You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात काही कॉलेज उघडले, काही नाही उघडले, असा गोंधळ का?
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे कॉलेजेस बंद होती. आज कॉलेज उघडणार म्हणून पुण्यातील विद्यार्थी उत्साहात आज सकाळी कॉलेजला पोहोचले पण तिथं गेल्यावर त्यांना कळलं अजून कॉलेज सुरूच झाले नाही.
या गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुण्यातली महाविद्यालयं मंगळवारपासून सुरू होतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं होतं. हे ऐकून, वाचून विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये आले देखील मात्र यासंदर्भात कागदोपत्री निर्णय न झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
एक-दोन दिवसात महाविद्यालयं कधी सुरू होतील जाहीर करू- उदय सामंत
"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याशी बोलून महाविद्यालयं सुरू करण्यासंदर्भात निर्णयाची फाईल दिलेली आहे. महाविद्यालयं बंद करण्याचा निर्णय आपात्कालीन कायद्यानुसार घेण्यात आला होता.
"महाविद्यालयं सुरू करण्याची तारीख दोन दिवसात जाहीर करतोय. असं असताना फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झालं. बाकी महाविद्यालयं बंद आहेत," असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "महाविद्यालय सुरू करताना संचालकांशी बोलून घ्यायला हवं होतं. उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही फाईल पाठवली आहे. महाविद्यालयं सुरू करायचीच आहेत. त्याची तारीख एक-दोन दिवसात जाहीर करू.
"त्यासंदर्भात एसओपीही जारी करण्यात येईल. महाविद्यालयाने आता पत्रक काढलं आहे. ऑटोनॉमस विद्यालयांमध्ये विद्यार्थी आज गेले होते. पण तासिका झाल्या नाहीत. फर्ग्युसनमध्ये काही तासिका झाल्या. त्यांनादेखील कळवण्यात आलं होतं," असं सामंत म्हणाले.
'महाविद्यालयं सुरू करण्यासाठी शासनाचा आदेश नाही'
'महाविद्यालयं सुरू करण्यासंदर्भात शासनाचा आदेश जारी झालेला नाही,' असं संचालक उच्च आणि तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक धनराज माने यांनी सांगितलं.
आदेश जारी झाल्यानंतर महाविद्यालयं सुरू करण्यात येतील असं ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात यासंदर्भात घोषणा केली होती. पुणे जिल्ह्यातील कोरोना संख्या आटोक्यात आल्याने असा निर्णय घेण्यात आला.
या गोष्टी सुरू होतील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आता सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहे, मात्र कोरोना नियमाचं पालन करणं बंधनकारक असणार आहे."
"22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेऊ असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं होतं. सोबतच पुण्यातील हॉटेल आता 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
"पुढच्या काही दिवसांत टप्प्या टप्प्याने पुण्यातील नाट्यगृह, पर्यटन स्थळं आणि विद्यापीठं सुरू करू," असं ते म्हणाले होते. त्यानुसार, सोमवारपासून पुण्यातील महाविद्यालयं आणि पर्यटन स्थळं सुरु करण्यात आली.
कॉलेज सुरू होणार म्हणून पुण्यात आलो, आम्ही इथे थांबायचं का?
"महाविद्यालये सुरू होणार याबाबत मी बातम्यांमध्ये पाहिले. अजित पवार यांनी पुण्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार असे जाहीर केले होते. त्यामुळे मी गावावरून पुण्यात आलो. इकडे आल्यावर लेखी आदेश आले नाहीत म्हणून महाविद्यालय बंद राहील असं सांगण्यात आलं. मी पुण्यात रूमच भाडं भरलंय. येण्याचा खर्च झालंय. अजूनही महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत सरकारी पातळीवर गोंधळ आहे. या गोंधळामुळे आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे", असं रोहित ढाले या विद्यार्थ्याने सांगितलं.
"अजूनही आमचे ऑनलाईन लेक्चर्स सुरू आहेत कॉलेज कधी सुरू होईल याबाबत अजून कॉलेजकडून काही सांगण्यात आलं नाही. लेखी आदेश आल्यावरच कॉलेज सुरू होईल असं कॉलेजकडून सांगण्यात येतंय", असं नीलम पवार या विद्यार्थिनीने सांगितलं.
दरम्यान पुणे महानगरपालिकेने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्याबाबतचे आदेश देखील काढले होते. त्यानुसार आम्ही महाविद्यालय सुरू केले. पुढे देखील महाविद्यालय सुरू राहील असं फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र परदेशी यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)