सूर्याच्या 'जय भीम' सिनेमातील 'या' सीनवरुन वाद का? #5मोठ्याबातम्या

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया,

1. 'जय भीम' सिनेमातील 'या' सीनवरुन वाद

तमीळ सुपरस्टार सूर्या याचा 'जय भीम' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमातील एका सीनवर आक्षेप घेतला जात असून तो हटवण्याची मागणी केली जात आहे.

2 नोव्हेंबरला 'जय भीम' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. अभिनेते प्रकाश राज यांनी सिनेमातील एका सीनमध्ये हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली लगावली आहे. 'मला का मारले?' असा प्रश्न ती व्यक्ती विचारते. त्यावर प्रकाश राज यांनी 'तमिळमध्ये बोल' असे म्हटले आहे.

या सीनवरुन सोशल मीडियावर वाद-प्रतिवाद सुरू असून अशा प्रकारच्या सीन्सची सिनेमात गरज नाही असं मत अनेक यूजर्स व्यक्त करत आहे.

टी जे ज्ञानवेल यांनी या सिनेनाचं दिग्दर्शन केलं आहे.

दरम्यान, प्रकाश राज यांनी आपण या सिनेमाचा भाग असल्याचा आपल्याला अभिमान आहे असं म्हटलं आहे.

लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

2. गोव्यात पेट्रोल 12 आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच आणि दहा रुपयांची कपात केल्यानंतर गोव्याने अतिरिक्त सात रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे गोव्यात पेट्रोल 12 रुपयाने आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यानंतर राज्यांना वॅट कर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गोवा सरकारने हा निर्णय घेतला.

काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारचा हा निर्णय जुमलेबाजी असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल,डिझेलच्या उत्पादन शुल्कापेक्षा आताचे उत्पादन शुल्क तीन पटींनी अधिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तशी आकडेवारीच त्यांनी सादर केली.

देशात पोटनिवडणुकींच्या निकालात भाजपची पिछेहाट झाल्याचं दिसून आलं. म्हणूनच मोदी सरकारने दरवाढीत कपात केली अशीही टीका केली जात आहे.

एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

3. इंदुरीकरांच्या लसीकरणाच्या वक्तव्यावर राजेश टोपे म्हणाले...

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपण कोरोना प्रतिबंधक लस घेणार नसल्याचं म्हटल्याने त्यांच्या या वक्तव्यावरून चर्चा सुरू झाली. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

राजेश टोपे म्हणाले, "इंदुरीकर महाराज त्यांच्या स्टाईलने जे प्रबोधन करतात त्यामुळे समाजात जागृती होते. त्यांच्या कीर्तनाला गर्दी असते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद होतं त्यामुळे ते जास्त लोकांच्या संपर्कात आले नसावेत. म्हणून त्यांना कोरोनाची लागण झाली नसावी."

"कोरोना लसीकरणाचे महत्त्व जागतिक स्तरावर मान्य करण्यात आले आहे. त्यांचा अध्यात्मिक अभ्यास असला तरी त्यांना वैज्ञानिक बाजू देखील समजवून सांगणार," असं राजेश टोपे म्हणाले.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

4. 'एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात दिवाळीनंतर बैठक'- अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांचा संपासंदर्भात अखेर परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि इतर मागण्यांसंदर्भात दिवाळीनंतर बैठक घेऊ असं आश्वासन अनिल परब यांनी दिलं आहे. राज्य सरकारसोबत ही चर्चा होईल, असंही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात अनिल परब यांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि दिवाळी भेट दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू व्हावे असं आवाहनही अनिल परब यांनी केलं. टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

5. T.V. मालिका पाहून पुण्यात अल्पवयीन मुलांकडून 70 वर्षीय महिलेचा खून

पुण्यात 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात 14 आणि 16 वयाच्या दोन अल्पवयीन मुलांनी पैसे चोरण्यासाठी या महिलेचा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

टीव्हीवरील एक मालिका पाहून पैसे चोरण्यासाठी या महिलेचा खून केल्याच दोन्ही अल्पवयीन मुलांनी मान्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय शालिनी सोनावणे यांचा खून करून पावणे दोन लाख रुपये दागिने चोरीला गेले होते. यासंदर्भातील कोणतेही सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध नव्हते.

तपास करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील लहान मुलांशी चौकशी केली असता घटनेदिवशी आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी गेल्यानंतर आमचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच गडबडीने माघारी आले होते अशी माहिती दिली.

या दोघांची चौकशी पोलिसांनी सुरू केली. त्यांनी गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)