You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICUला लागलेल्या आगीप्रकरणी दोषींवर कारवाई
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात शनिवारी (6 नोव्हेंबर) लागलेल्या आगी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करून दिली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे तसंच डॉ. विशाखा शिंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे. स्टाफ नर्स सपना पठारे यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. स्टाफ नर्स आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU विभागात लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली होती.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज होता. .
सकाळी साडेदहाच्या सुमारास अतिदक्षता विभागात ही आग लागली.
या आगीविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं, "या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये कोव्हिडचे 17 पेशंट्स होते. या वॉर्डला सकाळी अचानक आग लागली. यामध्ये 10 पेशंट्सचा मृत्यू झालेला आहे. 1 रुग्ण गंभीर आहे."
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज असल्याचं जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितलं. या रुग्णालयाचं फायर ऑडिट झालेलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
स्वच्छतेसाठी तीन तास आयसीयू बंद असल्यानं आग पसरल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, त्याची चौकशी केली जाईल असंही जिल्हाधिकारी म्हणाले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या याठिकाणी दाखल झाल्या होत्या. आयसीयू मोठं असल्यानं बाहेरच्या ग्रिल पूर्ण बंद असल्याने लोकांना बाहेर काढण्यात अडचणी आल्या, असं अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ यांनी सांगितलं. ग्रिल बंद असल्याने मुख्य दरवाजातून जाऊन लोकांना बाहेर काढावं लागलं. त्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मदत केली असं मिसाळ यांनी सांगितलं. वेळीच लोकांना बाहेर काढता आलं. आयसीयूमध्ये असल्यानं ऑक्सिजन मास्क काढल्याने रुग्णांना त्रास होईल याची भीती वाटत होती. पण त्यांचे प्राण वाचवणं गरजेचं असल्यानं त्यांना आधी बाहेर काढलं, असं मिसाळ यांनी सांगितलं.या आगीमध्ये अतिदक्षता विभाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
हिवरे बाजारचे उपसरपंच पोपटराव पवारही ही आग लागली त्याच वेळी नेमके या हॉस्पिटलमध्ये होते.
बीबीसी मराठीशी बोलताना पोपटराव पवार म्हणाले, ""पद्मश्री पुरस्काराच्या वितरणासाठी मी 8 तारखेला दिल्लीला जाणार आहे. त्या कार्यक्रमाला जायच्या आधी कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी मी सकाळी 9.30 वाजता जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. सिव्हिल सर्जन यांच्यासोबत असताना आयसीयूला आग लागल्याचे कळाले.
तातडीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, पालकमंत्री आणि इतर यंत्रणांना कळवले. काही वेळातच सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. आयसीयुच्या बाहेर असणाऱ्या बोर्डमध्ये शॉक सर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना बाहेर असलेल्या कार चालकाने सर्वात आधी आग लागल्याची आम्हाला माहिती दिली."
पीडितांच्या नातेवाईकांना मदत
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, "या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेची तात्काळ चौकशी करुन आठवडाभराच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत".
पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.
"महाराष्ट्रातल्या अहमदनगर इथल्या रुग्णालयातील दुर्देवी घटनेने व्यथित झालो आहे. या घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांच्या दु:खात सहभागी आहे. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करतो", असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले होते सखोल चौकशीचे आदेश
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)