Rashmi Rocket: त्या मुलीला एके दिवशी सांगितलं ‘तू स्त्री नाही, पुरुष आहेस’

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ती मुलगी म्हणून लहानाची मोठी झाली. पण एक दिवस कुणीतरी तिला सांगितलं, ती स्त्री नाही, पुरुष आहे, तर?

रश्मी रॉकेट या चित्रपटात रश्मी वीरासमोर हाच प्रश्न उभा राहतो. एक खेळाडू म्हणून, वेगवान धावपटू म्हणून तिच्या वाटचालीला ब्रेक लागतो. पण त्यानं कोलमडून न जाता रश्मी त्याविरोधात उभी राहते.

तापसी पन्नूनं मुख्य भूमिका साकारलेला हा चित्रपट 15 ऑक्टोबरला रीलीज झाला. कुठल्याही बॉलिवूडपटासारखा या चित्रपटात मालमसालाही भरला आहे. त्यामुळे काही वेळा त्यातली संवेदना कमी झाल्यासारखंही वाटतं.

असं असलं, तरी खेळांच्या दुनियेतल्या एका महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यपणे बोललं जात नाही, अशा विषयावर या चित्रपटानं भाष्य केलं आहे.

एखादी व्यक्ती महिला म्हणून खेळण्यास पात्र आहे की नाही, हे ठरवण्यासाठी केल्या गेलेल्या चाचण्यांविषयी ही चर्चा आहे. अशा चाचण्यांना 'जेंडर टेस्ट', 'सेक्स व्हेरीफिकेशन टेस्ट' अशी नावं देण्यामुळे झालेल्या हानीविषयी अजूनही जागरूकता नसल्याचं त्यातून दिसून येतं आहे.

पण या टेस्ट काय असतात? त्या का केल्या जातात? आणि केवळ महिला खेळाडूंनाच अशा चाचणीला का सामोरं जावं लागतं?

खेळामध्ये स्त्री-पुरुष भेद कशासाठी?

आजच्या काळात महिला सगळ्या क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, एकत्रितपणे काम करताना दिसतात. पण खेळांचं जग असं आहे, की जिथे बहुतांश वेळा स्त्री आणि पुरुष वेगवेगळ्या गटांत विभागलेले दिसतात.

यामागचं मुख्य कारण म्हणजे खेळात, विशेषतः मैदानी खेळांत, शारिरीक क्षमता महत्त्वाची असते.

पुरुष आणि स्त्रियांच्या शरीराची रचना वेगवेगळी आहे. याचा अर्थ स्त्रिया पुरुषांपेक्षा कमजोर आहेत असा अजिबात नाही. पण नैसर्गिकरित्या पुरुष उंची, वजन, ताकद याबाबतीत स्त्रियांपेक्षा वेगळे असतात.

त्यामुळे काही खेळांत स्त्री आणि पुरुषांतली स्पर्धा योग्य समान पातळीवर (Fair) होऊ शकत नाही. परिणामी घोडेस्वारी किंवा मिश्र स्पर्धांचा अपवाद वगळला, तर इतर बहुतांश खेळांत खेळाडूंना स्त्री आणि पुरुष गटांत विभागलं जातं.

पण ही विभागणी करताना लावले गेलेले निकष कधीकधी स्त्रियांना असमान वागणूक देणारे ठरत आले. कारण त्या निकषांमध्ये न बसलेल्या पुरुषांना तर पुरुषांच्या गटात खेळण्याची मुभा मिळते, पण महिलांना मात्र तशी मुभा नाही. म्हणूनच या निकषांच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला गेला.

महिला खेळाडूंच्या तपासण्यांचा इतिहास

विसाव्या शतकात महिला खेळाडूंसाठी 'सेक्स व्हेरिफिकेशन टेस्ट' काही काळ बंधनकारक केली गेली होती. त्यात महिला खेळाडूंना अपमानजनक शारिरीक तपासणीला सामोरं जावं लागायचं.

1968च्या ऑलिंपिकपासून क्रोमोझोम्स टेस्ट म्हणजे गुणसूत्रांच्या आधारे केल्या जाणाऱ्या चाचणीचा वापर होऊ लागला.

पुढे 1990च्या दशकात इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन (IAAF) ही ॲथलेटिक्समधली सर्वोच्च संस्था आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटना (IOC) या दोन्ही संघटनांनी अशा चाचण्या बंद केल्या आणि केवळ एखाद्या खेळाडूविषयी संशय आला किंवा कोणी तक्रार केली, तरच तिची तपासणी केली जाऊ लागली.

शरिरातील हार्मोन्सची म्हणजे संप्रेरकांची पातळी काय आहे, या आधारे ती खेळाडू त्या महिलांच्या गटात खेळण्यास पात्र आहे की नाही, हे ठरवण्याची पद्धत पुढे सुरू झाली.

प्रत्यक्षात एखादा पुरुष महिलांच्या वेशात खेळण्याचे प्रसंग विरळच आहेत. इंटरसेक्स (तृतीयपंथी) आणि ट्रान्सविमेन (ज्यांना जन्मतः पुरुष मानलं गेलं होतं, अशा स्त्रिया) खेळाडूंची संख्याही तुलनेनं कमी आहे.

मग असं एखादं प्रमाण किंवा मानक लावून एखादी खेळाडू महिला आहे की नाही, हे निश्चित करणं योग्य ठरतं का? कारण निसर्ग कधी दोन व्यक्ती एकसारख्या बनवत नाही. दोन महिलाही कधी एकसारख्या नसतात. मग ही प्रमाणं कशासाठी असावीत आणि तीही फक्त महिलांसाठीच का असावीत?

हाच प्रश्न भारताच्या दुती चंदनं विचारला. तिचा लढा महिलांच्या हक्काचा आणि मानवाधिकाराचा लढा बनला.

शांती सौंदरराजन ते कॅस्टर सेमेन्या

'रश्मी रॉकेट' हा चित्रपट कुठल्या एका खेळाडूवर आधारीत नाही, असं स्पष्टीकरण सुरुवातीलाच निर्मात्यांनी दिलं आहे.

पण तो पाहताना खऱ्याखुऱ्या खेळाडूंची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. काहींना ही गोष्ट सरळसरळ दुती चंदच्या प्रवासावर बेतलेली आहे असं वाटतं.

दुतीनं वादग्रस्त 'जेंडर टेस्ट'च्या मानकांना आव्हान देण्याआधी भारतात काही खेळाडूंना याच वेदनेतून जावं लागलं होतं.

2001 साली गोव्याची युवा जलतरणपटू प्रतिमा गावकर अशा टेस्टमध्ये अपात्र ठरल्यावर तिनं टोकाचा निर्णय घेत स्वतःचं आयुष्य संपवलं.

पाच वर्षांनी शांती सौंदरराजनवरही तीच वेळ ओढवली. शांतीनं 2006 साली एशियन गेम्समध्ये 800 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं होतं. पण एका 'जेंडर टेस्ट'मध्ये अपात्र ठरल्यावर, तिचं पदक काढून घेण्यात आलं.

शांतीसाठी त्या टेस्टचा निकाल आणि त्यानंतर चव्हाट्यावर झालेली चर्चा हा सगळा धक्का होता. ती एकाकी पडली, तिला नैराश्यानं ग्रासलं आणि तिनं आत्महत्येचाही प्रयत्न केला.

सुदैवानं शांती वाचली आणि नंतरच्या काळात एक प्रशिक्षक म्हणून तिनं वेगळी कारकीर्द घडवली. पण जिंकलेली पदकं तिला गमवावी लागली.

जे शांतीला मिळालं नाही, ते दक्षिण आफ्रिकेच्या कॅस्टर सेमेन्याला मिळालं. आधार, पाठिंबा आणि समाजाचा बदलेला दृष्टीकोन.

सेमेन्यानं वयाच्या अठराव्या वर्षी 2009 साली जागतिक स्पर्धेत 800 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं होतं. पण त्या स्पर्धेआधी सेमेन्याला 'जेंडर टेस्ट' घेण्यास सांगितलं गेल्याचं जाहीर झालं आणि मीडियात चर्चा सुरू झाली..

पण दक्षिण आफ्रिकेतील अथलेटिक्स संघटना सेमेन्याच्या बाजूनं उभी राहिली. साधारण वर्षभरानं सेमेन्याला पुन्हा खेळण्याची परवानगी मिळाली, तिची पदकं कायम राहिली आणि तिच्या वैद्यकीय तपासणीची माहिती जाहीर करण्यात आली नाही.

हायपरअँड्रोजेनिझम म्हणजे काय?

सेमेन्याच्या प्रकरणानंतर IAAFनं तज्ज्ञांच्या एका गटाला हायपरअँड्रोजेनिजम असलेल्या महिला खेळाडूंविषयी अभ्यास करण्यास सांगितलं.

हायपरँड्रोजेनिजम असलेल्या महिलांमध्ये अँड्रोजेन्सचं प्रमाण सामान्य पातळीपेक्षा जास्त असतं. अँड्रोजन म्हणजे टेस्टॉस्टेरॉनसारखी संप्रेरकं जी एरवी पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. बायकांच्या शरिरातही ही संप्रेरकं तयार होतात, पण त्यांची पातळी किंवा प्रभाव तुलनेनं कमी असतो.

पुरुष आणि स्त्रियांमध्ये टेस्टॉस्टेरॉनची 'नॉर्मल' पातळी काय असते, याविषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. मात्र काही महिलांमध्ये नैसर्गिकरित्या हे हार्मोन जास्त प्रमाणात आढळून येतं तसंच काही पुरुषांमध्ये ते कमी प्रमाणात असू शकतं, हेही अभ्यासातून समोर आलं आहे.

अँड्रोजेन्सचं प्रमाण जास्त असलेल्या सगळ्याच व्यक्तींना त्याचा फायदा होतो, असंही नाही.

तर काही व्यक्तींमध्ये अँड्रोजेन इनसेन्सिटिव्हिटी सिंड्रोम आढळून येतो. म्हणजे त्यांच्या शरिरात पुरुषाची गुणसूत्रं (XY) असतात पण त्यांचं शरीर टेस्टॉस्टेरॉनचा वापर करू शकत नसल्यानं, बाहेरून त्यांची रचना स्त्रीसारखी असते. अशा खेळाडूंची विभागणी कशी करायची हाही प्रश्न होता.

IAAFच्या तज्ज्ञांचा गट आणि IOC च्या मेडिकल कमिशनच्या अहवालानंतर शरिरात अँड्रोजेनचं प्रमाण प्रतिलीटर 10 नॅनोमोल्सपेक्षा कमी असलेल्यांना महिलांच्या गटात खेळता येईल, असा नवा नियम 2011 सालापासून लागू केला गेला.

तसंच एखाद्या खेळाडूविषयी प्रतिस्पर्ध्यांनी तक्रार केली किंवा तिच्या ड्रग टेस्टमध्ये विसंगती आढळली तरच तिची अँड्रोजेनसाठी तपासणी केली जाईल आणि याविषयीची माहिती गुप्त राखली जाईल असं निश्चित करण्यात आलं. हायपरअँड्रोजेनिजम असलेल्या मुलींसमोर त्यानंतर वैद्यकीय प्रकियेद्वारा या संप्रेरकांचं प्रमाण कमी करण्याचा पर्याय होता.

दुती चंदलाही असा पर्याय देण्यात आला, तिनं तो नाकारला, प्रवाहाविरुद्ध लढा दिला आणि व्यवस्थेला बदलायला भाग पाडलं.

दुती चंदचा लढा

दुती ओडिशातल्या एका लहान गावात लहानाची मोठी झाली. अठराव्या वर्षी 2013 साली आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्यापासून ती चर्चेत आली.

पण 2014 साली कॉमनवेल्थ गेम्स तोंडावर असताना तिला भारतीय संघातून काढून टाकण्यात आलं. हायपरँड्रोजेनिजमच्या नियमांत बसत नसल्यानं तिला काढण्यात आल्याचंही जाहीर झालं. दुतीला उपचार घेण्याचा सल्लाही देण्यात आला.

बीबीसीशी बोलताना दुतीनं त्या दिवसांविषयी सांगितलं होतं, "त्या काळात मला खूप मानसिक त्रास देण्यात आला. माध्यमांमध्ये माझ्याबद्दल खूप वाईटसाईट बोललं जात होतं. इच्छा असूनही मला ट्रेनिंगला जाता येत नव्हतं. गावांतल्या लोकांना तर मी मुलगा आहे असं वाटायचं, कारण त्यांना या गोष्टी फारशा समजायच्या नाहीत."

दुती एवढ्या परिस्थितीतही खंबीर उभी राहिली. लिंगभेदाविषयी संशोधन करणाऱ्या डॉ. पयोष्णी मित्रा यांनी कोर्ट ऑफ आर्बिटरेशन फॉर स्पोर्टस (CAS) या क्रीडाजगतातल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्यासाठी दुतीला मदत केली.

2015 साली CAS मध्ये दुतीच्या बाजूनं निकाल लागला आणि हायपरअँड्रोजेनिझम विषयीचे नियम IAAF ला मागे घ्यावे लागले. टेस्टॉस्टेरॉनचं वाढीव प्रमाण असलेल्या महिला खेळाडूंना त्यामुळे नेमका किती फायदा होतो, याचा पुरावा समोर आला नसल्याचं कॅसच्या निकालात म्हटलं होतं.

काय आहेत IAAF चे आताचे नियम?

डीएसडी म्हणजे 'डिफरन्सेस ऑफ सेक्स डेव्हलपमेंट' नावानं ओळखल्या जाणाऱ्या गटात केला जातो. डीएसडी म्हणजे जीन्स, हार्मोन्स आणि प्रजोत्पादनाशी संबंधित अवयवांशी निगडीत काही दुर्मिळ स्थिती, जी सामान्य मानकांपेक्षा वेगळी आहे.

2018 साली आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स संघटना IAAFनं महिला आणि इंटरसेक्स ॲथलीट्समधील DSD कंडिशन्सविषयी नवे नियम लागू केले.

त्यानुसार शरीरात XY गुणसूत्र असलेल्या व्यक्ती, अँड्रोजेन इनसेन्सिटिव्हिटी असलेल्या व्यक्ती आणि हायपरँड्रोजेनिजम असलेल्या महिला आणि इंटरसेक्स ॲथलीट्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या 400m ते एक मैलापर्यंतच्या शर्यतींमध्ये खेळता येणार नाही.

त्यांना या शर्यतींमध्ये खेळायचं असेल, तर त्यांच्या रक्तातील टेस्टॉस्टेरॉनचं प्रमाण 5 nmol/L पेक्षा कमी करण्यासाठी औषधोपचार अथवा शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल. बाकीच्या गटांतील शर्यतींसाठी हा नियम बंधनकारक नाही.

कॅस्टर सेमेन्याला या नियमाचा फटका बसला. तिनं त्याविरोधात मोहीम उभी केली आणि कॅसमध्ये अपयश आल्यावर तिनं युरोपियन मानवाधिकार कोर्टात हा विषय नेला आहे. तर केनियाच्या मार्गारेट वाम्बुईनं खेळात थर्ड जेंडरची मागणी केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)