You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दुधी भोपळ्याचा रस कधीकधी घातक का ठरतो? विषारी दुधी ओळखायचा कसा?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
दुधी भोपळ्याचा रस प्यायल्यानंतर झालेल्या फूड पॉयझनिंग म्हणजेच विषबाधेमुळे अभिनेत्री ताहिरा कश्यपला ICU मध्ये अॅडमिट करावं लागलं होतं.
रुग्णालयात योग्य उपचारांनंतर ताहिराची तब्येत आता सुधारली. पण, "हे खरंच जीवघेणं आहे. फक्त आरोग्याचं कारण पुढे करत ज्यूसचं सेवन करू नका. मी काही कारणामुळे ICU मध्ये अॅडमिट होते," असं ताहिराने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय.
आहारतज्ज्ञ म्हणतात, दुधीचा रस किंवा ज्यूसचं सेवन करू नये. यामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
दुधी भोपळ्याच्या ज्यूसमुळे विषबाधा झाल्याच्या घटना फार कमी आहेत. दुधीचा ज्यूस प्यायल्यामुळे त्रास का होतो? विषारी दुधी कसा ओळखायचा? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ताहिराला काय झालं होतं?
काही दिवसांपूर्वी ताहिरा कश्यपने इंन्स्ट्राग्रामवर एक मेसेज पोस्ट केलाय. ज्यात तिने दुधीच्या रसाचं सेवन केल्यामुळे तिला झालेल्या त्रासाची माहिती दिलीये.
लोकांमध्ये दुधीमुळे झालेल्या त्रासाबाबत जनजागृती करण्यासाठी मी व्हीडिओ पोस्ट केल्याचं ताहिराने म्हटलंय.
पोस्टमध्ये ताहिरा म्हणते "मला दुधीमुळे त्रास झाला होता. मी रोज सकाळी दुधी भोपळ्याच्या ज्यूसचं सेवन करते. दुधी कडू असेल तर अजिबात याचं सेवन करू नका. त्यादिवशी कडू असूनही मी दुधीचा ज्यूस घेतला. खूप त्रास झाला."
"हे खरंच जीवघेणं आहे. रक्तदाब 40 वर पोहोचला होता. त्यामुळे फक्त आरोग्याचं कारण पुढे करत ज्यूसचं सेवन करू नका. मी काही कारणामुळे ICU मध्ये अॅडमिट होते," असं ती पुढे म्हणाली.
काही दिवस रुग्णालयात योग्य उपचारांनंतर ताहिराची तब्येत आता सुधारलीये.
कोणत्या दुधी भोपळ्यामुळे विषबाधा होते?
दुधीमुळे फूड-फॉयझनिंग होण्याचं कारण काय? हे आम्ही पोटविकारतज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांच्याकडून जाणून घेतलं.
ते म्हणतात "दुधी कडू असेल तर त्यात टॉक्सिन (विषारी घटक) तयार होतं. या विषारी घटकाचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. किडनी, फुफ्फुसावर परिणाम होतो तर काहींच्या शरीरात रक्तस्रावही होतो." दुधीमुळे विषबाधा होण्याचं प्रमाण जास्त नाहीये. गेल्या 25 वर्षांत त्यांनी दुधीमुळे विषबाधा झालेले फक्त 2 रुग्ण पाहिलेत.
काही दिवसांपूर्वीच दुधी खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल एका वृद्ध महिलेचं ते उदाहरण देतात.
ते पुढे सांगतात, "कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ही महिला नियमीत दुधीचा रस सेवन करत होती. पण कडू आणि खराब झालेल्या दुधीचा ज्यूस प्यायल्यामुळे तिला गंभीर त्रास झाला."
दुधीचा ज्यूस प्यायल्यानंतर चार तासांनी जवळपास 30 जूलाब झाले. उलट्या झाल्या, रक्तबाद कमी झाला. या महिलेला ICU मध्ये अॅडमिट करावं लागलं होतं. किडणीवर परिणाम झाल्याने लघवी बंद झाली आणि डायलेसिस करावं लागलं, असं त्यांनी सांगितलं
विषारी दुधी जीवावर बेततो?
डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, "कडू किंवा खराब दुधीमुळे झालेली विषबाधा जीवघेणी ठरू शकते. रुग्णालयात वेळीच आणि योग्य उपचार मिळाले नाहीत. तर जीवावर बेतण्याची शक्यता असते."
पुण्यात काही वर्षांपूर्वी दुधीचा ज्यूस प्यायल्यामुळे मृत्यू झाला होता, असं ते सागंतात.
साल 2018 मध्ये प्रसिद्ध कलाकर आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांना दुधीचा ज्यूस प्यायल्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपला जीवघेणा अनुभव सांगितला होता.
ते म्हणाले होते, "तो दिवस फार भयानक होता. असा दिवस कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. दुधीचा ज्यूस माझ्यासाठी नवीन नव्हता. पण, कडू दुधीमुळे फार त्रास झाला."
दुधीमुळे झालेल्या विषबाधेची लक्षणं काय?
व्हॉकार्ट रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. अमरिन शेख दुधीमुळे होणाऱ्या विषबाधेची लक्षणं सांगतात,
- पोटदुखी
- नॉशा येणं
- सतत उलट्या होणं
- डायरिया (जूलाब)
- पोटात रक्तस्राव
दुधी कच्चा खाऊ नका
वजन कमी करण्यासाठी हल्ली अनेक लोक दुधीचा रस पितात. तज्ज्ञ म्हणतात दुधी कच्चा कधीच खाऊ नये.
आहारतज्ज्ञ उशाकिरण सिसोदिया सांगतात, "दुधीचा रस किंवा ज्यूसचं सेवन करू नये. यामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते."
दुधीमध्ये कुकुरबिटन्स (cucurbitacins) नावाचा एक केमिकल कंपाउंड असतो. ज्यामुळे दुधीची चव कडू होते.
दुधी कच्चा खाणं किंवा ज्यूस पिण्यापेक्षा योग्य प्रमाणात शिजवून खाल्ला पाहिजे, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
खाण्यासाठी योग्य दुधी कसा ओळखायचा?
तज्ज्ञ सांगतात, प्रत्येक दुधी खराब किंवा विषारी नसतो. पण, दुधी कडवट किंवा कडू असल्यास विषबाधेचा त्रास होतो.
आहारतज्ज्ञ डॉ उज्ज्वला बक्षी याची अत्यंत सोपी पद्धत सांगतात. त्या म्हणाल्या, "दुधी चांगला का खराब हे ओळखण्याची अत्यंत सोपी पद्धत म्हणजे, एक छोटा तुकडा कापून चाखून पहा. चव कडू किंवा कडवट जाणवली तर दुधी खराब झाला असणार."
काकडी खाताना आपण त्याचा एक तुकडा चाखून पहातो. कडू असल्यास काकडी खराब आहे म्हणून फेकून देतो. तसं लोक दुधीच्या बाबतीत करत नाहीत. थेट त्याचा ज्यूस किंवा इतर पदार्थांसाठी वापर करतात.
योग्य दुधी ओळखण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे, "दुधीच्या आतील बिया मोठ्या, पिकलेल्या किंवा खूप जास्त बिया असतील तर दुधी खराब आहे असं समजावं," डॉ. बक्षी माहिती देतात.
डॉ. शेख पुढे म्हणतात, दुधी कडू नसेल तर खाणं योग्य आहे. यात घाबरून जाण्याची काहीज गरज नाही.
दुधीचे फायदे काय?
सारखेचं कमी प्रमाण आणि लो-कॅलरी असल्याने कॅन्सर, हृदयरोग, मधुमेहासारख्या सहव्याधी किंवा गुंतागुंतीचे आजार असलेल्यांसाठी दुधी अत्यंत सुरक्षित भाजी मानली जाते. रोजच्या आहारात शिजवलेल्या दुधीचा वापर केल्यास खूप फायदा होतो.
आहारतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला बक्षी शिजवलेल्या दुधीचे फायदे सांगतात,
- लो-कॅलरी भाजी असल्याने वजनावर नियंत्रण ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त
- 100 ग्रॅम दुधीमध्ये फक्त 15 टक्के पिष्ठमय पदार्थ असतात
- फायबरचं प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही
- साखरेचं प्रमाण कमी असल्याने मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगला उपाय
- शरीरातील कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रणात रहातं
- दुधीमधील एक विशिष्ठ घटक मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे
तज्ज्ञ सांगतात, मधुमेहामुळे रुग्णांच्या किडणीवर परिणाम होऊन शरीरातील क्रिएटीनिनचं प्रमाण वाढतं. अशा रुग्णांनाही शिजवलेला दुधी खाण्याची सूचना केली जाते.
आहारतज्ज्ञ उशाकिरण सिसोदिया म्हणतात, "दुधीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. वजन कमी करण्यासाठी लागणारे पौष्टीक घटक यात जास्त प्रमाणात आढळून येतात. तसंच, कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप कमी आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)