समीर वानखेडेंकडील तपास 'या' पाच कारणांमुळे काढण्यात आल्याची शक्यता

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास NCBचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडे राहणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे डीडीजी अशोक मुथा-जैन यांनी बीबीसीला सांगितले की समीर वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. त्यापैकी आर्यन खानचे प्रकरण देखील एक आहे.

या सर्व प्रकरणांवर संजय सिंह हे नजर ठेवणार आहेत, अशी माहिती NCB ने दिली. संजय सिंह हे NCB चे वरिष्ठ अधिकारी आहेत.

2 ऑक्टोबर रोजी एका क्रूझवर टाकण्यात आलेल्या धाडीनंतर समीर वानखेडे यांच्या पथकाने आर्यन खानला अटक केली होती. आर्यनवर ड्रग्ज प्रकरणात आरोप लावण्यात आले होते.

पण नंतर या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही यामध्ये एन्ट्री घेतली.

मलिक यांनी वानखेडे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले आहेत. त्यानंतर प्रभाकर साईल या स्वतंत्र साक्षीदारानेही वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाची दखल दिल्लीनेही घेतली.

अखेरीस, आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांच्यासंदर्भात मोठी कार्यवाही समोर आली.

या पाच कारणांमुळे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्याची शक्यता आहे.

1. आर्यन खान प्रकरणी आरोप

समीर वानखेडेंवर आर्यन खान प्रकरणी आरोप झाले. आर्यनला प्रकरणात खोटं गुंतवण्यात आल्याचा आरोप झाला. भाजप कार्यकर्ते मनिष भानुशाली आणि फसवणुकीचे आरोप असलेल्या किरण कोसावी यांना स्वतंत्र पंच म्हणून घेतल्यामुळे प्रकरणाच्या पारदर्शकतेवर सवाल उठले. दिल्लीच्या पथकाने मुंबईत येऊन आरोपांची चौकशी केली. त्यामुळे अधिकार्यावर आरोप असताना त्यांना कायम ठेवणं योग्य दिसलं नसतं.

2. खंडणीचा आरोप, मुंबई पोलिसांनी जप्त केलं फुटेज

स्वतंत्र पंच प्रभाकर साईल यांनी किरण गोसावीने शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानीकडून 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला. ही भेट लोअर परळला झाल्याचं सांगितलं. मुंबई पोलिसांनी या भेटीचं CCTV फुटेज जप्त केलंय. त्यामुळे गोसावी आणि वानखेडे अडचणीत येण्याती शक्यता वर्तवली जातेय.

3. मुंबई पोलिसांचा तपास

समीर वानखेडे यांच्याविरोधातील तक्रारींवर मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांना चौकशीसाठी समन्स केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासावर त्याचं लक्ष ठेवणं योग्य होणार नाही असा विचार वरिष्ठ अघिकार्यांनी केला असावा.

4. NCB ची प्रतिमा मलिन होणं

समीर वानखेडे मुंबईत NCB चे विभागीय संचालक आहेत. एका वरिष्ठ अधिकार्यावर सतत आरोप होत असल्याने NCB ची तपास यंत्रणा म्हणून प्रतिमा मलिन झाली.

5. समीर वानखेडेंनी केली होती CBI चौकशीची मागणी

समीर वानखेडे यांनी हायकोर्टात या प्रकरणी CBI-NIA चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे हा तपास केंद्रीय टीमला देण्याचा निर्णय घेण्यात आला असावा.

तपास माझ्याकडे नव्हताच - समीर वानखेडे

NCB मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी याप्रकरणी बीबीसी मराठीशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली.

या प्रकरणाचा तपास माझ्याकडे नव्हताच, असं वानखेडे यांनी स्पष्ट केलं.

बीबीसीशी बोलताना वानखेडे म्हणाले, "मला हटवण्यात आलेलं नाही. मी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणांची चौकशी करावी. मी कोणत्याही प्रकरणात तपास अधिकारी नव्हतो.""तपास अधिकारी बदलण्यात आलाय. आर्यन खान आणि समीर खान प्रकरणाचा दिल्लीची टीम तपास करेल," असं त्यांनी सांगितलं.

मलिकांचं ट्विट

दरम्यान, वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतल्याची बातमी समोर येताच मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून याबाबत प्रतिक्रिया दिली.

आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणे समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत. अशी 26 प्रकरणे आहेत. त्यांचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असं मलिक म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)