बायकोच्या अंगावर विषारी नाग सोडून हत्या, हुंड्यासाठी नवऱ्याने केलं कृत्य

माणसानं दुसऱ्या माणसाचा जीव घेण्यासाठी म्हणजे हत्या करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केल्याचं तुम्ही आजवर ऐकलं असेल.

'प्रिय'जनांवर विषप्रयोगही केल्याचं तुम्ही अगदी पुराणकथांपासून रोजच्या वर्तमानपत्रात सगळीकडे वाचलं असेल. पण आता सापालाच सोडून त्याच्या दंशाद्वारे हत्या करण्याची नवी पद्धत आल्याचं स्पष्ट झालं आहे.

केरळ राज्यात झालेल्या एका घटनेकडे या पद्धतीवर नवा प्रकाश पडला आहे.

काय घडलं केरळमध्ये?

ही घटना केरळमधील कोल्लम येथे घडली आहे. आपल्या पत्नीला सर्पदंश घडवून मारणाऱ्या पतीला येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सूरज आणि उथरा या पती-पत्नीमध्ये हा प्रकार घडला आहे.

25 वर्षिय उथराचा 6 मे रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक वाटला. मात्र नंतर शंका आल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला.

त्याचप्रमाणे सहा सदस्यांच्या एका टीमने एअरकंडिशन्ड खोलीत साप शिरण्याची शक्यता नाही आणि कोणीतरी मुद्दाम खोलीत साप सोडला असावा असं मत मांडलं होतं.

यामध्ये उथराचा नवरा सूरजने हा प्रकार घडवून आणल्याचं उघड झालं. आपल्या पत्नीचा मृत्यू व्हावा यासाठी त्याने सुरेश नावाच्या एका व्यक्तीकडून 10 हजार रुपयांना नाग विकत घेतला होता.

तो आपल्या बॅगेत लपवूनही ठेवला. नंतर पत्नी झोपली असताना तो तिच्या अंगावर टाकला. हा नाग दोनवेळा उथराला चावला. त्यातच तिचा मृत्यू झाला.

सापांना कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण सूरजने घेतल्याचे पुरावे देखील न्यायालयात सादर करण्यात आले.

याआधीही केलेला प्रयत्न

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार उथराचा मृत्यू गळ्याला नाग चावल्यामुळे झाला आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात उथराला मारण्यासाठी सूरजने मार्च महिन्यात सुरेशकडून घोणस विकत घेतला होता. मात्र त्यामध्ये त्याला यश आले नाही.

2 मार्चला घोणस चावल्यावर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. 22 एप्रिलपर्यंत तिच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले होते.

त्यानंतर सूरजने नाग विकत घेऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस मात्र उथराचा मृत्यू झाला.

7 मे 2020 ला उथरा झोपेत असताना नागकडून दंश करून घेण्यात आला. त्यात तिचा मृत्यू झाला.

उथराच्या माहेरच्या लोकांनी सूरजची तक्रार दाखल केली. उथरा आणि सूरजच्या लग्नाला दोन वर्षं झाली होती. तो हुंड्यासाठी त्रास देत होता असं तिच्या माहेरच्या लोकांनी तक्रारीत म्हटलं होतं.

भारतामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरसं हे चार विषारी साप आढळतात.

साप विकणारा सुरेश कोण आहे?

या सर्व खटल्यामध्ये सूरजला साप विकणाऱ्या सुरेशची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. आपण जर सूरजला नाग विकला नसता तर आज उथरा आज जिवंत असती असं सांगत सुरेश कोर्टामध्ये ढसाढसा रडला आहे.

सुरेशबद्दल कोल्लम वन परिक्षेत्र अधिकारी बीआर जयन यांनी माध्यमांना माहिती दिली होती. ग्राहकांना नागाच्या विषाने 'धुंद' होता यावे यासाठी तो नागाची पिलं पाळत होता असं त्यांनी सांगितलं.

बीआर जयन म्हणाले, काही लोक नागाच्या पिलांचा जीभेवर दंश करुन घेत आणि अशा एका चाव्यासाठी सुरेश 15 हजार रुपये घेत असे, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे.

सूरजने हा साप 24 एप्रिल रोजी एनातू (कोल्लम) येथून विकत घेतला आणि 6 मे रोजी त्याचा बायकोला मारण्यासाठी वापर केला. सूरजने एखाद्या सराईतसारखं सर्व नियोजन केलं होतं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं.

21 जून रोजी सर्व माध्यमांसमोर सूरजने पत्नीला मारण्यासाठी नागाचा कसा वापर केला याचं प्रात्यक्षित करुन दाखवलं. या माध्यमांच्या उपस्थितीत सूरजने हे असंच झाल्याचं मान्य केलं.

सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका घटनेत एका आरोपीला जामीन नामंजूर केला.

ही घटना राजस्थानमधील असून एनडीटीव्हीने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. या व्यक्तीवरही एका बाईस सर्पदंशाने मारल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपीबरोबर साप आणण्यासाठी कृष्णकुमार नावाचा हा आरोपी साप आणण्यासाठी गेला होता असा त्याच्यावर आरोप आहे.

हा खटला सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे होता. सुनावणीच्यावेळेस न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, "गारुड्यांकडून साप आणून त्याच्या दंशाद्वारे लोकांना मारण्याची नवी लाट आली आहे. राजस्थानमध्ये हे अगदी सामान्य होऊन बसलं आहे."

आरोपी कृष्णकुमारच्या बचावासाठी बोलताना अॅडव्होकेट आदित्य चौधरी म्हणाले, "आरोपीविरोधात कोणताही थेट पुरावा नाही."

चौधरी म्हणाले, "माझ्या अशिलास आपला मित्र साप किंवा विष का विकत घेत आहे हे माहिती नव्हतं, वैद्यकीय उपचारासाठी ते घेत असल्याचं त्याला सांगण्यात आलं होतं. तो मृत स्त्रीच्या घरी सापाबरोबर गेलाही नव्हता. तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून त्याच्या भविष्याकडे पाहाता त्याला सोडण्यात यावं."

सुनेनेच मारलं सासूला

राजस्थानच्या झुनझुनु जिल्ह्यात 2019 साली सुबोध देवी नावाच्या एका बाईस तिच्या अल्पना या सुनेने कथितरीत्या सर्पदंश घडवून मारल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती.

अल्पनाचं जयपूरमधील मनिष नावाच्या एका व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध होते असं सांगण्यात येतं. अल्पनाचे पती (सचिन) व दीर सैन्यात असल्यामुळे या दोघीच घरात राहात असतं. तसेच तिचे सासरेही कामानिमित्त बाहेर असत.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार सचिन आणि अल्पना यांचा विवाह 12 डिसेंबर 2018 रोजी झाला होता. पती कर्तव्य बजावण्यासाठी गेल्यावर तिचे मनिषशी विवाहबाह्य प्रकरण सुरू होई. ते नेहमी बोलत बसत. ती सतत फोनला चिकटून राहिल्यानंतर सासू सुबोध देवी यांना प्रकरणाची माहिती मिळाली.

सासूबाईंचा विरोध सुरू झाल्यावर आपल्यावर संशयच येणार नाही अशा पद्धतीने सुबोध यांना मारण्यासाठी अल्पना आणि मनिष यांनी विचार सुरू केला.

2 जून 2019 रोजी सुबोध देवी यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करुन सुबोध देवी यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या तपासात 2 जून रोजी अल्पना आणि मनिष यांच्यात 124 कॉल्स आणि अल्पना आणि कृष्णकुमार यांच्यात 19 कॉल्स झाल्याचं समजलं. त्यानंतर या तिघांनाही अटक करण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)