महाराष्ट्र बंद: राज्यभरात संमिश्र प्रतिसाद, कुठे काय घडलं?

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

कोल्हापूरमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी मोठी दुकानं बंद ठेवत या बंदला समर्थन दिले. तर किरकोळ दुकानं तसंच छोटे व्यापार मात्र सुरू असल्याचे पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवा सुविधेसह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू होती.

कोकणामध्येही महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांनी काही ठिकाणी पाठिंबा दिला आहे, तर काही ठिकाणी लखीमपूर घटनेचा निषेध करून दुकाने सुरू ठेवली. कोकणामध्ये सार्वजनिक वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.

नागपुरात महाविकास आघाडी सरकारमधील पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं हा बंद यशस्वी व्हावा यासाठी बर्डी सारख्या बाजारपेठेच्या परिसरात निदर्शने केली.

अमरावती जिल्ह्यातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अपवाद वगळता व्यापारी संघटनेनी बंदला पाठिंबा जाहीर केला. व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा देत दुपारी एक नंतर मुख्य बाजारपेठा बंद केल्या. मात्र सणासुदीच्या काळात फुलांचा व्यवसाय करणारे तसेच किरकोळ दुकानदारांनी त्यांचा व्यवसाय सुरूच ठेवला.

महाराष्ट्र बंदचा बस सेवांवर फारसा परिणाम पडला नाही. मुख्य आगारातून बस सेवा सुरळीत होती. मात्र बंदचा हाकेमुळं आगारात नागरिकांची गर्दी कमी होती.

मुंबईत शिवसैनिकांकडून रास्ता रोको

लखीमपूर खिरी इथल्या घटनेच्या निषेधार्थ बंद मध्ये मुंबईत शिवसैनिकांनी रास्ता रोको करण्यात आला. शिवसेनेच्या नेत्यांकडून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. आपात्कालीन वाहतूक अडवली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला.

बीबीसी प्रतिनिधी मयांक भागवत यांनी मुंबईतील परिस्थितीचा घेतलेला आढावा.

बेस्ट बसेसची तोडफोड

काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान मुंबईत बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली.

धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या.

नाशकात बाजार समिती बंद

नाशिकमधील मुख्य 16 बाजार समित्यांनी बंद चे आवाहन करत शेतकऱ्यांना समितीत माल आणू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोळाही बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद होते.

मात्र मालेगावमध्ये सकाळी याबद्दल अनभिज्ञ असलेल्या शेतकऱ्यांनी माल आणल्याने किरकोळ प्रमाणात भाजीपाला व फळ मार्केट सुरू करण्यात आले.

कागल इथे रास्तारोको

महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद मध्ये सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसने कागल इथं महामार्ग रोकोचा आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. कोल्हापूर शहरात शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

"लखीमपूर खिरीत जे घडलं, ती देशाच्या संविधानाची हत्या आहे, कायद्याची पायमल्ली आहे. अन्नदाता शेतकऱ्याला संपवण्यासाठीचं षड्यंत्र आहे. केंद्र सरकारची अमानुषता इतकी आहे की, राज्या-राज्यात ते लखीमपूर खिरीसारख्या घटना घडवतील. अशा घटनांविरोधात आम्ही आहोत," हे सांगण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

"काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पूर्ण ताकदीने या बंदमध्ये उतरू. किंबहुना, लोक स्वयंस्फूर्तीनं यात उतरतील," असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसंच, हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल, अशी खात्रीही संजय राऊतांनी बोलून दाखवली.

विरोधकांची सरकारवर सडकून टीका

विरोधी पक्षानं महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदवर जोरदार टीका केली आहे.

विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, "आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. आज बंद करणारी तीच मंडळी ज्यांनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. लखीमपूर घटनेबद्दल तिथलं सरकार दोषींवर कारवाई करत आहेत.

"मात्र राज्य सरकार त्या घटनेवर राजकीय पोळी भाजता येईल का या संकुचित विचाराने बंद करत आहे. प्रशासनची मदत घेऊन, वापर करून, दमदाटी करुन लोकांना बंद ठेवायला प्रवृत्त केले जात आहे. आत्ता कुठे दुकाने सुरू होत होती, छोट्या व्यावसायिकांची गाडी रुळावर यायला सुरुवात झाली होती. मात्र पुन्हा या सरकारने दुकाने बंद केली आहे".

तर "आपल्या अन्नदात्यासाठी हा बंद आहे. व्यापाऱ्यांनी आणि सामान्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा द्यावा. तसेच बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत," अशी माहिती यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही या बंदच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं.

काय सुरू, काय बंद?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी 'महाराष्ट्र बंद' दरम्यान कुठल्या गोष्टी सुरू राहतील, याची माहिती दिली.

नवाब मलिक यांच्या माहितीनुसार, हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर, रुग्णवाहिका, दूध पुरवठा इत्यादी गोष्टींसह अत्यावश्यक आणि जीवनावश्यक गोष्टी सुरूच राहीतल.

यावेळी मलिक यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, या अत्यावश्यक सेवांना कुठलीच बाधा आणायची नाही.

दुकानदारांनी या 'महाराष्ट्र बंद'ला स्वत:हून पाठिंबा दिला पाहिजे, असं आवाहनही नवाब मलिक यांनी केलं.

तसंच, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते लोकांना हात जोडून विनंती करतील की, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपली दुकानं, कामं बंद ठेवावीत, असं मलिक म्हणाले.

महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र बंदसोबत राहतील, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)