झारखंडच्या सिंहभूममध्ये सर्वात आधी समुद्रातून बाहेर आली होती भूमी - नवे संशोधन

फोटो स्रोत, Dr Priyadarshi Chowdhury
- Author, रवी प्रकाश
- Role, रांचीहून, बीबीसी हिंदीसाठी
सिंहभूम हा जगातील पहिला क्रेटॉन (खंड) होता का? झारखंडमधील सिंहभूम आणि त्याला लागून असेलल्या ओडिशामधील काही भाग हा समुद्रातून सर्वात आधी वर आलेला होता का?
पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर समुद्रात बुडालेल्या धरतीमधून क्रेटॉनच्या रूपात सर्वात आधी पाण्याच्या बाहेर आलेला तुकडा हा सिंहभूम होता का?
एका नव्या संशोधनानुसार या सर्व प्रश्नांची उत्तरं 'हो' अशी आहेत.
अमेरिकेतील प्रसिद्ध पत्रक 'प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स (पीएनएएस)' मध्ये गेल्या आठवड्यात प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार 310 कोटी वर्षांपूर्वी सिंहभूम या क्रेटॉनची उत्पत्ती झाली होती. म्हणजे हा भाग पाण्याबाहेर आला होता.
त्यावेळी भूमीचं अस्तित्व समुद्राखालीच असायचं. पण भूमीच्या 50 किलोमीटर आत झालेल्या एका मोठ्या ज्वालामुखी स्फोटामुळं पृथ्वीचा हा भाग (सिंहभूम क्रेटॉन) समुद्राबाहेर आला होता.
संशोधनात कुणाचा सहभाग?
हा शोधनिबंध ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि अमेरिकेच्या आठ संशोधकांनी दीर्घकाळ केलेल्या संशोधनानंतर लिहिला आहे. यापैकी चार जण विदेशात राहणारे भारतीय वंशाचे संशोधक आहेत.
याचे प्रमुख लेखक ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध मोनाश विद्यापीठाचे संशोधक डॉ. प्रियदर्शी चौधुरी आहेत. ते याठिकाणच्या स्कूल ऑफ अर्थ अॅटमॉस्फिअर अॅण्ड इनव्हायर्नमेंटशी संलग्न आहेत.

फोटो स्रोत, Dr Priyadarshi Chowdhury
33 वर्षांचे डॉ. चौधुरी भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे नातेवाईक पश्चिम बंगालच्या आसनसोल शहरात राहतात. त्यांनी सुरुवातीचं शिक्षण आसनसोल आणि कोलकातामधील प्रसिद्ध जादवपूर विद्यापीठातून घेतलं.
2013 ते 2018 दरम्यान ते जर्मनीत राहिले. त्याठिकाणाहून त्यांनी पीएचडी पूर्ण केली. गेल्या तीन वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियात आहेत. याठिकाणी ते पृथ्वीवर खंडांची उत्पत्ती कशी झाली, याचं संशोधन करत आहेत.
''सिंहभूम परिसरात अडीच वर्षे चाललेल्या संशोधनानंतर आणि त्यानंतरच्या तांत्रिक अभ्यासानंतर आम्ही, सिंहभूम हे जगातील पहिलं क्रेटॉन होतं, असं दावा करून सांगू शकतो. सिंहभूमचा अर्थ केवळ झारखंडचं सिंहभूम नसून एक मोठा परिसर आहे. त्यात ओडिशाचे धालजोरी, क्योंझर, महागिरी आणि सिमलीपालपर्यंतच्या ठिकाणांचा समावेश आहे,'' असं डॉ. प्रियदर्शी चौधुरी यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.
''आम्ही याठिकाणी सापडलेल्या विशिष्ट प्रकारच्या खडकाचा अभ्यास करून ते 310 ते 320 कोटी वर्ष जुने असल्याची माहिती मिळवली आहे. आम्हाला इथं आढळललेल्या सँड स्टोन (वाळूचे दगड) ची आमच्या शोधसाठी मदत झाली. त्यानंतर आम्ही हा शोधनिबंध लिहिला. मार्चमध्ये तो दाखल केला. त्यानंतर रिव्ह्यू म्हणजे याच्या समीक्षेच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर आमचा लेख प्रकाशित झाला आणि अशाप्राकारे आमच्या शोधाला मान्यता मिळाली,'' असंही ते म्हणाले.
या संशोधनात डॉ. प्रियदर्शी चौधुरी यांच्यासह सूर्यजेंदू भट्टाचार्यी, शुभोजित राय, शुभम मुखर्जी (सर्व भारतीय वंशाचे), जॅकब मल्डर, पीटर केवूड, अॅशली वेनराइट (सर्व ऑस्ट्रेलियातील) आणि ओलिव्हर नेबेल (जर्मनी) यांचा समावेश होता.
असं समजलं दगडांचं वय
''गाळांपासून तयार झालेले खडक आणि वाळूचे दगड याचं वय शोधणं अत्यंत कठिण काम आहे. आम्ही सिंहभूम परिसरात आढळलेले दगड आमच्या विद्यापीठात घेऊन आलो आणि त्याचा बारीक चुरा केला. चाळणीतून अगदी केसाएवढ्या सूक्ष्म आकाराचे बारीक तुकडे वेगळे करून त्याचा अभ्यास केला,'' असं डॉ. प्रियदर्शी यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Dr Priyadarshi Chowdhury
''त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या रासायनिक अभ्याद्वारे त्याचं वय शोधलं. या खडकांमध्ये आढळलेल्या जिरकॉन नावाच्या खनिजामुळं त्याच्या वयाचा नेमका अंदाज लावण्यास मदत मिळाली,'' असं ते म्हणाले.
''या संशोधनातून आमच्या असं लक्षात आलं की, सिंहभूम क्रेटॉन जवळपास 310 कोटी वर्षांपूर्वी तयार झाला होता. त्यावेळी ज्वालामुखी स्फोटांमुळं भूमीचा हा भाग हलका झाला आणि हिमखंडाप्रमाणे तो तरंगत समुद्राबाहेर आला.
त्यानंतरच्या काळात जगातील इतर भागांमध्येही क्रेटॉन तयार झाले. सिंहभूम क्रेटॉन खरं म्हणजे, दक्षिण आफ्रिका आणि पश्चिमी ऑस्ट्रेलियातील क्रेटॉन सारखेच आहेत. त्यात प्रचंड साम्य आहे,'' असं ते म्हणाले.
क्रेटॉन काय आहे?
गाळापासून तयार झालेले खडक आणि वाळूपासून तयार झालेले दगड हे प्रामुख्यानं उथळ नद्यांच्या उगमाच्या ठिकाणी आणि समुद्र किनाऱ्यावर तयार होतात.

फोटो स्रोत, Dr Priyadarshi Chowdhury
सिंहभूममध्ये असलेल्या मोठ्या खडकांवर समुद्राच्या लाटांच्या खुणा आढळतात. अनेक वर्षे समुद्राच्या लाटा धडकल्यानं त्या खुणा तयार झाल्या असतील. त्याच्या खुणा याठिकाणी पाहायला मिळाल्या. सिंहभूमच्या चायबासा आणि सारंडामधील जंगलांमध्ये असे खडक आढळतात. मात्र, याबाबत प्रथमच अशाप्रकारचं संसोधन झालं आहे.
क्रेटॉन हा ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ खंड असा होतो. भूशास्त्रज्ञांच्या मते, जगात 30 क्रेटॉन आहेत. त्यापैकी 10 मोठ्या आकाराचे आहेत. या 10 पैकी 4 भारतात आहेत.
डॉ. प्रियदर्शी यांनी भारतात सिंहभूमशिवाय बस्तर, बुंदेलखंड आणि धारवाडमध्ये असे क्रेटॉन असल्याचं सांगितलं. म्हणजे हे पृथ्वीवरील सर्वात जुने खंड आहेत.
याचाच अर्थ पृथ्वीवरील जीवन किंवा वस्ती, संस्कृतीचा विकास याठिकाणीच सर्वात आधी झाला. असे क्रेटॉन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतही आहेत.
पृथ्वीचं वय अंदाजे 450 वर्षे आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वी जन्माच्यावेळी अत्यंत उष्ण होती. लाखो वर्षांनंतर ही थंड झाली आणि याठिकाणी पाण्याची निर्मिती झाली. धूमकेतूंमुळे समुद्र तयार झाले. त्यानंरत 310 कोटी वर्षांपूर्वी भौगोलिक परिवर्तनामुळं खंड तयार व्हायला सुरुवात झाली.

फोटो स्रोत, Dr Priyadarshi Chowdhury
सिंहभूममध्ये असा पहिला खंड तयार झाला. या खंडांच्या निर्मितीमुळं वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं आणि समुद्राच्या पाण्यात फॉस्फरस आणि इतर खनिजांचा समावेश झाला.
संशोधनाचा फायदा?
संपूर्ण जग हवामान बदलाबाबत चर्चा करत असताना, आपलं वातावरण, समुद्र, खंड, हवामान तयार कसं झालं हे जाणून घेणं, अत्यंत गरजेचं आहे. नेमक्या कोणत्या भौगोलिक प्रक्रियांमुळं पृथ्वी मानव किंवा प्राण्यांच्या राहण्यायोग्य बनली, हे समजायला हवं.

फोटो स्रोत, Facebook/Nitish Priyadarshi
हे संशोधन एका मोठ्या प्रकल्पाचा केवळ एक छोटासा भाग आहे. अद्याप सखोल संशोधन व्हायचं आहे. त्यामुळं पृथ्वीची अनेक रहस्य समोर येऊ शकतात.
इतर तज्ज्ञ काय म्हणतात?
या नव्या संशोधनामुळं जगातील भूविज्ञान क्षेत्राला आणि अभ्यासक तसेच विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असं रांची विद्यापीठातील भूविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. नितीश प्रियदर्शी यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
"झारखंडचा भाग हा सर्वात जुन्या भूविज्ञानाशी संबंधित घटनांचा साक्षीदार राहिला आहे, हे स्पष्टच आहे. डॉ. प्रियदर्शी चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंहभूम क्रेटॉनबाबत केलेले दावे हे जुन्या काही शोधांचं विस्तारीत रुप आहे. या संशोधनामुळं अधिक सटिकपणे या गोष्टी मांडल्या आहेत,'' असं ते म्हणाले.
''खंडांच्या उत्पत्तीबाबत आजवरच्या दाव्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं आणि अधिक प्रामाणिकपणे या संशोधनातून सिंहभूम क्रेटॉनची उत्पत्ती 310 कोटी वर्षांपूर्वी झाल्याचं सांगितलं आहे. याचाच अर्थ म्हणजे, पृथ्वीवर क्रेटॉनची निर्मिती आतापर्यंतच्या आपल्या माहितीच्या शेकडो वर्षांपूर्वी सुरू झालेली होती," असं ते म्हणाले.
"यापूर्वी 2006 मध्ये पोलंड, भारत आणि जपानच्या काही भूविज्ञान शास्त्रज्ञांनी संशोधनात पृथ्वीवरील पहिला भूकंप आणि त्सुनामी हे 160 कोटी वर्षांपूर्वी झारखंडच्या भागात आले होते, असा दावा केला होता. म्हणजेच याठिकाणी समुद्र होता. त्या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक रजत मजुमदार होते. त्यांचा शोधनिबंध 'सेडिमेंटरी जियॉलॉजी' नावाच्या पत्रिकेत प्रकाशित झाला होता. त्याला 'चायबासा फॉर्मेशन' म्हटलं गेलं," असंही डॉ. नितीश प्रियदर्शी म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








