Pak vs Aus T-20 Word cup : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, अंतिम फेरीत प्रवेश #5मोठ्याबातम्या

मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस

फोटो स्रोत, AAMIR QURESHI/getty

फोटो कॅप्शन, मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस

आज विविध वृत्तपत्रे आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, अंतिम फेरीत प्रवेश

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला असून आता त्यांची गाठ शेजारी आणि कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडशी आहे.

शुक्रवारी (11 नोव्हेंबर) सायंकाळी दुबईच्या क्रिकेट स्टेडियमवर येथे ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान हा सामना खेळवण्यात आला.

यामध्ये 17 चेंडूत 41 धावांची तुफान खेळी करणारा मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 19 व्या षटकात शाहीन आफ्रिदीला सलग तीन षटकार मारून अशक्यप्राय विजय खेचून आणला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर मार्शने 28 धावा केल्या. स्टोईनिसने 40 धावांवर नाबाद राहत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच्या बळावर पाकिस्तानने दिलेलं 177 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 19 व्या षटकातच गाठण्यात यश मिळवलं. 26 धावांत 4 बळी घेणारा शादाब खान ऑस्ट्रेलियाला रोखू शकला नाही.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 176 धावा केल्या. त्यांच्याकडून मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांनी अर्धशतके झळकावली. रिझवान 52 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावा करून बाद झाला. फखर जमानने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 32 चेंडूंत त्याने नाबाद 55 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 38 धावांत 2 बळी घेतले. पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांनीही 1-1 विकेट घेण्यात यश मिळवलं. ही बातमी बीबीसी हिंदीने दिली.

2. 'उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात उपचार घेतात, म्हणजे सरकारी रुग्णालय चांगले नाहीत'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

पण याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, cmo maharashtra

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे हे खासगी रुग्णालयात दाखल होतात, याचा अर्थ सरकारी रुग्णालयं चांगली नाहीत, हे तुम्ही मान्य करता

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली तेव्हा त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते.

यावेळी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क करूनही राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या नाहीत, या मुद्यावरूनही पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ही बातमी लोकमतने दिली.

3. कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

अभिनेत्री कंगना राणावतला नुकताच देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे.

कंगना राणावत

फोटो स्रोत, Getty Images

'1947 चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले,' असं वक्तव्य कंगनाने केलं. भारताचा अवमान आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्वातंत्र मिळविण्याकरिता महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांच्यासह आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांचा अपमान झाला आहे.

त्यांच्या या निंदनीय वक्तव्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे श्रीमती कंगना राणावत यांनी केलेल्या निंदनीय वक्तव्याचा आपण गांभीर्याने विचार करून त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

4. काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदूंच्या अपमानाची सुपारी घेतली का? - राम कदम

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकात हिंदू धर्माची तुलना दहशतवादी संघटनेशी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदूंचा अपमान करण्याची सुपारी घेतली आहे का, असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.

राम कदम

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, राम कदम

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आपण शनिवारी (12 नोव्हेंबर) घाटकोपर पोलीस ठाण्यात जाणार आहोत. ठाकरे सरकारला FIR दाखल करून घ्यावाच लागेल, असं कदम म्हणाले.

सलमान खुर्शीद यांचं हे नवं पुस्तक बुधवारी (10 नोव्हेंबर) प्रकाशित झालं होतं. पण त्याच्या काही वेळातच यावरून वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकाविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल झाल्याचीही नोंद आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.

5. भाजप माझ्यासाठी सावत्र आईसारखी होती-नवज्योत सिंग सिद्धू

भारतीय जनता पक्ष माझ्यासाठी सावत्र आईसारखा होता. पण आता मी कौसल्येकडे आलो आहे, असं वक्तव्य पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं आहे.

पंजाब विधानसभेच्या कामकाजादरम्यान गुरुवारी जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

नवज्योत सिंग सिद्धू

फोटो स्रोत, Getty Images

यादरम्यान अकाली दल आणि काँग्रेस नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. यामध्ये अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिय़ा आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वाद झाला. यादरम्यान मजिठिया यांना उत्तर देताना सिद्धू यांनी वरील वक्तव्य केलं.

नवज्योत सिंग सिद्धू हे पूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी 2017 मध्ये भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ही बातमी आजतकने दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)