांसाठी मात्र वर्षभरापासून रोजगार नाही. मूळचे यूपीचे असलेले सेहेंदर त्यापैकीच एक आहेत.
रस्त्याच्या कडेला त्यांचं चहा समोसे आणि नाष्ट्याचे पदार्थ विकणारं एक छोटंसं हॉटेल होतं, पण गेल्या एक वर्षापासून ते बंद आहे. परिणामी आता त्यांनी तिथं पानाची गादी सुरू केली आहे.
पण त्यातूनही फारशी कमाई होत नसल्यानं त्यांनी आंदोलनातल्या रस्त्यावर कपडे विकण्याचा व्यावसाय सुरू केला आहे.
त्यांच्यासारखे कपडे, स्वेटर, चपला आणि इतर वस्तूंची दुकानं लावणारे इनेक जण इथं दिसून येतात. त्यांचे ग्राहक असतात ते शेतकऱ्यांनी सोडलेल्या रस्त्यावरून ये-जा करणारे कामगार.
काही स्थानिक कामगारांना या आंदोलनातसुद्धा रोजगार मिळाला आहे.
सुरुवातीच्या काळात आंदोलनात सेवा देण्यासाठी अनेकांची गर्दी होत होती. वेगवेगळी कामं आणि मदत करण्यासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातून लोकांची गर्दी होत होती. पण नंतर मात्र ही गर्दी आटली.
लंगर चालवण्यासाठी लोकांची मदत कमी पडू लागल्यानं मग काही जत्थ्यांनी स्थानिक महिलांना रोट्या बनवण्याची कामं दिली.
मूळच्या बिहारच्या असलेल्या पिंकीसुद्धा त्यापैकीच एक आहे. रोजंदारीवर त्या इथं रोट्या बनवण्याचं काम करतात. त्यांना दिवसाचे 300 रुपये मिळतात.
पिंकी यांचे पतीसुद्धा इथं साफसफाईचं काम करतात. आंदोलन सुरू ठेवण्यासाठी पंजाबच्या प्रत्येक गावातून लोक इथं गटागटानं एका एका आठवड्यासाठी येतात. ज्या कुटुंबांना व्यक्ती पाठवणं शक्य होत नाही ते पैशांच्या रुपात मदत करतात. त्यातूनच या कामगारांचा पगार दिला जात असल्याचं आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितलं.
आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त आता पंजाब हरियाणातून अनेक शेतकऱ्यांची, तरुणांची, महिलांची वर्दळ इथं दिसत आहे. 28 वर्षांचे साजन त्यापैकीच एक आहेत. गेल्या 5 वर्षांपासून ऑस्ट्रेलियात राहाणारे साजन त्यांच्या 4 मित्रांसह आंदोलनात एक आठवड्यासाठी आले आहेत.
"गावातल्या तरुणांनी त्यांचे ग्रुप्स तयार केले आहेत. त्यानुसार मग प्रत्येकाची एकएका आठवड्यासाठी ड्युटी लागत आहे. त्यानुसार तरुण इथं पोहोचत आहेत. आमच्या गावातला कुठलाही तरूण किंवा कुठलंही घर असं नाही तिथून लोक इथं आलेले नाहीत," साजन सांगत होते.
आता इथं अख्ख गावच वसलंय म्हटल्यावर गावात दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी इथंही दिसणार हे ओघाने आलंच.
नशा करून आंदोलनकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची सुद्धा इथं कमी नाही. शिवाय ड्रग्ज विकणारेसुद्धा कधीकधी इथं येण्याचा प्रयत्न करत असल्याचं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही त्यामुळे हे आंदोलन बदनाम होऊ देण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही, असं आंदोलक शेतकरी वीर सिंग सांगतात.
"ड्रग्ज विकणारे अनेकदा फिरत असतात. त्याची अजिबात कमी नाही. दिल्लीत तर ते दिवसाढवळ्या फिरत आहेत. इथं येणारे-जाणारे लोक सांगतात. विकणारे अनेक लोक फिरत आहे, ज्यांना हे आंदोलन खराब करायचं आहे, लोकांना आपआपसात लढवायचं आहे," वीर सिंग सांगतात.
अमृतसरमधून आलेले 30 वर्षांचे गुरप्रेज सिंग आणि त्यांच्याबरोबरची मंडळी आंदोलनात मोफत लॉन्ड्री चालवत आहेत. तर खन्न्यातून आलेले 25 वर्षांचे सुखविंदर सिंग इथं शेतकऱ्यांसाठी मोफत कपडे शिवून देत आहेत. संपूर्ण आंदोलन स्थळाची सुरक्षा आता निहंग सिखांनी ताब्यात घेतली आहे.
वर्षभरापूर्वी इथं हरियाणातून आलेल्या शेतकऱ्यांची संख्यासुद्धा मोठी दिसून येत होती. आता मात्र हे आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांनीच चालवलेलं जास्त दिसून येतंय.
नाही म्हणायला इथं हरियाणच्या शेतकऱ्यांचा एक शामियाना दिसून आला, पण तिथं फारश्या लोकांची उपस्थिती नव्हती.
वर्षभरानंतर आता मागण्या मान्य झाल्यामुळे इथले शेतकरी आंदोलन संपवतील. रस्ता मोकळा होईल. वाहतूक पूर्ववत होईल. आजूबाजूच्या दुकानदारांचा व्यावसाय हळूहळू पूर्वपदावर येईल.
पण शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि शेती क्षेत्रातल्या सुधारणाचं पुढे काय होणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)