प्रणिती शिंदे - ईडी पान तंबाखूच्या दुकानासारखे झालं आहे #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविधं वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. ईडी पान तंबाखूच्या दुकानासारखे झालं आहे- प्रणिती शिंदे

"ईडी (ED) म्हणजे पान तंबाखूच्या दुकानासारखे झालं आहे. भाजप सरकारच्या काळात ईडी, सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थांचा वापर हा राजकारणासाठी केला जात आहे. भाजपच्या विरोधात बोललात तर केव्हाही ईडीची धाड पडू शकते. ती माझ्या घरीही पडू शकते," अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

ज्या लोकांनी शेतकऱ्यांना मारलंय ते लोक आज खुशाल बाहेर फिरतायत आणि निर्दोष लोक जेलमध्ये आहेत, भाजपची लोक केवळ आग लावण्याचं काम करत आहेत, असंही प्रणिती यांनी म्हटलं.

त्या सोलापुरातील एका सभेत बोलत होत्या.

आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं, "भाजपमुळे देशातील सामाजिक वातावरण बिघडलं आहे. देशात सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या भीतीमुळेच सर्वजण घरात बसले आहेत. आज मी यांच्या विरोधात बोलतेय तर माझ्या घरीही ईडीची धाड पडू शकते. ईडी म्हणजे पान-तंबाखूचं दुकान झालंय. कुणाच्याही घरात घुसतात आणि लोकांना उचलून नेतात."

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

2. मागासवर्गीय असल्यानेच वानखेडेंना टार्गेट केलं जातंय- रामदास आठवले

आर्यन खान प्रकरणी एका साक्षीदारानेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. विरोधकांनीही वेळोवेळी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलं आहे.

वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय, असा आरोप आठवले यांनी केला आहे. समीर वानखेडे यांना संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना भेटून त्याबाबतची मागणी करण्यात येणार आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

"समीर वानखडे हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरात समीर वानखेडे यांनी अनेक धाडी टाकून चांगली कामगिरी केली आहे. पण त्यांनी काही चुकीचं केल असेल तर त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले असते," असंही आठवले यांनी म्हटलं.

प्रभाकर साईल या केपी गोसावीच्या बॉडीगार्डचीही चौकशी झाली पाहिजे. प्रभाकर साईल यांच्यावर जर राजकीय दबाव असेल तर त्या राजकीय दबावाचा देखील तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

3. नावं बदलल्याने शहरांचा विकास होत नाही- अमोल मिटकरी

भाजपने शहरांच्या नामांतरावरून राज्य सरकारला वेठीस धरू नये. शहरांची नावं बदलल्याने विकास होत नसतो, तर तिथल्या लोकांचा विकास महत्त्वाचा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

मिटकरी हे उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी उस्मानाबाद-धाराशिव या नामांतराबद्दल भाष्य केलं.

"औरंगाबादच्या नामांतराचा विषय महत्त्वाचा आहे. पण नाव संभाजी महाराजांचं द्यायचं आणि तिथे विकास नसणं, कचऱ्याचे प्रश्न भेडसावत आहेत," असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

"महाराष्ट्र सरकारने औरंगाबादच्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलं आहे. लवकरच शासन त्यावर निर्णय घेईल. उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याची मागणी होत असली तरी आजही भाजप नेत्यांच्या लेटरपॅडवर उस्मानाबाद लिहिलेलं आहे. जे या नामांतराची मागणी करत आहेत, ते राज्य सरकारला वेठीस धरतात. मग गुजरातमधील सर्वांत मोठं शहर असलेल्या अहमदाबादचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलून दाखवावं," असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

4. आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी गोंधळ

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गोंधळ प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशीही कायम राहिला. विभागाच्या 'क' गटातील पदांसाठी रविवारी (24 ऑक्टोबर) झालेल्या परीक्षेत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळण्यात विलंब, चुकीच्या पदाच्या प्रश्नपत्रिका असा अनुभव विद्यार्थ्यांना आला.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घोळानंतर परीक्षेच्या दिवशीही गोंधळ झाल्याने उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

आरोग्य विभागांतर्गत वर्ग 'क' आणि 'ड' वर्गाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिल्लीतील न्यासा कम्युनिकेशन्स कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.

ही कंपनी निविदा प्रक्रियेतून निवडण्यात आली असून, गेल्या महिन्यात या परीक्षा होणार होत्या. मात्र, गेल्या महिन्यात न्यासाने पुरेशी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून न दिल्यामुळे ऐनवेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

त्यावेळी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माफी मागितली होती. त्यानंतर 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर अशा दोन दिवशी या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.

5. अमित शाह यांनी काश्मिर दौऱ्यात शहीदाच्या पत्नीला दिली सरकारी नोकरी

कलम 370 हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारपासून (22 ऑक्टोबर) तीन दिवसांच्या या दौऱ्यात पहिल्याच दिवशी गृहमंत्री श्रीनगरला दाखल झाले.

त्यानंतर अमित शाह थेट नवगावला पोहोचले. इथे त्यांनी पोलीस निरीक्षक परवेज अहमद धर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी शहिदाची पत्नी फातिमा धर यांना जम्मू काश्मीर प्रशासनात सरकारी नोकरी दिली असून त्यांना थेट नियुक्ती पत्र सोपवलंय.

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा व्यवस्था आणखीनच मजबूत करण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनसार, खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलं होतं.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)