मुंबई : कमला मिलची आग या चौघांनी पाहिली

मुंबईच्या लोअर परळ भागातल्या गुरुवारी मध्यरात्रीनंतर एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जण ठार झाले. पण काही जण नशीबाने बचावले. काय पाहिलं त्यांनी?
ज्या बिल्डिंगच्या गच्चीवर आग लागली तिथंच 'TV 9' या मराठी या वाहिनीचं कार्यालय होतं. तिथं आउटपूट डेस्कवर असलेले पत्रकार स्वप्नील चव्हाण यांनी बीबीसी मराठीला आपला अनुभव सांगितला :
"आम्ही नाईट शिफ्टचे कर्मचारी सकाळच्या बुलेटीनचं काम करत होतो. 12.15 ला गोंधळाचा आवाज आला. पण त्या भागात पार्ट्या नेहमीच होत असल्यानं आम्हाला हा गोंधळ त्याचाच आवाज वाटला."
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 1
"पण 12.25ला धावपळ सुरू झाली. आम्हाला मुख्य दरवाज्यातून बाहेर पडता आलं नाही, कारण वरून आगीचे गोळे पडत होते. त्यामुळे आम्ही आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर पडलो. पुढच्या भागात आलो तर रूफटॉप हॉटेलचं छत खाली पडलं. ते माझ्या बाईकवरच पडलं."
ही घटना घडली तेव्ह बीबीसी गुजरातीचे संपादक अंकुर जैन कमला मिल्सच्या याच इमारतीत असलेल्या वन अबाव्हमध्ये होते. त्यांनी सांगितलेला हा अनुभव :
"काही मित्र आणि बहिणीसोबत एक मस्त संध्याकाळ घालवायला मी इथे आलो होतो. पण ही रात्र अचानक अशी भयावह होईल, असं वाटलं नव्हतं."
"आम्ही वन अबाव्ह रेस्टॉरेंटमध्ये होतो जेव्हा कुणीतरी ओरडलं, "पळा, पळा. आग लागलीये!"
"काही सेकंदात तिथे धावपळ सुरू झाली आणि काही कळायच्या आतच आगीने अख्खा परिसर वेढला गेला."
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 2
"कमला मिल्स मुंबईतलं एक प्रशस्त आणि महागड्या हॉटेल्सचं ठिकाण आहे. पण इथली सुरक्षा व्यवस्था फारच कुचकामी होती. आपत्कालीन व्यवस्था तर तिथे अजिबातच नाही."
"फायर एक्झिटच्याच मार्गावर प्रथम आग लागली. आम्ही कसं तरी बाहेर निघालो, पण सर्वांचं नशीब चांगलं नव्हतं."
"आम्ही धडपड करत पायऱ्यांवरून खाली उतरत असतानाच वर रूफटॉपवरून काही स्फोटांचा आवाज ऐकू येत होता... बापरे! भयानक होता तो अनुभव!"
"या हॉटेलकडे परवाना होता की नाही, कुणास ठाऊक. पण अशा हॉटेलना परवाना मिळतो तरी कसा, हे नवलच!"
रात्री आग लागली त्या क्षणी घटनास्थळी TV 9 चे वार्ताहर शरद जाधव होते. बीबीसी मराठीला त्यांनी सांगितलं :
"आग लागल्याचं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा कुतूहलापायी आम्ही बाहेर आलो. पण आमचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलं होतं. म्हणून आम्ही बाहेर येऊ शकत नव्हतो."
"मग आम्ही लगेच ओरडत खाली गेलो. नाईट शिफ्टमध्ये आमच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांना आम्ही तत्काळ बाहेर काढलं. आणि तेवढ्यातच हे मोठं छत खाली पडलं."

फोटो स्रोत, Janhavee Moole / BBC
"म्हणजे थोडा जरी उशीर झाला असता, पाच-दहा मिनिटं तर कदाचित ना आम्ही बाहेर येऊ शकलो नसतो ना वाचलो असतो."
"आणि बाहेर आल्यावर पाहिलं, हे छत जळत होतं. 10-15 मिनिटात अग्निशमन दलाचे बंब आले आणि त्यांनी दोन-तीन तासांनंतर आग आटोक्यात आणली. पण त्यानंतर एकापाठोपाठ एक मृतदेह बाहेर काढण्यात आले, आम्ही हादरून गेलो."
"ही खूपच दु:खद घटना आहे. जे कोणीही दोषी असतील, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. आणि ज्यांनी नियमांचं पालन केलं नाही, अशांवरही कारवाई व्हायला हवी."
सुरक्षारक्षक बनला तारणहार
आग लागली तेव्हा घटनास्थळी इमारतीत काम करणारे सुरक्षारक्षक महेश साबळे एका हॉटेलाच्या दाराजवळ होते. एका वृत्तानुसार, आत अडकलेल्या काही लोकांनी आगीचं कळताच बाथरूमकडे धाव घेतली, आणि अनेकांचा तिथेच मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Janhavee Moole / BBC
पण महेश यांनी वेळ न दवडता लगेच लोकांना खाली उतरण्यास सांगितलं. खाली त्यांचे दोन गार्ड सहकारी, सूरज गिरी आणि संतोष होतेच. त्यांनाही त्यांनी सतर्क केलं आणि लोकांना खाली उतरण्याचा मार्ग दाखवला.
बीबीसी प्रतिनिधी जान्हवी मुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, महेश साबळे यांनी जवळपास 100-150 लोकांचा जीव या आगीतून वाचवला.
दरम्यान, या आगीला कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. निष्काळजीपणामुळे एवढ्या जणांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या इतरांवरही कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबईतील कमला मिल इथे आगीत भस्मसात झालेलं हेच ते हॉटेल
आणखी वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









