You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जय भीममधल्या खऱ्या 'सेंगिनी'ची व्यथा- माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय, पिक्चर बघून काय करू?
- Author, एस. आनंदप्रिया
- Role, बीबीसी तमीळसाठी
एका दागिन्यांच्या चोरीचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला पोलीस कस्टडीत इतकी मारहाण होते की त्याचा मृत्यू होतो. पोलीस आपल्या हातून झालेला गुन्हा लपवायचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर उभा राहातो न्यायाचा प्रदीर्घ लढा.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या आणि सगळीकडे कौतुक झालेल्या 'जय भीम' या चित्रपटाची ही कथा.
तमीळ सुपरस्टार सूर्याच्या 'जय भीम' चित्रपटात आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या सेंगिनीच्या पात्राचं वास्तव आयुष्यातलं नाव आहे पार्वती. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते बालकृष्णन यांनी सूर्याला पार्वती यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना मदत करण्याची विनंती केली होती.
सूर्याने या विनंतीला प्रतिसाद देत ट्वीट करून पार्वती यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. सूर्याने पार्वती यांना 10 लाख रुपयांचा धनादेशही दिला.
बीबीसी तमीळने पार्वती यांच्याशी संवाद साधून भूतकाळातल्या घटना आणि त्यांचं आताच आयुष्य याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या मुलाखतीचा हा संपादित अंश...
'जय भीम' पाहिल्यानंतर अनेकांना पार्वती कोण आहेत हे कळलं. तुमचं सध्याचं आयुष्य कसं आहे?
- मी सध्या माझी मुलगी, जावई आणि नातवंडांसोबत राहतीये. ते सगळे मोलमजुरी करतात. माझं वय आणि तब्येत यांमुळे मी मजुरीला जाऊ शकत नाही.
अभिनेता सूर्या यांनी तुमची भेट घेतली आणि तुम्हाला धनादेशही दिला. तुमचं काय बोलणं झालं?
- मला आनंद झाला. आम्ही फारसं बोललो नाही. त्यांनी मला चेक दिला आणि तो बँकेत जमा करायला सांगितलं. मला या रकमेचं व्याज मिळत राहील आणि माझ्यानंतर माझ्या मुलीला, नातवंडांना पण ती रक्कम मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. इतरही खूप लोक आता मला मदत करायला पुढे येत आहेत.
तुम्ही 'जय भीम' सिनेमा पाहिला का?
माझ्या नातवंडांनी माझ्यासाठी मोबाईलवर सिनेमा लावला होता. पण मी तो सगळा नाही पाहू शकले. मी सगळ्या आशा सोडून दिल्या आहेत, मी थकले आहे...माझ्या नवऱ्याचा जीव तर गेलाय, मी सिनेमा पाहून काय करू?
पण त्यावेळी खरंच काय घडलं होतं?
मी भात लावणीसाठी ओथागोपालपुरमला गेले होते.
आमच्या शेजारी एक चार मजली घर होतं. त्या घरातल्या मुलीचं गावातल्या एकासोबत प्रेमप्रकरण होतं. एके दिवशी ती चाळीस तोळे सोनं आणि 50 हजार रुपये रक्कम घेऊन घरातून कोणालाही न सांगता निघून गेली.
रात्री दहा वाजायच्या सुमारास आमच्या घरासमोर पोलिसांची गाडी येऊन थांबली. सब-इन्स्पेक्टरनं म्हटलं की, इन्स्पेक्टरना आमच्याशी बोलायचं आहे आणि आम्हाला पोलिस स्टेशनला यायला सांगितलं.
माझ्या नवऱ्याला पोलिसांची भीती वाटायची. तो नेहमीच मारामारीपासून दूर राहायचा. पोलिस घरी आल्याचं त्याला माहीत नव्हतं. तो घरी नव्हता. पोलिसांनी मला त्याच्याबद्दल विचारलं. मी म्हटलं की, मला काही माहीत नाही. त्यानंतर पोलिसांनी माझ्या मुलांना, दिरांना आणि मला गोपालपुरमला नेलं. तिथं त्यांनी मोठ्ठे कुत्रे आणले आणि त्यांना आमचा वास घ्यायला दिला.
आम्ही जर दागिने चोरले असते, तर कुत्र्यांना तो वास लागला असता ना? पण ते केवळ ज्या घरातून दागिने चोरीला गेले होते, तिथेच हुंगत राहिले. आमच्या जवळही आले नाहीत. गावातील काही लोकंही आमच्या बाजूने बोलले. पण आम्हाला पोलिस स्टेशनला नेलं आणि वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेऊन अमानुषपणे मारहाण केली. मी आजही माझा हा हात उचलू शकत नाही.
आम्हाला काय मारताय असं विचारल्यावर त्यांनी चोरलेले दागिने आणि पैसे द्या एवढंच म्हटलं.
त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि गावातले लोक माझ्या नवऱ्याकडे गेले, त्यांनी त्याला पोलिस स्टेशनमध्ये जायला सांगितलं. आम्हालाही पोलिस स्टेशनला नेल्याचं सांगितलं. तो पोलिस स्टेशनला जायच्या आधीच त्याला पकडून गावाच्या प्रमुखाच्या गाडीत कोंबलं.
या दोन गावांच्या दरम्यान जंगलाचा परिसर आहे. त्याला त्या जंगलात नेण्यात आलं आणि एका झाडाला बांधून मारहाण केल्यानंतरच त्याला पोलिस ठाण्यात आणलं.
पोलिस ठाण्यात खुर्चीवर पोलिस उपनिरीक्षक बसलेले होते, त्यांच्या पायात चपला होत्या. मी त्यांचे पाय धरले आणि नवऱ्याला सोडण्यासाठी अक्षरशः भीक मागू लागले. त्यानं काहीही चुकीचं केलं नसल्याचं मी म्हणाले, पण त्यांनी मला लाथ मारली.
त्यानंतर त्यांनी मला सोडून दिलं. मात्र माझा नवरा, कुल्लन आणि गोविंदराजन यांना पोलिस ठाण्यातच ठेवलं. त्यांनी माझ्या दिराची बोटं मोडली आणि त्याला मारहाण केली. आजही त्यांच्यावर या हल्ल्याचा परिणाम स्पष्टपणे जाणवतो.
(हे सांगितल्यानंतर काही वेळ पार्वती शांत झाल्या.)
"चार वाजेपर्यंत माझा मुलगा आणि माझ्या दीरांची सुटका करण्यात आली, तर मला पतीसाठी दुसऱ्या दिवशी जेवण घेऊन यायला सांगण्यात आलं. मी नवऱ्यासाठी भात आणि सुक्या माशाची भाजी तयार केली. त्याला नग्नावस्थेत खिडकीला बांधलेलं होतं. पोलिस ठाण्याच्या भिंतींवर रक्त उडालेलं होतं.
आम्ही त्यांना विनंती करू लागलो, "तुम्ही त्यांचा छळ का करत आहात? आम्ही चोरी केलेली नाही". त्यावर 'चोरी केलेले पैसे आणि दागिने परत केले तरच आम्ही सोडू , असं त्यांनी सांगितलं.
त्यांनी त्याचे केस धरले आणि सलग त्याला लाथांनी मारत राहिले. मी जेव्हा त्याला भात खाऊ घातला, तेव्हा त्यानं खाल्ला नाही. त्यांनी त्याचा डोळाही जखमी केला होता. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्याही त्यानं घेतलेल्या नव्हत्या. पोलिस उपनिरीक्षक दारु प्यायलेले होते. माझा नवरा नाटक करत आहे का, हे त्यांना तपासायचं होतं. त्यामुळं त्यांनी पाण्यात लालतिखट मिसळलं आणि ते त्याच्या नाकात आणि तोडात ओतून त्याला मारहाण करत राहिले. पण त्याचा मृत्यू झालेला होता.
ते पाहिल्यानंतर पोलिस कर्मचारी आपसांत बोलू लागले होते. मला काहीही समजत नव्हतं. त्यांनी मला मारहाण केली आणि तिथून हाकलून दिलं. मी बस पकडली आणि विरुथाचलमला गेले. मी गावी जाण्यासाठी तिथं बसची वाट पाहत होते. त्यावेळी एक पोलिसांची गाडी आमच्या गावाकडे गेली. पोलिस कर्मचारी अँटनीसामी, वीरसामी आणि रामासामी यांनी राजकन्नू फरार झाल्याचं सांगितलं.
मी गावात पोहोचले. तेव्हा त्यांनी आधीच माझ्या दीरांना नेलं होतं. गावातील लोकांनी मला सर्वकाही सांगितलं. मी त्याच बसने परत पोलिस ठाण्यात गेले. पक्षातील लोकांनी मला पोलिस ठाण्यात काय होतं ते पाहायला सांगितलं. मारहाणीचा आवाज येतो का तेही पाहायला सांगितलं. पण पोलिस ठाण्यात एका पोलिसाशिवाय कोणीही नव्हतं. तोही
दाराजवळ एका पलंगावर झोपलेला होता. ठाण्यात शांतता होती. त्यांनी मृतदेह जयनकोंडम मध्ये फेकला होता. आम्ही जवळच्या चहाच्या दुकानावर जाऊन चहा प्यायलो. पण त्या ग्लासमधून रक्ताचा वास येत होता. त्यामुळं आम्ही चहा फेकला आणि गावाकडे निघालो. तोपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते आणि गावातील लोक जमले होते.
मी बसमधून उतरले आणि लगेचच बेशुद्ध झाले. नेमकं काय चाललंय. ते त्यांनी मला विचारलं. मी जेव्हा त्यांना सर्व सांगितलं, तेव्हा सगळे जमले आणि पोलिस ठाण्याकडं गेलं. आधीच ठाण्यामध्ये जे लोक होते, त्यांनाही धमक्या देण्यात आल्या होत्या.
"राजकन्नुची हत्या झाली आहे, हे कोणालाही सांगायचं नाही. नसता तुमच्याबरोबरही तसंच करू", अशी धमकी त्यांना देण्यात आली होती. त्या सर्व आरोपींना दुसऱ्या तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. ते त्या घटनेचे साक्षीदार होते आणि प्रचंड घाबरलेलेही होते.
पोलिसांपासून लपण्यासाठी आम्हाला पक्षाच्या कार्यालयात लपण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर आम्ही कडलोरला याचिका दाखल करण्यासाठी गेलो. दुसरीकडं पोलिस पळून गेलेल्या राजकन्नुला शोधण्याचं नाटक करत होते, आणि त्यानंतर खटला सुरू झाला".
हे सगळं घडलं तेव्हा तुमचं वय काय होतं?
मी तरुण होते. मात्र गोविंदन (मदनाई CPM शाखेचे सचिव) यांनी चुकून माझं वय 40 आणि माझ्या पतीचं वय 35 नोंदवलं. त्यावेळी धक्क्यात असल्यामुळं आम्ही याबाबत काहीही करू शकलो नाही. 13 वर्षांच्या सुनावणीनंतर निकाल देण्यात आला. मला मिळालेल्या 2 लाख रुपयांपैकी एक लाख आणि वर काही पैसे मी बँकेत ठेवले. त्यातून मला दर महिन्याला काही पैसे मिळतात.
उरलेले पैसे माझ्या दीरांना देण्यात आले. कुल्लन आणि गोविंदराजन यांचंही निधन झालं आहे. मला तीन मुलं होती. एक मुलगा पित्याच्या मृत्यूच्या धक्क्यानं निधन पावला. पोलिसांनी मोठ्या मुलाला मारलं तेव्हा त्याच्या कानाला दुखापत झाली. तो आता मानसिक रुग्ण बनला आहे. माझ्याबरोबर सध्या केवळ माझी मुलगीच आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)