Aryan Khan: What's App चॅट आरोपीविरोधात पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतं?

ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अटक केली. आर्यनकडून ड्रग्ज मिळाले नसल्याचं NCB ने कोर्टात मान्य केलं होतं.

आर्यनच्या What's App चॅटमधून ड्रग्ज रॅकेटबाबत माहिती मिळाल्याचा दावा NCB ने केला होता. त्याआधारे त्याला अटक करण्यात आली.

आर्यन खानच्या जामीनाला विरोध करताना NCB ने What's App चॅट कोर्टात सादर केले होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, What's App चॅट पुरावा नाहीत असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय. मग What's App चॅट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.

आर्यन खान प्रकरणी काय झालं?

आर्यन खानला NCB ने 2 ऑक्टोबरला ड्रग्ज प्रकरणी अटक केलं.

आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर NCB ने त्याचा फोन ताब्यात घेतला. त्याचे What's App चॅट तपासण्यात आले होते.

यात NCB ला कतिथरित्या ड्रग्जबाबत माहिती मिळाली.

NBC ने कोर्टात सुनावणी दरम्यान आर्यन खानच्या मोबाईलमधून मिळालेले What's App चॅट सादर केले. NCB ने दावा केला की आर्यन आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित लोकांच्या संपर्कात आहे.

NCB कोठडीची मागणी आणि जामीनाचा विरोध करतानाही नार्कोटिक्स कंटृोल ब्यूरोने What's App चॅटची कोर्टात उल्लेख केला होता.

सेशन्स कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळताना What's App चॅट ग्राह्य धरले होते.

आर्यन खान प्रकरणी अटकेत असलेल्या मुनमुन धामिचाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना What's App चॅटवरून अटक केल्याचा मुद्दा उपस्थित केला

मुनमुन धामिचाचे वकील अली काशिफ खान-देशमुख म्हणाले, "What's App चॅट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. फक्त चॅटवर अटक करू शकत नाही." याला सपोर्ट करण्यासाठी काही ठोस पुराव्याची गरज असते

सेशन्स कोर्टाचं निरीक्षण

Whats App चॅटवरून दिसून येतं की, आर्यन खानचे (आरोपी नंबर 1) अज्ञात लोकांसोबत ड्रग्जबाबत चॅट आहेत. जास्त प्रमाणात ड्रग्ज आणि हार्ड ड्रग्जबद्दल बोलण्यात आलंय. प्राथमिक पुराव्यांनुसार आर्यन खानचे ड्रग्जशी संबंधित लोकांसोबत संबंध होते.

What's App चॅट मधून दिसून येतं की आर्यन खानचे (आरोपी नंबर 1) ड्रग्ज सप्लायर्स आणि पेडलर्ससोबत संबंध आहेत.

What's App चॅटवरून आरोपी नंबर 1 (आर्यन खान) ड्रग्ज कारवायांशी संबंधित आहे असं दिसून येतं. जामीनावर असताना पुन्हा असा गुन्हा करणार नाही असं म्हणता येणार नाही.

कायदेतज्ज्ञांचं मत काय?

What's App चॅट आरोपीविरोधात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकतात का? हे आम्ही कायदेतज्ज्ञ आणि वरिष्ठ वकिलांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

What's App चॅट प्राथमिक पुरावा असू शकत नाहीत. पण गुन्हा सिद्ध करताना त्यांना पुष्टीकारक पुरावा म्हणून वापरता येतं असं कायदेतज्ज्ञ सांगतात.

कायद्याचे जाणकार असीम सरोदे म्हणतात, "What's App चॅट प्राथमिक पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाहीत. हा सेकंडरी एव्हिडन्स (पुरावा) आहे. याला काहीतरी आधार देणारा ठोस पुरावा लागतो."

घटना, परिस्थिती आणि गुन्ह्याच्या साखळी हे सर्व जुळलं पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे.

आर्यन खानला जामीन नामंजूर करताना कोर्टाने What's App चॅटचा आधारही घेतला होता. यावर ते पुढे म्हणाले, "प्रथमदर्शनी पुरावा कोर्टात मांडला पाहिजे. दुय्यम पुराव्याला किंमत देऊन जामीन नाकारणं चुकीचं आहे."

न्यायाची दिशा चुकत असल्याचं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलंय.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी NCB ने मॅजिस्टेृट आणि सेशन्स कोर्टात What's App चॅट सादर केले होते.

बॅाम्बे हायकोर्टाचे वकील रणजित सांगळे म्हणाले, "What's App चॅट एक इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे. पण फक्त सबळ पुराव्यांना आधार देण्यासाठी."

ते पुढे सांगतात, "याची पुरावा म्हणून विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act) कलम 65(b) अंतर्गत प्रमाणपत्राची गरज असते."

What's App चॅटबाबत सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण काय?

टाईम्स ऑफ इंडियात छापण्यात आलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाने साल 2021 मधील सुनावणी दरम्यान What's App चॅट पुरावा नाही असं निरीक्षण नोंदवलं होतं.

सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा यांच्या खंडपीठासमोर दक्षिण दिल्ली महापालिकेची सुनावणी सुरू होती. "What's App चे पुरावा म्हणून मूल्य काय?" असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला होता.

कोर्ट म्हणालं, "सोशल मीडियावर हल्ली काहीही बनवलं जाऊ शकतं आणि डिलीट केलं जाऊ शकतं."

वकील रणजित सांगळे सांगतात, "सुप्रीम कोर्टाने हल्लीच What's App चॅट स्वतंत्र पुरावा म्हणून ग्राह्य घरला जाऊ शकत नाही," असं निरीक्षण नोंदवलं होतं.

What's App चॅटवरून रिया चक्रवर्तीला अटक

जून 2020 मध्ये बॅालावूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्यानंतर बॅालीवूड आणि ड्रग्जचं नातं चर्चेत आलं.

NCB ने सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावलं. तिचा फोन तपासण्यात आला. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार रियाच्या मोबाईलमध्ये रियाने सुशांतसाठी ड्रग्ज घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर रियाला अटक करण्यात आली होती.

त्यानंतर तपासात रियाने ड्रग्ज खरेदीसाठी पैसे दिल्याचं समोर आलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)