You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहम्मद शमीचा धर्म आणि त्याचा खेळ यांचा काय संबंध?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मोहम्मद शमी
"भारतीय क्रिकेट संघामध्ये मुस्लीम खेळाडूला वा खेळाडूंना सहजपणे जागा करून दिली जाते, त्यातून निर्माण होणाऱ्या स्नेहशील आणि सौहार्दपूर्ण वातावरणाने कधीच धर्मांधतेला वाव दिला नाही, यात भारतीय संघाचं सौंदर्य सामावलेलं आहे."
विख्यात क्रिकेट-लेखक राजन बाला यांनी खूप पूर्वी या खेळाचं वरीलप्रमाणे वर्णन केलं होतं. त्यांच्या निधनाला आता 11 वर्षं होऊन गेली आहेत आणि भारतीय क्रिकेटविषयीच्या या दृष्टीला आव्हान मिळताना दिसतं आहे.
गेल्या रविवारी (24 ऑक्टोबर) मोहम्मद शमीच्या काहीशा वाईट ओव्हरमुळे पाकिस्तानचा विजय पक्का झाला, त्यानंतर भारतीय चाहत्यांनी केलेल्या ट्रोलिंगमधून या आव्हानाचं रूप समोर आलं.
शमीला एकटं वेगळं काढून लक्ष्य का करण्यात आलं? त्याच्या धर्माचा त्याच्या खेळाशी काय संबंध आहे?
शमीला मिळालेला पाठिंबा
शमी मुस्लीम आहे (सध्याच्या संघातील तो एकमेव मुस्लीम खेळाडू आहे), या कारणावरून त्याला बहुतांश टीका सहन करावी लागली. त्याच सामन्यात शून्य धावा करून आउट झालेल्या रोहित शर्मावर झालेल्या टीकेपेक्षा शमीवर खूप जास्त विखारी हल्ला चढवण्यात आला.
काही तासांनी सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यासह माजी भारतीय क्रिकेटरांनी ट्विटरवरून शमीला पाठिंबा दिला आणि आपण त्याच्या सोबत असल्याचं जाहीर केलं. परंतु, त्यातील बहुतेकांनी या प्रकरणातील सांप्रदायिक द्वेषावर थेट टीका करणं टाळलं.
अखेर, बीसीसीआयने समाजमाध्यमांवर शमीचं एक छायाचित्र प्रसिद्ध केलं आणि त्यासोबत 'Proud Strong Upward and onward' (अभिमान. सामर्थ्य. यांसह उंच जाऊ नि पुढे जाऊ) अशी पाच शब्दांची ओळ होती. हा अगदीच संदिग्ध प्रतिसाद होता आणि बीसीसीआयने स्वतःचा कणा ताठ असल्याचं दाखवायला हवं होतं, असं अनेकांना वाटलं.
एका बाजूला, भेदभावाविरोधात इतक्या प्रमाणात समर्थन व्यक्त होणं, ही समाधान देणारी बाब आहे. पण दुसऱ्या बाजूला, हा संपूर्ण वादच बनावट असल्याचेही दावे केले जात आहेत. 'भारताची प्रतिमा जागतिक पातळीवर मलीन करण्याच्या उद्देशाने मोहम्मद शमीवर टीका झाली,' असं डीएनए या इंग्रजी वृत्तपत्रातील एका बातमीत म्हटलं होतं.
शमीविरोधातील या ट्विटप्रवाहाचा उगम कुठेही झाला असला, तरी काही भारतीय चाहते त्या ट्रोलिंगमध्ये सामील झाले, आणि भारतीय क्रिकेटविश्वाने या प्रवृत्तीवर उपाय करणं गरजेचं आहे.
'जन्टलमन्स गेम'मध्ये धार्मिक भेदभाव
मुस्लीम खेळाडूला अशा प्रकारे टीका वा ट्रोलिंगला सामोरं जावं लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एखादा सामना हरल्यावर, विशेषतः पाकिस्तानविरोधात पराभव झाल्यानंतर खेळाडूंना टीका सहन करावी लागते.
क्रिकेट समालोचक प्रसन्न संत म्हणतात की, टीका करणं ठीक आहे आणि काही वेळा ते स्वागतार्हसुद्धा असतं, पण मर्यादा ओलांडता कामा नयेत. "कोणाच्या धर्मावर किंवा वांशिकतेवर टिप्पणी करणं बरोबर नाही. आपण कोणत्याही भेदभावाला थारा देता कामा नये. अशा गोष्टी सुरुवातीलाच थांबवायला हव्या, किंबहुना त्यांची सुरुवातच होऊ देता कामा नये."
शमीच्या समर्थनार्थ ट्वीट करताना माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने, अशा घटना अलीकडच्या वर्षांमध्ये वाढल्याचंही सूचित केलं.
तो म्हणाला, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैदानावरच्या लढाईत आम्ही हरलो, असं यापूर्वीही झालेलं आहे आणि मी त्या वेळी संघाचा भागही राहिलेलो आहे, पण मला कधी पाकिस्तानला जा असं सांगण्यात आलं नाही! मी काही वर्षांपूर्वीच्या भारताबद्दल बोलतो आहे. हा बाष्कळपणा थांबवणं गरजेचं आहे."
संघाच्या पराभवासाठी चाहते एका खेळाडूवर ठपका ठेवू पाहतात, असं अनेक वेळा दिसून आलं आहे. हा खेळाडू मुस्लीम असेल, तर त्याला वा तिला अधिक कडवट टीकेला सामोरं जावं लागतं आणि त्यांच्या बांधिलकीवर व देशभक्तीवर चाहते प्रश्नचिन्हं उपस्थित करतात.
मोहम्मद कैफचाही दाखला इथे विचारात घेता येईल. 2003 सालच्या विश्वचषकावेळी प्राथमिक फेरीत ऑस्ट्रेलियाविरोधात भारताचा मानहानीकारक पराभव झाला, तेव्हा खेळाडूंच्या घरांबाहेर निदर्शनं झाली.
मुंबई आणि कोलकाता इथे सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली आणि इतर खेळाडूंची पोस्टरं आणि पुतळे जाळण्यात आले, तर अलाहाबादमध्ये मात्र मोहम्मद कैफच्या घरावर काळा रंग आणि तेल लावण्यात आलं. काहींनी त्याला देशद्रोही असंही संबोधलं.
कालांतराने कैफची त्याच्या कामगिरीबद्दल प्रशंसाही झाली आणि त्याला आजही सर्वोत्तम भारतीय फिल्डरांपैकी एक मानलं जातं.
शिवाय, कैफने भारतीय सैनिकांना पाठिंबा दिला तेव्हा हिंदू राष्ट्रवाद्यांनी त्याला नायकत्वही दिलं.
हे केवळ भारतातच होतं असं नाही. सीमेपलीकडेसुद्धा अल्पसंख्याक समुदायांमधील क्रिकेट खेळाडूंना भेदभावजन्य वागणूक सहन करावी लागली आहे. पाकिस्तानी संघातील एकमेव हिंदू खेळाडू असलेल्या दानिश कनेरियाबाबत काही पाकिस्तानी खेळाडूंनी कसा भेदभाव केला, याबद्दल एकदा शोएब अख्तर बोलला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला याला 2016 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना वंशद्वेष्टी शिवीगाळ सहन करावी लागली होती. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियन निवेदक डीन जोन्स यांनी आमलाचा उल्लेख 'दहशतवादी' असा केला. यातून निर्माण झालेल्या वादात अखेर जोन्स यांना राजीनामा द्यावा लागला.
वैयक्तिक टीका
केवळ मैदानावर घडलेल्या गोष्टींपुरतंच हे ट्रोलिंग मर्यादित नसतं आणि धर्मांध लोक दोन्ही बाजूंना आहेत. शिवाय, हे क्रिकेटपुरतंही मर्यादित नाही.
कैफने त्याच्या मुलासोबत बुद्धिबळ खेळत असतानाचं छायाचित्रं प्रसिद्ध केल्यावर उजव्या विचारसरणीच्या मुस्लीम लोकांकडून त्याच्यावर टीका झाली.
वेगवान गोलंदाज झहीर खान याचं अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी लग्न झालं, तेव्हा समाजमाध्यमांवरील काहींनी यात 'लव्ह जिहाद'चं सूत्र गोवायचा प्रयत्न केला होता.
टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्याशी लग्न केल्यावर तिलाही ऑनलाइन शिवीगाळ सहन करावी लागली. तिने आता कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व करावं, असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काहींनी तर तिला पुन्हा भारतात पाऊल ठेवू देणार नाही असं दरडावलं. या सगळ्या विरोधाला न जुमानता सानिया भारतासाठी खेळत राहिली आणि त्यानंतरही तिने काही ट्रॉफ्या आणि पदकं जिंकली.
अजूनही कधी भारत व पाकिस्तान यांच्यात सामना असेल आणि सानिया खेळ म्हणून ते सहजतेने घेताना दिसत असेल, तर तिच्यावर विखारी हल्ला होतो.
भारतातील मुस्लीम क्रिकेटपटूंचं योगदान
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महान खेळाडू होऊन गेले आहेत आणि त्यातील अनेक जण मुस्लीमही राहिलेले आहेत. मैदानावरील त्यांची उत्कृष्ट कामगिरी आणि भारतीय संघ या कल्पनेवरचा त्यांचा विश्वास, यांमुळे अनेकदा मोठ्या यशाचा पाया घातला आहे.
मन्सूर अली खान पतौडी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी संघाचं कर्णधारपदही सांभाळलं होतं.
गुलाम अहमद, इफ्तिकार अली खान पतौडी यांच्यासारख्या भारतात क्रिकेट रुजवण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या खेळाडूंपासून ते सय्यद मुस्तफा हसन किरमाणी, आबिद अली, अब्बास अली बेग, झहीर खान व इरफान पठाण यांच्यापर्यंत अनेक क्रिकेटवीरांबाबत भारताने भक्तिभाव दाखवलेला आहे.
अगदी अलीकडे, चालू वर्षाच्या सुरुवातीला, मोहम्मद सिराजने केलेल्या विलक्षण गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेमधील भारताच्या ऐतिहासिक विजयाची पायाभरणी झाली, तेव्हा सिराज तत्काळ भारतासाठी नायक ठरला.
क्रिकेटचा खेळ ऐक्याचं प्रतीक ठरू शकतो, याचा हा दाखला होता. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात धार्मिक श्रद्धा बहुतांशाने खाजगी बाब मानली जात होती आणि वैयक्तिक टिप्पणी क्वचितच केली जात असे, या पार्श्वभूमीवर एकमेकांना जोडणारा दुवा म्हणून क्रिकेटचा खेळ भूमिका बजावू शकतो, हे त्या वेळी दिसून आलं.
परंतु, समाजमाध्यमांच्या काळात हे बदललं आहे. आजच्या भारतात मतमांडणीला बहुतेकदा राजकीय रंग असतो आणि त्यांचं धृवीकरणही झालेलं असतं. त्यामुळे शमीविरोधातील धार्मिक टीका अधिक गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरते. शेवटी भारतीय संघाला आणि बीसीसीआयला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्यांनी वंशद्वेषाविरोधात एका गुडघ्यावर बसून निषेधाचा सूर उमटवणाऱ्यांनी धार्मिक विद्वेषावरही उत्तरं देणं गरजेचं ठरतं.
भारतीय संघाने मौन का धारण केलं?
अगदी पाकिस्तानी यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान यानेही ट्वीट करून शमीला पाठिंबा दिला. "कोणीही खेळाडू त्याच्या देशासाठी व त्याच्या लोकांसाठी ज्या प्रकारचा दबाव सहन करतो, संघर्ष करतो आणि त्याग करतो त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. मोहम्मद शमी हा स्टार आहे आणि निश्चितपणे जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक हे. कृपया तुमच्या सर्वोत्तम खेळाडूंचा आदर करा. या खेळाने लोकांना एकत्र आणायला हवं, त्यांच्यात भेद वाढवायला नकोत."
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाने किंवा संघ व्यवस्थापनातील कोणीही याबद्दल काहीही बोललेलं नाही.
अर्थात, कुठलीही स्पर्धा सुरू असताना एक नियम म्हणून भारतीय खेळाडू सर्वसाधारणतः टीव्हीवरच्या बातम्या पाहत नाहीत आणि समाजमाध्यमांवर काही टिप्पणी करत नाहीत, विशेषतः काही वादग्रस्त विषय असेल तर त्यात सहभागी होत नाहीत, हे इथे नमूद करणं आवश्यक आहे.
क्रिकेट पत्रकार विजय लोकपल्ली म्हणतात, "खेळाडू तिथे वर्ल्ड कप खेळायला गेले आहेत आणि त्यांचं मुख्य लक्ष पुढील सामना जिंकण्यावर आहे. पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीला काही प्रश्न विचारण्यात आला तर कदाचित तो त्यावर उत्तर देईलही."
शिवाय, खेळाडू बीसीसीआयशी करारबद्ध असतात, त्यामुळे बीसीसीआयची परवानगी असल्याशिवाय खेळापलीकडच्या काही प्रश्नांवर त्यांना टिप्पणी करता येत नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)