आशिष मिश्रा: लखीमपूर हिंसाचार प्रकरणात भाजप मंत्र्याच्या मुलाला 3 दिवसांची पोलिस रिमांड

आशिष मिश्रा

फोटो स्रोत, Getty Images

लखीमपूर हिंसा प्रकरणी केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रांना तीन दिवसांची पोलिस रिमांड देण्यात आली आहे.

सरकारी वकील एसपी यादव यांनी सांगितलं की, 12 ऑक्टोबर सकाळी दहा वाजल्यापासून 15 ऑक्टोबर सकाळी दहा वाजेपर्यंत आरोपी आशिष मिश्रा यांना पोलिस रिमांडवर पाठवण्यात येत आहे.

आशिष मिश्रांना काही अटींसह ही रिमांड देण्यात आलीये. त्यांना सोबत आपले वकील घेण्याची परवानगी आहे. जाण्या-येण्याच्या वेळेस आशिष मिश्रा यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ही पोलिस प्रशासनाची असेल.

लखीमपूर खिरीच्या तिकोनिया येथील हिंसाचार प्रकरणात गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना लखीमपूर पोलिसांनी अटक केली होती.

लखीमपूर या ठिकाणी शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्यात आले होते. या कारमध्ये गृहराज्य अजय मिश्रांचे पुत्र आशिष मिश्रा होते असं शेतकऱ्यांनी सांगितलं होतं.

शनिवारी जवळपास 12 तासांहून अधिक वेळ चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आशिष मिश्रांना अटक केली आहे.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अजय मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की आशिष मिश्रा हे चौकशीला सहकार्य करत नव्हते तसेच उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आता मॅजिस्ट्रेट समोर सादर केले जाणार आहे. आशिष मिश्रा हे लखीमपूर खिरी प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांच्यावर हत्या, सदोष मनुष्यवध आणि हत्येचा कट रचणे या सारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे.

अटकेनंतर आशिष मिश्रांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास आशिष मिश्रा हे पोलिसांसमोर आपले बाजू मांडण्यासाठी हजर झाले होते.

लखीमपूर खिरीत नेमकं काय घडलं?

3 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आधी ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. इथल्या वंदन गार्डनमध्ये त्यांना सरकारी योजनांच्या कोनशिलांचं अनावरण करायचं होतं.

या कार्यक्रमासाठी आधी ते हेलिकॉप्टरने येणार होते पण शनिवारी सकाळी प्रोटोकॉल बदलला आणि ते रस्त्यामार्गे लखीमपुरात पोहोचले.

संयुक्त किसान मोर्च्याने उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांच्या ताफ्याला घेराव घालण्याची हाक दिली होती. यात लखीमपूर आणि उत्तर प्रदेशातल्या इतर जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.

साधारण दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान केशव प्रसाद मौर्य आणि अजय मिश्र लखीमपूर जिल्हा मुख्यालयातून कोनशिला अनावरणाचा कार्यक्रम संपवून नेपाळ बॉर्डरवरच्या बनवीरपूर गावासाठी निघाले. हे गाव तिकुनियापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे.

लखीमपुर

फोटो स्रोत, AnantZanane

तिकुनियातल्या एका प्राथमिक शाळेत 2 ऑक्टोबरला झालेल्या स्पर्धांच्या विजेत्यांचा पुरस्कार समारंभ होता. अजय मिश्र केंद्रीय मंत्री झाल्यामुळे यंदाचा कार्यक्रम भव्यस्तरावर आयोजित केला होता. यासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार होते.

पण स्थानिक शेतकऱ्यांनी अजय मिश्र यांच्याविरोधात आंदोलन करण्याचं ठरवून ठेवलं होतं.

काही दिवसांपूर्वी लखीमपूरच्या संपूर्णानगरमधल्या एका शेतकरी संमेलनात मंत्री अजय मिश्रांनी शेतकऱ्यांना मंचावरून धमकीसद्श्य इशारा दिला होता.

त्यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना उद्देशून म्हटलं होतं की, "मी फक्त मंत्री नाहीये किंवा आमदार-खासदार नाहीये. जे मला आमदार होण्याच्या आधीपासून ओळखतात त्यांना माहिती असेल की मी कोणत्याही आव्हानपासून पळ काढत नाही. ज्या दिवशी मी एखादं आव्हान स्वीकारलं आणि त्या दिशेने काम करायला सुरुवात केली त्यादिवशी पलिया नाही लखीमपूर पण सोडून पळून जावं लागेल लक्षात ठेवा."

अशा प्रकारच्या विधानांमुळे शेतकऱ्यांच्या मनात आधीच राग होता आणि त्यांनी 29 सप्टेंबरला लखीमपूरच्या खैरटिया गावात एका प्रतिज्ञा समारंभात घोषणा केली होती की ते शांततामय पद्धतीने आपला विरोध दर्शवतील.

तिकुनिया गावातला रविवारचा घटनाक्रम

रविवार, 3 ऑक्टोबरला सकाळी शेकडो शेतकरी तिकुनियाच्या महाराजा अग्रसेन इंटर कॉलेजात पोहोचले आणि शाळेत बनवलेल्या हेलिपॅडला त्यांनी घेराव घातला. ते लोक 'भारत माता की जय' अशा घोषणा देत होते आणि काळे झेंडे दाखवत होते.

लखीमपूर

फोटो स्रोत, AnantZanane

मंत्री रस्त्याने तिकुनियाला पोहोचत आहेत अशी बातमी पसरल्यानंतर शेतकऱ्यांनी बनवीरपूरच्या सीमेवर रास्ता रोको केला.

दुपारी दीड दोनच्या दरम्यान तीन गाड्यांचा एका छोटा ताफा तिकुनियाला पोहचला. अजय मिश्र आणि त्यांचे पुत्र आशिष मिश्र यांच्या सांगण्यानुसार हा ताफा उपमुख्यमंत्रींच्या मोठ्या ताफ्याला बनवीरपूर गावात आणण्यासाठी जवळच्याच एका रेल्वे क्रॉसिंगच्या दिशेने रवाना झाला होता.

मग या तिन्ही गाड्या तिकुनियात पोहोचल्या जिथे शेतकरी उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची वाट पाहात होते. त्यांना चिरडायला सुरुवात केली. यात चार शेतकऱ्यांचा चिरडून मृत्यू झाला आहे तर डझनभर लोक जखमी झाले आहेत.

अनेक व्हायरल व्हीडिओंमध्ये एक-दोघा शेतकऱ्यांचे मृतदेह रस्त्याच्या बाजूला पडलेले दिसत आहेत. शेतकरी नेत्यांचा आरोप आहे की मंत्र्यांचे पुत्र आशिष मिश्राही त्यावेळी गाडीत बसलेले होते आणि त्यांनी एका शेतकऱ्याला गोळीही मारली.

संयुक्त मोर्चाकडून या आंदोलनात सहभागी झालेले आणि घटनेचे साक्षीदार पिंडर सिंह सिद्धू यांनी सांगितलं की, "सगळं नीट चालू होतं. जवळपास अडीच वाजता अजय मिश्राजी यांचा मुलगा काही गुंडांना घेऊन तिथे आला आणि जे शेतकरी आपला झेंडा घेऊन फिरत होते त्यांच्या अंगावर गाडी घातली. त्यांच्या मुलाने एक गोळीही चालवली."

"ही फारच वाईट घटना होती. आमचे चार शेतकरी भाऊ शहीद झालेत. ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मतं दिली त्यांच्या आंदोलनात गाडी घालणं, त्यांना चिरडणं ही कुठली संस्कृती? हा सत्तेचा माज आहे. मंत्री अजय मिश्रांनी जे आव्हान दिलंय त्याचं उत्तर लोक आता आपल्या घराबाहेर पडून देतील."

लखीमपूर

फोटो स्रोत, AnantZanane

पण अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना हे आरोप मान्य नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की आपण निरपराध आहोत हे सिद्ध करण्यासाठी ते पुरावे सादर करतील.

पण व्हायरल झालेल्या व्हीडिओत शेतकऱ्यांनी केलेला हिंसाचारही दिसतोय. व्हीडिओत लोक एका जीपवर लाठ्यांनी हल्ला करत आहेत आणि गाडीबाहेर पडलेल्या दोन लोकांनाही लाठ्यांनी मारत आहेत.

हा जमाव गाडी उलथवून टाकतो आणि गाडीला रस्त्यावरून खाली ढकलतो. यानंतर फोटो आणि व्हीडिओत जे दिसलं त्यात रस्त्याच्या बाजूला पडलेले दोन मृतदेह दिसत आहेत आणि त्याच्या आसपास शेतकरी उभे आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)