मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यामुळे देशातील माओवादी चळवळीला मोठा हादरा - गडचिरोली पोलीस

फोटो स्रोत, Gadchiroli police
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
छत्तीसगढमध्ये एका आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यानं दिलेल्या माहितीच्या आधारावर ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांना ठार केल्याचं गडचिरोली पोलिसांनी सांगितलं आहे.
"CPI(Maoist) सेंट्रल कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडे मोठ्या प्रमाणात माओवाद्यांची भरती करण्याच्या तयारीत होते. महाराष्ट्रातील तरुण आता माओवादी चळवळीकडे जात नसल्याने छत्तीसगढमधील काही तरुणांची भरती करण्याच्या ते प्रयत्नात होते. याच महितीच्या आधारावर C-60 च्या जवानांनी कारवाई करत मिलिंद तेलतुंबडेंसह 26 जणांना ठार करण्यात आलं," असं राज्याच्या नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलातील माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकी संदर्भात माहिती देण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.
या पत्रकार परिषदेत बोलतांना गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले की, "ग्यारापत्तीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात माओवाादी लपून बसले असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सोमय मुंडे या आमच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात C-60च्या कमांडोंनी अभियान राबविलं.
यावेळी सकाळी 6 वाजता माओवाद्यांच्या वतीनं अत्याधुनिक शस्त्रांच्या साहायानं पोलिसांवर फायरिंग करण्यात आलं. यावेळी माओवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि पोलिसांवर फायर केले. या फायरिंगला C-60 जवानांनी प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत ठार झालेल्या 26 माओवाद्यांचे मृतदेह मिळाले असून त्यापैकी 16 जणांची ओळख पटली आहे. यापैकी एक मृतदेह CPI(Maoist) सेंट्रल कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांचा असल्याचं उघड झालंय. तर दहा माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही."
"शनिवारी पोलीस आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत C-60 दलाचे 300 जवान सहभागी झाले होते.
शनिवारच्या चकमकीत मारले गेलेले माओवादी हे गडचिरोली तसंच छत्तीसगढ परिसरातील होते. पण मारले गेलेले माओवादी हे गडचिरोली दलमचेच सदस्य होते" असंही गोयल यांनी सांगितलं.
शनिवारच्या कारवाईत ठार झालेल्या 26 माओवाद्यांचे मृतदेह सापडले असले तरी इतर जखमी झालेल्या माओवाद्यांचा शोध सुरू आहे. ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह पंचनामा करून त्यांच्या नातेवाईकांना कायदेशीर प्रक्रियेनंतर सोपविले जातील, असंही अंकित गोयल यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Gadchiroli police
या चकमकीनंतर ग्यारापत्ती भागातील घनदाट जंगलात 29 अत्याधुनिक रायफल्स आणि इतर शस्त्रसाठा सापडला आहे. माओवाद्यांचं इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात पोलिसांनी जप्त केलं आहे.
शनिवारी 26 माओवाद्याचे मृतदेह रात्री उशीरा कोटकल पोलीस मदत केंद्रात आणण्यात आले आणि सकाळी ते गडचिरोली येथे आणण्यात आले. ग्यारापत्तीच्या जंगलातील शोधमोहीम अंधारामुळे थांबविण्यात आली होती. रविवारी सकाळी ही मोहिम पुन्हा सुरु करण्यात आली.
दलित विचारवंत आणि भीमा कोरेगाव प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे हा लहान भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हे CPI(Maoist) चे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ झोनचे प्रभारी होते. CPI(Maoist) या संघटनेवर भारत सरकारनं बंदी घातली आहे.
"तेलतुंबडेंकडे एमएमसी झोनच्या कमांडर पदाची जबाबदारी होती. दंडकारण्य असा त्यांचा भाग आहे. त्यामुळे तेलतुंबडे यांना ठार करणं हे फार मोठं यश असून त्याचा महाराष्ट्रालाच नाही तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडलाही मोठा फायदा झाला आहे," असं अंकित गोयल यांनी म्हटलं.
ग्यारापत्तीच्या जंगलात आढळलेल्या माओवाद्यांच्या साहित्याचा अनुवाद केला जाईल. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांकडून याची माहिती घेतली जाईल. त्यानंतरच माओवाद्यांनी हा कॅम्प कशासाठी लावला होता याची माहिती मिळू शकेल असंही पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
माओवाद्यांची फायर पॉवर पाहता आणि ते ज्या आक्रमकपणे लढत होते ते पाहता किमान शंभर माओवादी जंगलात होते असा आमचा अंदाज असल्याचं गोयल यांनी सांगितलं.
ठार झालेले सर्व माओवादी हे प्रतिबंधित CPI(Maoist) या संघटनेच्या गणवेशात होते, असं घटनास्थळावरील माहितीनुसार पुढे आलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








