आर्यन खान प्रकरणातील 'हे' पाच वादग्रस्त चेहरे कोण आहेत?

आर्यन खानला कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे.

प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

आर्यनच्या अटकेनंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत 'बॉम्ब' आणि 'हायड्रोजन बॉम्ब' फोडण्याची भाषा होत आहे.

हे प्रकरण फक्त ड्रग्जपुरतं मर्यादित नाही. याला किनार आहे महाविकास आघाडी विरूद्ध भाजप या सत्तासंघर्षाची.

या प्रकरणात अनेक पात्र आहेत. नवनवे चेहरे आणि त्यांची नावं दररोज पुढे येतायत. यातील काही चेहरे वादग्रस्त आहेत. काही चेहऱ्यांमागचं रहस्य न उलगडलेलं आहे.

कोण आहेत हे चेहरे?

1. मनीष भानुशाली

आर्यन आणि अरबाजला NCB कार्यालयात हाताला पकडून घेऊन जाताना सर्वांनी पाहिलेला चेहरा म्हणजे मनीष भानुशाली.

मनीष भानुशाली भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मनीषने स्वत: याची कबुली दिलीये.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप कार्यकर्त्याचा ड्रग्जपार्टी छाप्याशी संबंध काय? असा सवाल उपस्थित केला होता.

यावर मनीषने क्रूज ड्रग्ज पार्टीबाबत माझ्याकडे माहिती होती. ती NCB ला देण्यासाठी गेल्याचा दावा केला होती.

NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मनीष भानुशाली या प्रकरणी स्वतंत्र साक्षीदार असल्याचा खुलासा केला होता.

नवाब मलिक यांनी मनीष भानुशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजप नेत्यांसोबत फोटो सार्वजनिक केले होते.

प्रसारमाध्यमांशी बोलल्या दिवसापासून मनीष भानुशाली कुठे आहेत याबाबत काहीच माहिती नाहीये.

2. किरण गोसावी

आर्यनचा एका अनोळखी व्यक्तीसोबतचा सेल्फी व्हायरल झाला. सेल्फी घेणारा आमचा अधिकारी नाही असं NCB ने स्पष्ट केलं. मग हा कोण? याने सेल्फी कसा घेतला? ड्रग्जपार्टी प्रकरणी याची भूमिका काय? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले.

नवाब मलिक यांनी हा खासगी व्यक्ती किरण गोसावी असून, तो पोलीस नाही मग आरोपींच्या हाताला पकडून नेण्याचा त्याला काय अधिकार? असा प्रश्न उपस्थित केला.

NCB ला तातडीने यावर खुलासा करावा लागला. किरण गोसावी क्रूज ड्रग्जपार्टी प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार (पंच) असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं.

त्यानंतर गोसावीचा वादग्रस्त भूतकाळ पुढे आला आणि वानखेडेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. गोसावीवर पुण्यात नोकरीचं आमीष दाखवून फसवल्याचा गुन्हा होता. तर, ठाण्यातही FIR दाखल होती.

सेल्फीनंतर गोसावी फरार झाला. तो सापडत नव्हता. दरम्यान, गोसावीने प्रसारमाध्यमांना मुलाखत देऊन सर्व आरोप फेटाळून लावले. 15 दिवसांपासून फरार असलेल्या गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली.

गोसावी सद्य स्थितीत पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.

फसवणूकीचा गुन्हा दाखल असलेला व्यक्ती पंच कसा बनू शकतो? NCB ला गोसावीबाबत माहिती नव्हती का? हे प्रश्न समीर वानखेडेंना विचारले जाऊ लागले.

3. प्रभाकर साईल

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील दुसरं चर्चेतील पात्र म्हणजे प्रभाकर साईल.

गोसावीप्रमाणेच साईलही क्रूज ड्रग्जपार्टी प्रकरणात NCB चा स्वतंत्र साक्षीदार आहे.

प्रभाकर साईल किरण गोसावीचा बॉडीगार्ड. पण, त्याने आर्यन खान प्रकरणी शाहरूखकडून खंडणी वसूलण्याचा प्लान होता असा आरोप करत खळबळ उडवून दिली.

ड्रग्ज प्रकरणानंतर अचानक प्रभाकर साईल मीडियासमोर आला.

किरण गोसावी शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानीला भेटला. फोनवर किरणने सॅम डिसूजाला 25 कोटींची खंडणी मागण्यासाठी सांगितलं. 8 कोटी रूपये समीर वानखेडेंना द्यायचे आहेत असंही फोनवरचं बोलणं ऐकल्याचा दावा त्यांनी केला.

आर्यन खान प्रकरणात आणखी एक नवीन पात्र समोर आलं होतं, सॅम डिसूजा.

NCB ने साईलचे आरोप फेटाळून लावले आहेत.

समीर वानखेडे यांच्यावरील आरोपाप्रकरणी प्रभाकर साईलचा जबाब NCB च्या चौकशी पथकाने नोंदवला आहे. तर, मुंबई पोलिसांनीदेखील साईलची चौकशी केलीये.

4. सॅम डिसूजा

या पात्राचं खरं नाव आहे सॅनविल डिसूजा.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरण गोसावीचा आर्यनसोबतचा एक व्हीडिओ व्हायरल केला. यात काळ्या रंगाचे कपडे घातलेला एक व्यक्ती दिसत होता.

सॅम डिसूजा मनी लॉंडरिंग प्रकरणातील जुना खिलाडी आहे. भाजपच्या नेत्यांना तो पैसे पाठवतो असा आरोप त्यांनी केला.

सॅम डिसूजा अखेर प्रसारमाध्यमांसमोर आला. किरण गोसावीसोबत आम्ही शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीला लोअर परळला भेटलो, असं त्यानं म्हटलं होतं. त्या भेटीत काय झालं याची संपूर्ण माहिती त्याने दिली.

आर्यनला मदत करण्यासाठी 50 लाख रूपये मागितले होते. पण गोसावी चिटर निघाला त्यामुळे पैसे परत देण्यात आल्याचा दावा सॅमने केला.

यानंतर सॅम डिसूजाने क्रूज ड्रग्जपार्टीची टीप सुनिल पाटील यांच्याकडून मिळाल्याचा दावा केला. आर्यन खान केस प्रकरणी आणखी एक नवीन चेहरा पुढे आला होता.

5. सुनील पाटील

किरण गोसावी, प्रभाकर साईल, सॅम डिसूजा यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच सुनील पाटील एक नवं पात्र आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी जोडलं गेलं.

सॅम डिसूजाने क्रूजपार्टीची टीप सुनील पाटीलने दिल्याचा दावा केला.

भाजप नेते मोहित कंबोज यांनीदेखील सुनील पाटील सर्व प्रकरणांचा मास्टरमाईंड आहे. तो पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट चालवतो, त्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप केला.

तर कॉंग्रेस नेत्यांनी सुनील पाटीलचा गृहमंत्री अमित शहांसोबतचा व्हिडीयो सार्वजनिक करून त्याचे भाजपसोबत संबंध असल्याचा आरोप केला.

सुनील पाटील यांच्याबद्दल लोकांना काहीच माहिती नाही. पाटील मुळचे उत्तरमहाराष्ट्रातील धुळ्याचे असल्याचं सांगितलं जातं. पण व्यवसायाने ते काय करतात याबाबत कोणाला ठोस माहिती नाही.

दरम्यान समीर वानखेडेंवरील आरोपांची मुंबई पोलीस आणि NCB कडून चौकशी सुरू होती. सुनील पाटील मीडियासमोर आले. त्यांनी मोहित कंबोज यांचे आरोप फेटाळून लावले.

मी NCB च्या अधिकाऱ्यांना ओळखत नाही. समीर वानखेडे यांना टीव्हीवर पाहिलंय असा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला.

मुंबई पोलिसांची चौकशी कुठे पोहोचली?

समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केलीये.

मुंबई पोलिसांच्या टीमने किरण आर्यन खान प्रकरणी किरण गोसावीवर खंडणी वसूलण्याचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवून घेतलाय.

शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानीसोबत किरण गोसावी सोबतच्या ज्या भेटीचा दावा साईल यांनी केला होता. त्या भेटीचं सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर, पूजा ददलानीला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलाय.

सुनील पाटील यांनीदेखील या प्रकरणी आपला जबाब मुंबई पोलिसांसमोर नोंदवला आहे. पण, पोलिसांनी अजूनही कोणाविरोधातही गुन्हा नोंदवलेला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)