You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र बंद : 'आमच्या मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने मरतोय त्याचं काय?'
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज (11 ऑक्टोबर) 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. महाविकास आघाडीच्या या बंदविषयी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
अनेकांनी महाविकास आघाडीला मराठवाड्यातील अतिवृष्टीची आठवण करून दिली आहे, तर काहींनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिली आहे.
बालाजी सोनवणे यांनी फेसबुकवर लिहिलंय, "युपीच्या शेतकऱ्यांची चिंता तिघाडी सरकारला आहे. मग आमच्या मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने मरतोय त्याचं काय? काय मदत केली यांनी? शेवटी सगळे राजकारणी एकच. किती नेत्याच्या कारखाने मिल्स कंपन्या बंद आहेत?"
रंजना वालवलकर यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला आहे.
त्यांनी लिहिलंय, "महाराष्ट्र सरकारच बंद पुकारते कारण त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूपच चांगली नुकसान भरपाई दिली असे त्यांना वाटते, आधी महाराष्ट्रतील समस्या सोडवा, नंतर दुसऱ्या राज्यातील."
जगदीश या ट्विटर यूझरनं ट्विट केलंय की, "महाराष्ट्र बंद ठेवायला या राजकारण्यांना काय जातं? आधीच कोरोनामुळे जनतेची परिस्थिती बिकट आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी कशासाठी जनतेला धारेवर धरत आहेत? खरंच शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज व लाईट बिल सरसकट माफ करावे."
किशोर पवार यांनी ट्विट केलंय की, "महाराष्ट्र थांबणार नाही असं tagline लावणारं सरकार ,आज महाराष्ट्र बंद म्हणून घोषणा देते आणि इथे या सरकारला मायबाप समजणारे शेतकऱ्यांना ओलीस ठेवण्यात येत आहे, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? विचारतोय महाराष्ट्र, कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा?"
महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱ्याही अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर आहेत.
स्नेहा पाटील ट्वीट केलंय की, "ज्या शेतकऱ्यांनी आपला देश उभा केला आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंद आयोजित करण्यात आला आहे. भारताचा आत्मा शाबूत ठेवण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे."
अतुल यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा जाहीर करताना एक अट ठेवली आहे.
त्यांन ट्वीट केलंय की, "सरकारी मालमत्तेचे नुकसान करणार नसाल तर महाराष्ट्र बंदला माझा पाठिंबा आहे."
आनंद दास यांनी ट्वीट करत म्हटलंय, "महाराष्ट्र बंदला माझा आणि माझ्या परिवाराचा पूर्ण पाठिंबा आहे. बंदला समर्थन तेच करणार नाहीत जे शेतकऱ्यांना चिरडल्याचं समर्थन करतात. देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र चा आवाज बुलंद करा."
अजित घोलप यांनी शेतातल्या कामाचा फोटो टाकत फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, "असेल महाराष्ट्र बंद, आम्हाला थांबून कसं चालेल?"
दरम्यान, महाराष्ट्र बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
काही ठिकाणी बसेसची तोडफोड करण्यात आहे. काही ठिकाणी रस्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी लखीमपूर खिरी घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं हा एक दिवसीय बंद पुकारला आहे.
9 ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन 'महाराष्ट्र बंद' हाक दिली.
"आपल्या अन्नदात्यासाठी हा बंद आहे. व्यापाऱ्यांनी आणि सामान्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा द्यावा. तसेच बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत," अशी माहिती यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही या बंदच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)