लखीमपूर खिरी: भाजप मंत्रीपुत्र आशिष मिश्राला रात्री अटक कशी झाली?

लखीमपूर खिरी मधल्या तिकोनिया इथे गाडीने शेतकऱ्यांना उडवल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला लखीमपूर पोलिसांनी अटक केली आहे.
12 तासांच्या चौकशीनंतर, शनिवारी रात्री लखीमपूर पोलिसांनी आशिषला अटक केली.
याप्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचे प्रमुख डीआयजी इन्चार्ज उपेंद्र अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं की, आशिष मिश्रा चौकशीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला टाळाटाळ करत होते.
चौकशीदरम्यान सहकार्य करत नव्हते. यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.
आशिष मिश्रा यांना मॅजिस्ट्रेटपुढे पोलीस कोठडीसाठी हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल.
गाडीने आंदोलक शेतकऱ्यांना उडवल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या एफआयआरप्रमाणे आशिष मुख्य आरोपी आहेत. आशिषवर हत्या, हत्येचा प्रयत्न यासह अन्य कठोर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
दुसऱ्या नोटिशीनंतर चौकशीसाठी हजर
लखीमपूर खिरीप्रकरणी तपास करणाऱ्या विशेष पथकाने याआधीही आशिष यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यासाठी नोटीसही बजावली होती. मात्र ते गैरहजर राहिले. दुसऱ्या नोटीशीनंतर शनिवारी ते पोलिसांसमोर हजर झाले.
शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते पोलीस स्थानकात दाखल झाले. जवळपास 12 तास त्यांची चौकशी चालली.
लखीमपूर खिरीच्या क्राइम ब्रँचच्या कार्यालयासमोर कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. यादरम्यान आशिष मिश्रा वकील अवधेश सिंह, लखीमपूरचे भाजप आमदार योगेश वर्मा तिथे पोहोचले. थोड्या वेळात योगेश वर्मा तिथून निघून गेले.

शनिवारी रात्री आशिष यांना न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आलं. रात्री एक वाजता त्यांना लखीमपूर खिरी तुरुंगात पाठवण्यात आलं.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आशिष यांचे वकील अवधेश सिंह यांनी सांगितलं की, "पोलिसांनी मॅजिस्ट्रेट यांच्याकडे तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. त्याला विरोध करण्यात आला. सोमवारी यावर स्थानिक न्यालयात निर्णय होईल."
सोमवार सकाळपर्यंत आशिष न्यायालयीन कोठडीत असतील. सोमवारी हे स्पष्ट होईल की त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात येणार की नाही.
वडील अजय मिश्रा यांच्याकडून पाठराखण
आशिष मिश्रा दुसऱ्या नोटिशीनंतर चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर झाले. पहिल्या नोटिशीवेळी त्यांचे वडील आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी सांगितलं की आशिष यांची तब्येत ठीक नाहीये. शाहपूर कोठी इथल्या घरी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
गाडी अंगावर घालण्याचा प्रकार घडला त्यावेळी आशिष घटनास्थळी नव्हते या वक्तव्यावर अजय मिश्रा टेनी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या अंगावर ज्या गाड्या गेल्या त्या गाडीतही आशिष नव्हते असं अजय यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "बनवीरपूर इथे दरवर्षी कुस्तीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. याचं आयोजन आमच्या कुटुंबातर्फे केलं जातं. आशिष याच्या आयोजनामध्ये होता."
बनवीरपूर इथल्या अनेकांनी दिवसभर आशिष यांना गावात पाहिलं आहे. आशिष तिथे होते अशी साक्ष देण्यासाठी ते तयार आहेत.
"माझा मुलगा घटनास्थळी असता तर तोही गेला असता," असं अजय मिश्रा टेनी यांनी सांगितलं.
चौकशीत काय घडलं?
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आली कारण हिंसेच्या वेळी ते नक्की कुठे होते याचं उत्तर त्यांना देता आलं नाही.
आशिष मिश्रा यांनी सांगितलं की, "घटनास्थळापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर होते. दुसरीकडे लखीमपूर इथे आयोजित आंदोलनाठिकाणी तैनात पोलिसांनी सांगितलं की दुपारी दोन ते चार या कालावधीत आशिष गायब होते."
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की आशिष यांना त्यांचं मोबाईल लोकेशन आणि घटनास्थळी झालेल्या घटनेतली त्यांची भूमिका यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images
पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात असं म्हटलं आहे की तपास पथकाने चौकशीसाठी 9 जणांची टीम तयार केली आहे. आशिष यांना 40 प्रश्न विचारण्यात आले. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आली त्यावेळी ते कुठे होते यासंदर्भात आशिष आपल्या ठावठिकाण्याविषयी योग्य उत्तर देऊ शकले नाहीत.
उत्तर प्रदेश पोलीसचे महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, "सहा आरोपींची ओळख पटली आहे. यापैकी तिघांचा हिंसेदरम्यान मृत्यू झाला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक आशिष मिश्रा आहेत तर एकाची ओळख अद्यापही पटलेली नाही".
शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. संयुक्त किसान मोर्चा संघटनेने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या अटकेची मागणी केली आहे.
द्वेषभावना पसरवणे, हत्येचा कट रचणे या कलमांअंतर्गत अजय मिश्रा यांना अटक व्हायला हवी, त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा अशा संघटनेच्या मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर देशभरात आंदोलन केलं जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

फोटो स्रोत, FB/AJAY MISHR TENI
शनिवारी संयुक्त किसान मोर्चा संघटनेने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. शेतकऱ्यांच्या कथित मारहाणीत ज्या चार लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांची आणि आशिष मिश्रांनी केलेल्या कृत्याची तुलना होऊ शकत नाही असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांचं म्हणणं आहे.
3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खिरी इथल्या घटनेत गाडीने उडवल्यामुळे चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यापैकी एक गाडी आशिष मिश्रा यांची असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी चार लोकांना केलेल्या कथित मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला होता.
टिकैत पत्रकार परिषदेत म्हणाले, "तिथे जे घडलं त्याला प्रत्युत्तर म्हणून ही घटना घडली. आम्ही त्यांना आरोपी मानत नाही. आम्ही याला हत्याही मानत नाही. एखादा अपघात होतो तेव्हा सर्वसामान्य माणसं रस्त्यावर उतरून वाद घालू लागतात."
"एका पत्रकाराचा या घटनेत मृत्यू झाला. ही हत्या आहे असं सांगण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांवर दबाव टाकण्यात आला. त्याच्या शरीरावर टायरच्या खुणा होत्या. सत्य हे आहे की आरोपींना लोकांना तीन गाड्यांच्या माध्यमातून मारायचं होतं," टिकैत सांगतात.

फोटो स्रोत, TWEET/@RAKESHTIKAITBKU
"जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ 12 ऑक्टोबर रोजी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरात शहीद किसान दिवस म्हणून हा दिवस पाळण्यात येईल," असंही ते म्हणाले.
"अजय मिश्रा यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तसंच त्यांच्या अटकेची मागणी पूर्ण झाली नाही तर शहीद शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन लखीमपूर खिरी इथून राज्यभरात शहीद किसान यात्रा काढण्यात येईल.
"जिल्ह्यातल्या प्रत्येक पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी ही यात्रा जाईल. 15 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांविरोधातील भाजपचे पुतळे जाळले जातील. 18 ऑक्टोबरला देशभरात रेल रोको आंदोलन केलं जाईल. यानंतर आठ दिवसात लखनौ इथे महापंचायत आयोजित करण्यात येईल," असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








