You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तारक सिन्हा : देशाला 12 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देणारे 'उस्तादजी'
- Author, सूर्यांशी पाण्डेय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"मी 9 वर्षांचा असताना त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तेव्हा क्लबची फी केवळ 50 रुपये असायची. त्यात ज्या मुलांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही, त्या मुलांकडून सर पैसेही घेत नव्हते. त्यांना मोफत प्रशिक्षण द्यायचे."
- आकाश चोप्रा, क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू
"डिसेंबर 2001 मध्ये ते महिला क्रिकेट संघाचे कोच होते, त्यावेळी मी कर्णधार बनले होते. त्यावेळी आमच्या संघाने प्रथमच इंग्लंडला 5-0 नं पराभूत केलं होतं."
- अंजुम चोप्रा क्रिकेट समालोचक आणि महिला संघाच्या माजी कर्णधार
या किश्श्यांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट विश्वाला 12 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देणाऱ्या व्यक्तीचं स्मरण केलं जात आहे. या 12 खेळाडुंमधील ऋषभ पंत आणि शिखर धवन आजही टीम इंडियामध्ये खेळत आहेत.
दिल्लीच्या प्रादेशिक क्रिकेटमधील दिग्गज प्रशिक्षक राहिलेले तारक सिन्हा यांचं 5 नोव्हेंबरला फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळं निधन झालं.
दिल्लीत 1969 मध्ये क्लर्कच्या नोकरीतून जमवलेल्या पैशांमधून त्यांनी सोनेट क्लबची स्थापना केली होती. त्याच क्लबमधून सुरूवात केल्यानंतर रमण लांबापासून ऋषभ पंतपर्यंत अनेकांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावलं.
आम्ही जेव्हा दिल्ली विद्यापीठामध्ये असलेल्या त्यांच्या सोनेट क्लबमध्ये पोहोचलो तेव्हा त्यांच्या अंत्य दर्शनासाठी त्याठिकाणी वीरेंद्र सेहवाग आणि त्यांच्या कुटुंबासह, ऋषभ पंतचे कुटुंबीय, आशिष नेहराचे कुटुंबीय माजी क्रिकेपटू अतुल वासन आणि आकाश चोप्रा यांचे कुटुंबीयही तिथं आले होते.
संपूर्ण क्रिकेट ग्राऊंड सध्या खेळणारे तरुण क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय यांनी भरलेलं होतं. क्रिकेटपटूंच्या मनात त्यांच्याबाबत असलेल्या आदराचं दर्शन घडवणारं ते दृश्य होतं.
"तुम्ही आशिष नेहरावर का मेहनत घेत आहात? त्यात तशी गुणवत्ता दिसत नाही, असं रमण लांबा यांनी त्यांना म्हटलं होतं. तेव्हा 'उस्ताद' म्हणाले होते, नाही हा क्रिकेटपटू खूप पुढे जाईल," अशी आठवण माजी क्रिकेटपटू संजीव शर्माने बीबीसीबरोबर बोलताना सांगितली.
"मी 4 वर्ष डीडीसीएचा सिलेक्टर होतो. पण कधीही उस्तादांनी मला फोन करून कुणाबाबत शिफारस केली नाही," असं अतुल वासन म्हणाले.
क्रीडा पत्रकार इंद्रनील बसू यांच्या मते, तारक सिन्हा यांना 2018 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मात्र, त्यांना क्रिकेटपटूंना खेळाचे बारकावे शिकवणं आणि त्यांना पुढं जाण्यासाठी मदत करणं हेच खरं यश असल्याचं वाटत होतं.
ओळख आणि पुरस्कारांची भूक नसल्याचं ते म्हणायचे. त्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, अनेक दिग्गज क्रिकेटपटुंनी द्रोणाचार्य पुरस्कारासाठी त्यांच्या मर्जीच्या विरोधात त्यांच्या नावाचा अर्ज दाखल केला होता.
ज्युनियर संघात निवड झाली नाही म्हणून अकॅडमी
तारक सिन्हा दिल्लीच्या कमला नगरमधील सरकारी (बिर्ला स्कूल) शाळेचे विकेटकीपर-फलंदाज होते. सीके नायडू ट्रॉफीसाठी दिल्लीच्या ज्युनियर टीममध्ये संधी मिळण्याची त्यांना अपेक्षा होता. पण त्यांची निवड झाली नाही.
त्यामुळं त्यांना वाईट वाटलं. तेव्हाच त्यांनी सरकारी शाळांतील तरुण खेळाडुंना चांगलं प्रशिक्षण देण्यासाठी क्रिकेट अॅकेडमी सुरू करण्याचा निश्चय केला होता. 1969 मध्ये त्यांनी सोनेट क्लबची स्थापना केली. त्याची सुरुवात सरकारी बिर्ला स्कूल मधूनच झाली होती.
पुढे तारक सिन्हा यांना दिल्ली विद्यापीठात पीजीडीएव्ही कॉलेजमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली. तिथून मिळणारा पगार ते क्लबवरच खर्च करू लागले.
20 मुलांसह सुरू झालेला हा क्लब भविष्यात दिल्लीतील प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पोर्ट्सबरोबर स्पर्धा करेल आणि दिल्लीतील महत्त्वाचे सामने जिंकेल, याचा कुणाला अंदाजही नव्हता.
डीडीसीए (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटना) नं 1971 मध्ये या क्लबला मान्यता दिली. एवढंच नाही तर, कमी पैसा आणि इतर सुविधांअभावी या क्लबला अनेकदा जागाही बदलावी लागली. सर्वात आधी हा क्लब बिर्ला स्कूलमध्ये होता. त्यानंतर अजमल खान पार्क, डीसीएम ग्राउंड आणि नंतर डीयूमधील राजधानी कॉलेज मध्ये हा क्लब चालला. सध्या व्यंकटेश्वर कॉलेज ग्राऊंडमध्ये हा क्लब चालतो.
वाईट काळात खेळाडुंना करायचे मदत
अतुल वासन 14 वर्षांचे असताना सोनेट क्लबमध्ये गेले होते. त्याठिकाणी तारक मेहता यांनी त्यांच्याकडून खूप परिश्रम करून घेतले. तसंच कठीण काळात धीर ठेवायलाही शिकवलं, असं त्यांनी सांगितलं.
सोनेट क्लबमध्ये कुणीही श्रीमंत-गरीब नसायचं. सगळे एकसमान असायचे. सर्वांना विकेट लावण्यापासून ते पिचवर स्वतः रोलर चालवायला शिकवलं जायचं. त्यानंतरच त्याचं प्रशिक्षण सुरू व्हायचं, असं वासन म्हणाले.
वासन यांनी एक किस्साही सांगितला. त्यावेळी त्यांची कामगिरी चांगली होत नव्हती. त्यांनी अगदी क्रिकेट सोडण्याचा विचार केला होता. तेव्हा उस्तादांना (तारक सिन्हा यांना सगळे प्रेमानं उस्ताद म्हणायचे) हे कळलं तर ते थेट अतुल वासन यांच्या घरी गेले आणि तिथं जाऊन त्यांना आणि त्यांच्या वडिलांना खूप समजावलं.
''कुठला कोच एवढी काळजी घेतो? खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल, अशा काळात ते क्रिकेटपटुंच्या सोबत उभे असायचे. त्यांच्यामुळंच मी इंडियन टीममध्ये खेळू शकलो, कारण त्यांनी माझी कायम साथ दिली," असं अतुल वासन म्हणाले.
तर आकाश चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार ते 9 वर्षांचे असताना क्लबमध्ये खेळायला जाऊ लागले होते. ''त्यांचं सर्वात मोठं कौशल्य, बालपणीचं टॅलेंट ओळखणं हे होतं. कोणता खेळाडू कोणत्या उंचीपर्यंत जाऊ शकतो, याचा अंदाजही त्यांना लावता येत होता. गरीब मुलांना तो मोफत प्रशिक्षण द्यायचे,'' असं आकाश चोप्रा म्हणाले.
नेहराने उस्तादजींसाठी खरेदी केलं घर
तारक सिन्हा यांच्या क्लबमध्येच कोचिंगचं काम करणारे माजी कसोटीपटू संजीव शर्मा यांनीही एक किस्सा सांगितला. ''आशिष नेहराचं क्रिकेटमध्ये नाव झालं होतं, त्यावेळी एकदा ते सोनेट क्लबमध्ये वाट पाहत बसले होते. त्यावेळी उस्तादजी खूप उशिराने आले. आशिषनं तुम्ही लवकर का येत नाही? असं विचारलं."
"त्यावर तारक म्हणाले की, 'माझं घर गाझियाबादमध्ये आहे. एवढ्या लांबून येईल तर उशीर लागेलच ना.' हे ऐकल्यानंतर आशिष नेहरानं उस्तादजींसाठी द्वारकामध्ये घर खरेदी केलं होतं.''
मोठे खेळाडु त्यांच्या क्लबसाठीही वेळो-वेळी आर्थिक हातभार लावत होते. त्यांनी स्वतः मात्र कधी कुणाकडे काहीही मागितलं नाही.
ते गोलंदाज आणि फलंदाज दोघांच्याही तंत्रावर काम करायचे. उन्हाळ्यात स्पिनर आणि हिवाळ्यात वेगवान गोलंदाज यांच्याकडून प्रचंड मेहनत आणि सराव करून घेत होते, असं त्यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीबाबत संजीव शर्मा यांनी सांगितलं.
महिला क्रिकेटमध्ये मोलाची कामगिरी
डिसेंबर 2001 मध्ये जेव्हा कर्णधार म्हणून निवड झाली तेव्हा तारक सिन्हा हेच प्रशिक्षक होते, असं महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार अंजुम चोप्रा म्हणाल्या. त्यांच्या काळातच 2002 मध्ये महिला क्रिकेट टीमनं सर्वप्रमथ विदेशी संघाला मायदेशात 5-0 नं पराभूत केलं होतं. त्यावेळी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता, असं चोप्रा म्हणाल्या.
भारतीय महिला क्रिकेट संघानं विदेशी धर्तीवर पहिली कसोटी मालिकाही त्यांच्याच कार्यकाळात जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरोधात ही मालिका होती, असंही अंजुम चोप्रा यांनी सांगितलं.
''ते राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे मुख्य पदाधिकारी बनले त्यावेळी दोन वर्षे राजस्थानचा संघ रणजी ट्रॉफीचा विजेता ठरला. चांगले क्रिकेटपटू हेरण्याचं नैसर्गिक कौशल्य त्यांच्या अंगी होतं. सोबतच ते अनेक विदेशी क्रिकेटपटू किंवा प्रशिक्षकांची पुस्तकंही वाचत राहायचे," असं संजीव शर्मा यांनी सांगितलं.
शिष्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवूनही उस्तादजी कायम साधं जीवन जगत राहिले. त्यांनी कधीही स्वतःचं कुटुंब व्हावं असा विचार केला नाही आणि म्हणून विवाहदेखील केला नाही. क्रिकेटलाच जीवनाचा साथीदार मानत त्यांनी क्रिकेटपटुंमधल्या प्रतिभेमध्येच कुटुंबाचा शोध घेत राहिले.
त्यांनी प्रशिक्षित केलेल्या 12 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटुंमध्ये ऋषभ पंत, शिखर धवन, आकाश चोप्रा, अंजुम चोप्रा, आशिष नेहरा, अतुल वासन, संजीव शर्मा, केपी भास्कर, अजय शर्मा, मनोज प्रभाकर, रमन लांबा, सुरेंदर खन्ना आणि रणधीर सिंह यांचा समावेश होता.
दिल्लीच्याच नव्हे तर इतरही राज्यांतील क्रिकेटपटुंचे तारक सिन्हा हे उस्ताद होते. त्यात मयांक सिंधाना (पंजाब), एकलव्य दिवाण (युपी), राजीव देवरा (बिहार) यांचा समावेश होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)