Paytm: पेटीएमचे शेअर्स का कोसळले?

    • Author, आलोक जोशी
    • Role, ज्येष्ठ आर्थिक विश्लेषक

पेटीएमचे शेअर म्हणजे पेटीएम चालवणारी कंपनी वन नाइन्टी सेवन कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर पहिल्याच दिवशी दणकून कोसळले. हे काही अनपेक्षित नव्हतं.

कंपनीचं कामकाज, कंपनीला झालेला फायदा आणि तोटा, कंपनी ज्या व्यवसायात आहे, या क्षेत्रातली वाढती स्पर्धा यासह कंपनीच्या अनिश्चित भविष्याविषयी साशंकता लक्षात घेता तज्ज्ञांनी पेटीएममध्ये पैसे गुंतवणं फायदेशीर ठरणार नाही असं सांगितलं होतं.

शेअर बाजाराचं वैशिष्ट्य आहे की मोठ्या कंपनीबाबत कोणी वाईट बोलत नाही. त्यामुळे या कंपनीत पैसे गुंतवू नका असं थेट कोणी बोललं नाही. पण बोलता बोलता असे संकेत दिले की यात पैसे नाही गुंतवलेत तरी चालेल.

आयपीओ येण्याआधी येणाऱ्या अहवालांमध्ये याला अव्हॉइड किंवा स्किपचं रेटिंग म्हटलं जातं.

काही लोक याला इन्व्हेस्ट फॉर लाँग टर्म म्हणतात. सांगणारे असंही सांगतात की कंपनीचा कारभार चांगला आहे त्यामुळे प्रदीर्घ काळ शेअर बाळगण्याचा सल्ला देतात. पण कंपनीची सध्याची स्थिती चांगली नाही, यामुळे कंपनीचे शेअर घेऊन कदाचित आता फायदा होणार नाही पण प्रदीर्घ काळ घेतले तर फायदा होऊ शकतो असं सांगितलं जातं. आता अर्थात या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत.

नफा कमावण्यासाठी वाट पाहावी का?

खरा प्रश्न हा आहे की देशातला सगळ्यात मोठा आयपीओ पेटीएमने बाजारात आणला. याद्वारे पेटीएमने बाजारातून 18 हजार तीनशे कोटी एवढी प्रचंड रक्कम उचलली. लिस्टिंगच्या दोन दिवसातच कंपनीची मार्केट कॅप 39 हजार कोटी रुपयांनी घसरली.

ज्या लोकांनी 2150 रुपयांमध्ये शेअर खरेदी केला त्यांना पहिल्याच दिवशी कमीत कमी 9 टक्के आणि जास्तीत जास्त 27.5 टक्के नुकसान झालं आहे.

यानंतरही घसरण थांबेल की नाही हे सांगता येणं अवघड आहे. एका आंतरराष्ट्रीय ब्रोकरेजने पेटीएमचा भाव 1200 रुपये असल्याचं सांगत अंडरपरफॉर्म रेटिंगचा रिपोर्ट जारी केला आहे. लिस्टिंगच्या दिवशी बाजार उघडण्याआधीच हा अहवाल समोर आला होता.

ज्या गुंतवणूकदारांनी पेटीएमचे शेअर विकलेले नाहीत, जे पहिल्या दिवशी विकू शकले नाहीत ते पुढे काय करणार हे सोमवारी बाजार उघडल्यानंतर स्पष्ट होऊ शकेल. कारण जाणकार सांगतात की जे नुकसान होत आहे ते झेलूनही पेटीएमचे शेअर विकणं इष्ट आहे.

विश्लेषक अपयशी का ठरले?

पण मुद्दा फक्त पेटीएमचा नाही. अनेक तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज आणि दिलेला सल्ला धुडकावून पेटीएममध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांचा प्रश्न आहे. ते काय विचार करत होते? त्यांना स्वत:च्या पैशाची काळजी नव्हती का?

10 म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापकांनी एंकर इन्व्हेस्टर म्हणून फंडाचा पैसा गुंतवला आहे. ते अर्थसाक्षर आहेत. या क्षेत्रातल्या उलाढाली आणि खाचाखोचा माहिती असलेले आहेत. आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मग त्यांचं काय झालं?

याचं उत्तर सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या FOMO या संकल्पनेत आहे. fear of missing out असं याचं पूर्ण रुप आहे.

काही दिवसांपूर्वीच झोमॅटो कंपनीचा आयपीओ बाजारात आला होता. ही कंपनीही फार कमावत नाही. उलट तोट्यातच चालत होती. भविष्यात कधी फायदा कमावणार सांगता येत नाही. पण जेव्हा शेअर लिस्ट झाले ते 53 टक्क्यांनी वधारून. अलीकडेच नायका कंपनीचा आयपीओही आला. ही कंपनी तोट्यात नाही. अलीकडेच कंपनीला नफा झाल्याचं स्पष्ट आहे.

पण तिथेही जितका नफा आहे त्याच्या तुलनेत शेअरच्या किमती प्रचंड आहेत. तरीही ज्या लोकांनी पैसा गुंतवला आहे, पहिल्या दिवशी दुप्पट झाला. असे अनेक आयपीओ बाजारात आले आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला आहे. आयपीओंपैकी मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला गेला आणि खूपच कमी लोकांना शेअर मिळाले.

राग आणि निराशा

ज्या लोकांनी एकामागोमाग एक पैसे गुंतवले आणि काही मिळालं नाही, ते आजूबाजूच्या लोकांना पाहून चिडून किंवा हताश होऊन प्रत्येक इश्यूत पैसे गुंतवत आहेत. काहीतरी फायदा होईल या इच्छेसह.

याच विचारातून लोक प्रत्येक आयपीओमध्ये पैसे गुंतवत आहेत आणि त्यांना फटका बसतो आहे. 2021 मध्ये मोठ्या प्रमाणावर आयपीओ आले आहेत. 50 कंपन्यांची लिस्टिंग झालं आहे. 31 टक्के कमाई झाली आहे. हा लिस्टिंगच्या दिवशीचा आकडा आहे.

याचा अर्थ प्रत्येक आयपीओत कमाई झाली असं नाही. पेटीएमची गोष्ट सगळ्यांत भीषण अशी आहे. पहिल्याच दिवशी शेअर इश्यू प्राईस 27.5 टक्क्यांनी खाली घसरून बंद झाला. याआधीही काही कंपन्यांच्या लिस्टिंगवेळी मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालं होतं.

कल्याण ज्वेलर्स, विंडलास बायोटेक सारख्या कंपन्यांचा यात समावेश होतो. या कंपन्यांना 10 टक्क्यांहून जास्त नुकसान झालं आहे. सूर्योदय, कारट्रेड, नुवोको विस्टाज, एसआयएस एंटरप्रायझेस अशा कंपन्या आहेत ज्यांना लिस्टिंगच्या दिवशी 5 ते 10 टक्क्यांचं नुकसान झालं आहे.

लिस्टिंग खराब झालं म्हणजे कंपनीचा कारभार वाईट असा अर्थ होत नाही. याआधी असं घडलंय जेव्हा कंपनीचा आयपीओ पूर्ण भरला नाही किंवा लिस्टिंगच्या दिवशी शेअर खालीच राहिला पण नंतर जोरदार नफा कमावला.

कमाई करणारे आयपीओ

आयपीओमध्ये मध्यम सुरुवातीचे उदाहरणं म्हणजे इन्फोसिस, एचडीएफसी, मारुती यांचे शेअर्स. या सगळ्या कंपन्यांचे इश्यू पूर्ण भरतानाही अडचणी आल्या. मात्र नंतर या कंपन्यांनी जोरदार बाजी मारली.

शेअर बाजारात यशस्वी कंपन्यांची चर्चा होते तेव्हा त्या कंपन्यांकडे सुरुवातीला कोणी लक्ष दिलेलं नसतं. जेव्हा लोकांचं लक्ष जातं तोवर बराच उशीर झालेला असतो.

नव्या स्वरुपाचं काम किंवा सर्वस्वी नव्या क्षेत्रात उतरलेल्या कंपन्यांच्या बाबतीत असं होतं. तुम्ही त्यांची उत्पादनं वापरत असता किंवा सेवेचा लाभ घेत असता पण पैसे गुंतवायला तुमचं मन धजावत नाही. नंतर लक्षात येतं की कमाईचं मोठं घबाड आपण गमावलं आहे.

ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. अशी खूप उदाहरणं आहेत. त्यामुळेच लोकांच्या मनात भीती आहे की पेटीएम बाबतीतही मोठ्य़ा कमाईची संधी आपण गमावली की काय?

ज्या क्षेत्रात ही कंपनी आहे, त्या क्षेत्रातली ही दिग्गज कंपनी आहे. ज्यांनी यात पैसे गुंतवले ते दिवसातून दोन चारवेळी पेटीएम करत असणार. त्यावरून असं वाटतं की कंपनीचं बरं चाललं आहे. पैसे गुंतवायला काय हरकत आहे?

खूपच कमी लोकांनी हे समजून घेतलं की कंपनी जेवढी उलाढाल करते आहे त्यापैकी फारच थोडा पैसा कंपनीकडे नफा म्हणून जमा होतो आहे. मोठा हिस्सा बँकांकडे वर्ग झाला आहे.

हा एकूण पैसा आहे. खर्च वगळला तर कंपनी तोट्यातच आहे. बहुतांश लोकांना हे माहिती होतं तरीही त्यांनी पेटीएममध्ये पैसे गुंतवले. इशू जारी झाल्यानंतर शेअर वधारला तर संधी हातची जाईल या विचारातून लोकांनी पैसे गुंतवले. यालाच फिअर ऑफ मिसिंग आऊट म्हटलं जातं.

बाजार उंचावणं

जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा वातावरणात असलेल्या भीतीचा फायदा उठवण्यासाठी कंपन्या बाजारात येतात. मर्चँट बँकर आणि लीड मॅनेजर त्यांना कंपनीच्या उज्वल भविष्याचं चित्र रंगवून सांगतात. चढ्या भावाने शेअर विकण्यात ते यशस्वी होतात.

नंतर जेव्हा भाव मिळत नाही किंवा नुकसान होतं तेव्हा पैसा ओतणाऱ्यांना तोटा होतो असं नाही तर अनेकजण बाजार सोडून पळ काढतात. काही तर शपथही घेतात की पुन्हा शेअर बाजारात पैसा गुंतवणार नाही. गेल्या वर्षभरात बाजारात दोन कोटींहून अधिक गुंतवणूकदार दाखल झाले आहेत.

भीती याचीच की व्यवहारादरम्यान या लोकांची जीभ दुधाने पोळली तर ते नंतर ताकही फुंकून पितील.

यापुढे आयपीओच्या जाहिरातीत जोखमेचा उल्लेख स्पष्टपणे यायला हवा असं सेबीचं म्हणणं आहे. म्हणजे कामकाजात, व्यवहारात किती जोखीम, धोका आहे याचा स्पष्ट उल्लेख असायला हवा.

हे स्पष्ट करणं आवश्यक आहे की आयपीओ ही शेअर बाजारात पैसे कमावण्याची एकमेव सुवर्णसंधी नाही. अनेक जाणकार असं सांगतात की तुम्हाला चांगले शेअर खरेदी करून प्रदीर्घ काळ राहायचं असेल तर तुम्ही आयपीओपासून दूर राहा. खुल्या बाजारातून चांगले शेअर खरेदी करून उत्तम कमाई करता येऊ शकते.

गुंतवणुकीचे सिद्धांत थोडा वेळ बाजूला ठेवले तरीही पैसे गुंतवणाऱ्या लोकांनी किमान एवढी मेहनत करायला हवी की कंपनीबाबत प्राथमिक माहिती तपासून पाहायला हवी. ज्या भावाला कंपनी शेअर विकते आहे तेवढा पैसा कंपनीकडे यायला किती वेळ लागेल. कंपनी किती वेगाने नफा कमावू शकते किंवा कारभार वाढवून परीघ वाढवू शकतो याचा अंदाज घ्यायला हवा.

तुम्ही एवढंही करू शकत नसाल तर मग शेअर बाजाराला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.

(Disclaimer: शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मतं ही त्यांची वैयक्तिक आहेत. गुंतवणूक करताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा.)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)