अमित शाह : सावरकर खरे देशभक्त, त्यांच्यावर शंका घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. सावरकर खरे देशभक्त; त्यांच्यावर शंका घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे - अमित शाह

गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. यामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सहभाग घेतला आहे.

"विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्ती, त्याग, शौर्य यांच्याबाबत शंका घेता येणार नाही. त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे", असं अमित शाह यांनी म्हटलं.

गृहमंत्री अमित शाह सध्या अंदमान-निकोबारच्या तीनदिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्मारक सेल्यूलर कारागृहास भेट देऊन हुतात्मा स्तंभ येथे पुष्पचक्र अर्पण केलं.

"सावरकर यांना वीर ही उपाधी कोणत्याही सरकारने दिलेली नाही. तर देशातील 130 कोटी लोकांनी त्यांना ती त्यांच्या देशप्रेम, शौर्याबद्दल बहाल केली आहे. त्यांनी कारावासात पशूवत यातना भोगत घाम गाळला. त्यांना दोन जन्मठेपा झाल्या होत्या. त्याबद्दल तुम्ही शंका कशी घेऊ शकता", असा प्रश्न शाह यांनी यावेळी केला. ही बातमी लोकमतने दिली.

2. पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी - उद्धव ठाकरे

"नुकताच पितृपक्ष होऊन गेला. या काळात चांगलं काम करू नये, असं म्हणतात. पण मला जेव्हा एखादी गोष्ट करायची असते आणि पितृपक्ष असतो. त्यावेळी तो वडिलांनीच स्थापन केल्याचं मी सांगतो. वडिलांनी स्थापन केलेला पक्ष हा पितृपक्ष नाही का, त्यामुळे ही सर्व भोंदूगिरी आहे", असं स्पष्ट मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन नियतकालिकातील लेखसंग्रह ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. सचिन परब यांनी प्रबोधनकारांच्या लेखांच्या ३ खंडांचं संपादन केलं असून मराठी साहित्य मंडळाने याचं प्रकाशन केलंय. यावेळी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचंही लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

"माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे नास्तिक नव्हते. त्यांची देवीवर प्रचंड श्रद्धा होती. पण ढोंगीपणावर लाथ मार असं ते म्हणत. त्यांनी केवळ हे लिहून सोडून दिलं नाही, तर जिथं जिथं ढोंग दिसलं तिथं त्यांनी लाथा मारल्या," असं ठाकरे यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. महाराष्ट्रात धाडशाही - सामना अग्रलेख

आपले पंतप्रधान लोकशाही मानतात, असं गृहमंत्री अमित शाह यांना सांगावं लागलं. कारण भारतात लोकशाही उरली आहे का, हा प्रश्न जगालाच पडला आहे.

सत्य बोलणाऱ्यांवर धाडी घालायच्या, तपास यंत्रणांचा ससेमीरा लावायचा, हीच नवी लोकशाही आहे, अशा शब्दात सामनाच्या रोखठोक या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

अशिक्षितांच्या हातील लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोजत आहोत, हे शाह यांनीच मान्य केलं आहे. तुला काय धाड भरली का, या गंमतीशीर वाक्यप्रचाराचा अनुभव सध्या महाराष्ट्र राज्य घेत आहे. राज्यात कायद्याचं राज्य की धाडीचं, असा सवाल या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

4. केंद्र सरकार देशाचं संविधान बदलू पाहत आहे - प्रकाश आंबेडकर

"केंद्र सरकार देशाचं संविधान बदलवू पाहत आहे. देशात नवीन संविधान आल्यानंतर येणाऱ्या हुकूमशाहीला आपण तोंड देऊ शकणार नाही", अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

आंबेडकर अकोला येथे धमचक्र प्रवर्तन दिनाच्या ऑनलाईन सभेत बोलत होते. देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर आहे. येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये देशात होणाऱ्या घटना कल्पनाशक्तीच्या बाहेर राहतील. त्यामुळे आपण सर्वांनी जागृत असायला हवं असं आंबेडकर यावेळी म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.

5. केरळमध्ये महापुराने आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

केरळमध्ये जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी (16 ऑक्टोबर) केरळमध्ये मदतकार्य करण्यासाठी तिथं लष्कराला तैनात करण्यात आलं.

पुरामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचीही बातमी आहे.

या परिस्थितीशी निपटण्यासाठी केरळमधील दोन जिल्ह्यांमध्ये 11 बचावपथके रवाना करण्यात आली आहेत. तसंच लष्कराकडूनही मदत घेण्यात येत आहे.

केरळच्या तिरुवनंतपुरम आणि कोट्टायम जिल्ह्यांमध्ये ही मदत पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री राजन के यांनी दिली. ही बातमी 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)