मुंबई : अविघ्न पार्कमधील आग आटोक्यात, 19व्या मजल्यावरून उडी मारणाऱ्याचा मृत्यू

मुंबईच्या लालबाग परिसरात एका उंच इमारतीला आग लागली होती. अविघ्न पार्क असं या इमारतीचं नाव आहे. ही आग अटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे.
या घटनेची पूर्ण चौकशी केली जाईल, असं वक्तव्य मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केलंय.
आता आग विझवण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं चहल म्हणालेत.
तर "आम्ही उपलब्ध फायर सेफ्टी मशिनरी वापरण्याचा प्रयत्न केला. पण काहीच सुरू नव्हतं. फायर स्टिस्टीम काम करत असती तर आग मोठी झाली नसती," असं इमारतीमधल्या रहिवाशांचं म्हणणं आहे.
या आगीतल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.
दरम्यान "सोसायटीतील रहिवासी सांगतात की फायर सिस्टिम काम करत नव्हती. ही चूक मॅनेजमेंटची आहे. ते दोषी आहेत. यांच्यावर कारवाई करायला पाहिजे," असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम या इमारतीच्या 19 व्या मजल्यावर सुरुवातीला आग लागली होती.
इमारतीच्या दोन्ही बाजूंनी ही आग पसरत असल्याचं दिसून येत होतं. आग काही प्रमाणात वरच्या बाजूला विसाव्या मजल्यावरही पोहोचली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लालबागचा हा परिसर चिंचोळ्या गल्ल्यांचा आहे. तसंच या परिसरात वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आग विझवण्याच्या कामात अडचणी येत होत्या.
सकाळी 11 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास आगीची महिती अग्निशमन विभागाला मिळाली होती. अग्निशमन दलाचे 14 बंब तसंच इतर संबंधित पथकांनी मिळून ही आग अटोक्यात आणली.
एका व्यक्तीचा मृत्यू
अविघ्न पार्कमधून एक व्यक्ती पडतानाचं दृश्यही समोर आलं आहे. आगीमुळे बाहेर पडता येत नसल्याने इमारतीच्या 19 व्या मजल्याच्या गॅलरीत ही व्यक्ती लटकत होती. पण हात सुटल्यामुळे ही व्यक्ती खाली पडल्याचा व्हीडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे.
या व्यक्तीचं नाव अरूण तिवारी असून त्याचं वय 30 वर्षं असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या घटनेत तिवारी यांचा मृत्यू झाला आहे.
आगीची पातळी लेव्हल 3 वरून लेव्हल 4 वर
अग्निशनमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आगीची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर तिची विभागणी लेव्हल 3 अशी करण्यात आली होती. पण नंतर विभागाने दिलेल्या अपडेटमध्ये आगीची पातळी लेव्हल 4 वर गेल्याची माहिती प्रशासनाने दिली.
आग विझवण्यासाठी लागणारी कुमक आणि इतर संसाधने यांच्यानुसार आगीची पातळी ठरवण्यात येते. लेव्हल 3 म्हणजे पाण्याचे 16 पर्यंत बंब आणि वरीष्ठ अधिकारी त्याठिकाणी उपस्थित असणे असा त्याचा अर्थ होतो.
हे मनुष्यबळ वाढवण्यात आल्यानंतर आग लेव्हल 4 पर्यंत गेल्याचं निश्चित केलं जातं, अशी माहिती माजी अग्निशमन दलाचे माजी अधिकारी प्रताप करगुप्पीकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक
अविघ्न पार्क इमारत ही मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक मानली जाते.
एकूण 64 मजली ही इमारत असून करी रोड स्थानकाजवळ महादेव पालव मार्गावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी ही इमारत बांधण्यात आलेली आहे.
अनेक उच्चभ्रू लोक या इमारतीत राहतात. निवासी इमारत असली तरी खूपच कमी प्रमाणात या ठिकाणी लोक राहत होते. अद्याप याठिकाणी सुशोभीकरण आणि इतर कामं सुरू होती, अशी माहिती मिळाली आहे.
या इमारतीतील घरांची किंमत 13 कोटींच्या घरांत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








