नरेंद्र मोदी भाषण : लशीचे 100 कोटी डोस पूर्ण, हा फक्त आकडा नाही, यात भारताच्या सामर्थ्याचं प्रतिबिंब

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

एका बाजूला भारताने कर्तव्याचं पालन केलं. दुसरीकडे त्याला यशही मिळालं. भारताने 100 कोटी लशींचे डोस पूर्ण केले. हे खूप मोठं यश आहे. त्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन करतो. 100 कोटी हा फक्त एक आकडा नाही तर आपल्या सामर्थ्याचं ते प्रतिबिंब आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

आज (शुक्रवार, 22 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता देशाला संबोधून भाषण करताना मोदी बोलत होते.

यावेळी कोरोना लशीसंदर्भात भारताच्या कामगिरीचं जगभरात कौतुक होत असल्याचं मोदींनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "लोक भारताच्या लसीकरणाची तुलना इतर देशांशी करत आहेत. भारताने ज्या वेगाने लसीकरणाचा हा टप्पा पूर्ण केला, त्याचं कौतुक केलं जात आहे. पण याची सुरुवात कशी झाली तेसुद्धा महत्त्वाचं आहे.

जगातील इतर मोठ्या देशांसाठी लस शोधणं, त्याचं उत्पादन यासाठीचं तंत्रज्ञान पूर्वीपासून उपलब्ध होतं. आपणही त्यांच्याकडून मिळणाऱ्या लशींवर अवलंबून होतो. त्यामुळे 100 वर्षांतली सर्वात मोठी साथ भारतात आली, तेव्हा अनेक प्रश्न भारतासमोर उपस्थित झाले होते.

लसीचे 100 कोटी डोस सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत

भारत या साथीशी कसा लढणार, इतर देशांकडून लस विकत घेण्यासाठी भारत इतका पैसा कुठून आणेल, भारताला लस मिळणार की नाही, मिळाली तरी नेमकी कधी मिळेल, साथीचा फैलाव रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात लसीकरण भारत करू शकेल का, अशा प्रकारचे कित्येक प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आले.

पण आज 100 कोटी लशींचे डोस त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत, असं मोदींनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले, "भारताने 100 कोटी लशींचे डोस तेसुद्धा मोफत दिले आहेत. त्यासाठी कोणतेच पैसे घेतले नाहीत. 100 कोटी डोस देण्याचा एक परिणाम असाही होईल की जग भारताला कोरोनापासून सुरक्षित मानेल. औषध निर्मिती क्षेत्रात भारताचं सामर्थ्य जगाला कळेल. संपूर्ण जग भारताची ही ताकद पाहत आहे, त्याची जाणीव त्यांना झाली आहे.

लसीकरणात भेदभाव नाही

भारताची लसीकरण मोहीम सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. भारतासारख्या लोकशाही देशात कोरोना साथीविरुद्ध लढणं खूपच अवघड असेल, असं म्हटलं जात होतं. इतकं संयम, इतके सगळे नियम देशात कसे पाळले जातील, असंही म्हटलं गेलं.

लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लस घेण्याचं प्रमाण अजुनही कमी आहे.

पण आमच्यासाठी लोकशाहीचा अर्थ सबका साथ, सबका विकास हा आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले.

गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या क्षेत्रात काम करण्यात आलं. आजार कोणाबाबतही भेदभाव करत नाही. त्यामुळे लसीबाबतही भेदभाव होऊ शकत नाही. त्यामुळे लसीकरण मोहिमेवर व्हीआयपी संस्कृतीचा प्रभाव पडू नये, याची खात्री केली गेली.

कुणी कितीही मोठ्या पदावर असो, कितीही श्रीमंत असो, त्याला लस सामान्य नागरिकांप्रमाणेच मिळेल, असं मोदींनी सांगितलं.

लशीसंदर्भात जगभरात असलेल्या उदासीनतेचाही मोदींनी यावेळी उल्लेख केला.

ते म्हणाले, "सुरुवातीला असं म्हटलं गेलं की बहुतांश नागरीक लस घेण्यासाठी येणार नाहीत. जगभरात लसीबाबत उदासीनता हे मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. पण भारतीय नागरिकांनी 100 कोटी लशींचे डोस घेऊन त्या लोकांना निरुत्तर केलं आहे."

कोरोनाविरुद्धच्या लढाईला जनआंदोलन बनवलं

कोणत्याही मोहिमेत जेव्हा सगळ्यांचा प्रयत्न जोडला जातो, तेव्हा त्याचे परिणाम अद्भुतच असतात.

कोरोना साथीच्या सुरुवातीला महामारीविरुद्धच्या लढाईत आपण जनभागिदारी ही आपली पहिली ताकद बनवली.

तीच आपली संरक्षणासाठीही पहिली फळी होती. थाळी, दिवे यांच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धच्या लढाईला जनआंदोलन बनवण्यात आलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

देशाने आपल्या एकजुटीला ऊर्जा देण्यासाठी टाळ्या, थाळ्या वाजवल्या. दिवे लावले.

यामुळे साथ नष्ट होईल का, असा प्रश्न काही लोकांनी विचारला होता.

पण आपल्या सगळ्यांना त्यामध्ये देशाची एकता दिसून आली. सामूहिक शक्तीचा जागर दिसून आला.

याच ताकदीने कोव्हिड लसीकरणात देशाला इतक्या कमी वेळेत 100 कोटींपर्यंत पोहोचवलं आहे.

शास्त्रीय आधारावरच मोहिमेची अंमलबजावणी

आपल्या देशाने कितीतरी वेळा एका दिवसात एक कोटीचा आकडा पार केला. हे खूप मोठं सामर्थ्य आहे. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आहे. मोठमोठ्या देशांकडेही असं सामर्थ्य नाही.

भारताची संपूर्ण लसीकरण मोहीम विज्ञानाच्या पोटात जन्मली. वैज्ञानिक आधारावरच ती वाढली. तसंच वैज्ञानिक पद्धतीनेच ती चारही दिशांना पोहोचली.

कोरोना चाचणी

फोटो स्रोत, Getty Images

लस तयार होण्यापूर्वी आणि बनल्यानंतर आपला वैज्ञानिक दृष्टीकोन कायम होता.

उत्पादनाबाबत अनेक आव्हानं आपल्यासमोर होती.

इतका मोठा देश, इतकी मोठी लोकसंख्या, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, दूर्गम भागात लस कशी पोहोचवायची हा प्रश्न आपल्यासमोर होता.

कोणत्या भागात किती लस पोहोचायला हवी, त्यासाठी वैज्ञानिक फॉर्म्युल्याबाबत काम झालं.

आपल्या देशाने कोव्हिन प्लॅटफॉर्मची यंत्रणा बनवलेली आहे. जगभरात ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

भारतात बनलेल्या कोव्हिन प्लॅटफॉर्मने केवळ सर्वसामान्यांनाच सोय करून दिली असं नव्हे तर त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचंही काम अतिशय सोपं झालं.

सगळ्याच क्षेत्रात उत्साहाचं वातावरण

आज चारही दिशांना एक विश्वास, उत्साह, उमेद दिसून येत आहे. समाजापासून ते अर्थव्यवस्थेत प्रत्येक ठिकाणी उत्साहवर्धक वातावरण दिसून येत आहे.

तज्ज्ञ आणि देशविदेशातील संस्था भारताबाबत सकारात्मक आहेत. भारतीय कंपन्यांमध्ये विक्रमी गुंतवणूक येत आहे. तसंच तरुणांसाठी रोजगारांची संधी उपलब्ध होत आहे. स्टार्टअप, हाऊसिंग क्षेत्रात वाढ पाहायला मिळत आहे.

दिवाळी खरेदी

गेल्या काही दिवसांत भारताने केलेले अनेक बदल, पुढाकार भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी वेगाने पुढे घेऊन जाण्यात मोठी भूमिका बजावतील.

कोरोना काळात कृषि क्षेत्राने आपली अर्थव्यवस्था सांभाळून ठेवली. आज विक्रमी संख्येत सरकारकडून पीकाची खरेदी होत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जात आहेत.

लसीकरणाचं प्रमाण वाढत असताना आर्थिक, सामाजिक गतिविधी, क्रीडा क्षेत्र, पर्यटन, मनोरंजन अशा सगळ्याच क्षेत्रात सकारात्मक घडामोडी वेगाने घडताना दिसून येत आहेत.

येणारा सणासुदीचा काळ याला आणखी गती देईल.

मेड इन इंडिया वस्तू विकत घ्या

एक काळ असा होता, इतर देशांत बनलेल्या वस्तूंना जास्त मागणी होती. पण सध्याच्या काळात मेड इन इंडिया वस्तूंची ताकद मोठी असते हे सर्वांना कळून चुकलं.

त्यामुळे देशातील नागरिकांनी लहानातली लहान वस्तूसुद्धा मेड इन इंडियाच विकत घेण्यावर भर द्यावा.

सगळ्यांच्याच प्रयत्नातून हे शक्य होईल.

स्वच्छ भारत अभियान हे जसं जनआंदोलन आहे. त्याचप्रकारे भारतात बनलेली वस्तूच खरेदी करणं, व्होकल फॉर लोकल हे आपल्याला व्यवहारात आणावं लागेल. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे शक्य आहे.

मागच्या दिवाळीत प्रत्येकाच्या मनात एक तणाव होता. पण या दिवाळीला लसीच्या 100 कोटी डोसमुळे एक विश्वासाचं वातावरण आहे.

लस आपल्याला विश्वास देऊ शकत असेल तर देशात बनवलेल्या वस्तू आपली दिवाळी आणखीन भव्य बनवू शकतात.

दिवाळीच्या दरम्यान केलेले व्यवहार एका बाजूला तर बाकीच्या वर्षातले एका बाजूला अशी परिस्थिती असते. दिवाळीत खरेदी-विक्री अचानक वाढते.

लसीचे 100 कोटी डोस लहानमोठ्या दुकानदारांसाठी आशेचा किरण म्हणून पुढे येतील.

सध्या आपल्यासमोर अमृत महोत्सवी संकल्प आहे. त्यामुळे आपलं हे यश आपल्याला एक नवा आत्मविश्वास देईल.

देश मोठं लक्ष्य निर्धारित करणं आणि ते साध्य करणं जाणतो, हे आपण म्हणू शकतो.

पण त्यासाठी आपण सर्वांनी सतत सावध राहण्याची गरज आहे. निष्काळजीपणा बिलकुल करायचा नाही.

सुरक्षाकवच कितीही मजबूत असलं तरी जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत शस्त्र खाली ठेवता कामा नये.

त्यामुळे मास्कची सवय लावून घ्या. कुठेही बाहेर जाताना मास्क लावूनच बाहेर पडा. ज्यांनी लस घेतली त्यांनी इतरांना त्यासाठी प्रेरणा द्या.

हेही पाहिलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)