लखीमपूर खिरी: अजय मिश्रा कोण आहेत, आशिष मिश्रा वादात का आहे?

फोटो स्रोत, FB/AJAY MISHR TENI
- Author, राघवेंद्र राव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना लखीमपूर हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करता यावी यासाठी अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय.
आपल्या मुलावर करण्यात आलेले सगळे आरोप निराधार आहे असं अजय मिश्रांनी म्हटलंय पण भाजप सरकारवर जी टीका होतेय त्याच्या केंद्रस्थानी तेच आहेत.
या संपूर्ण प्रकारची निष्पक्ष चौकशी होईल की नाही याबदद्ल विरोधक संशय व्यक्त करत आहेत. याचं एक कारण म्हणजे अजय मिश्रा गृह राज्यमंत्री आहेत आणि ते चौकशीवर प्रभाव टाकू शकतात हे तर आहेच पण त्याबरोबरीने या भागातली त्यांची प्रतिमा ताकदवान नेता अशी आहे त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचाही तपासावर परिणाम होऊ शकतो.
मोदी मंत्रिमंडळात मिळाली जागा
लखीमपूर हिंसाचाराच्या काही दिवस आधी संपूर्णानगर भागात झालेल्या एका बैठकीत शेतकरी आंदोलनाबद्दल अजय मिश्रा यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या.
या सभेच्या एका व्हीडिओत मिश्रा म्हणताना दिसतात, "मी अशा लोकांना सांगू इच्छितो की सुधरा नाहीतर आमच्या समोर येऊन आमचा सामना करा. आम्ही दोन मिनिटात तुम्हाला सुधारू. मी फक्त मंत्री नाहीये, आमदार-खासदार नाहीये. मी आमदार-खासदार बनण्याआधी जे लोक मला ओळखत असतील त्यांना नक्कीच माहिती असेल की मी कोणत्याही आव्हानापासून पळ काढत नाही. ज्या दिवशी मी हे आव्हान स्वीकारलं तेव्हा फक्त पलिया नाही, लखीमपूरपण सोडावं लागेल हे लक्षात ठेवा."

फोटो स्रोत, Ani
याच वर्षी आठ जुलैला नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजय मिश्रा यांना जागा मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या होत्या.
उत्तर प्रदेशच्या राजकारणावर लक्ष ठेवणारे विश्लेषकही या गोष्टीने आश्चर्यचकित झालेले दिसले की अजय मिश्रा यांनी इतक्या कमी वेळात एवढी मोठी झेप कशी घेतली. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर फक्त नऊ वर्षांच्या कालवधीत देशाचा गृह राज्यमंत्री बनणं ही सोपी गोष्ट नाहीये.
विशेषतः मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मागस जातींच्या नेत्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून केला गेलाय असं म्हटलं जात होतं तेव्हा अजय मिश्रांना मंत्रीपद मिळणं आश्चर्याची बाब होती कारण मिश्रा ब्राह्मण आहेत.
आधीही त्यांना आमदार ते खासदार हा प्रवास करायला फक्त दोन वर्षं लागली होती.
कोण आहेत अजय मिश्रा?
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यातल्या बनवीरपूर गावात जन्मलेल्या 61 वर्षीय अजय मिश्रा यांनी कानपूरच्या ख्राईस्ट चर्च कॉलेजमधून विज्ञान आणि कानपूरच्याच डीवी कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आहे.
अजय मिश्रा यांना त्यांच्या जवळचे लोक टेनी या नावाने संबोधतात. खेळात, विशेषतः क्रिकेट, पॉवरलिफ्टिंग आणि कुस्तीत त्यांना फारच रस आहे. त्यांनी आपल्या विद्यार्थीदशेत विद्यापीठ आणि जिल्हा पातळीवर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. कालांतराने मिश्रा या खेळांचे सामने आयोजित करायला लागले.
सन 2012 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अजय मिश्रा निघासनची जागा जिंकून पहिल्यांदा आमदार बनले. या निवडणुकीत त्यांनी 31 हजाराहून जास्त मतांनी विजय मिळवला. एकूण मतांच्या जवळपास 36 टक्के मतं मिळाली.

तज्ज्ञांच्या मते आमदार बनल्यानंतर अजय मिश्रांची पत तर वाढलीच पण स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की ते तळागाळातल्या लोकांमध्ये फार सक्रिय होते आणि हेच कारण असेल कदाचित की 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये खिरीहून भाजपची खासदारकीची उमेदवारी दिली.
2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अजय मिश्रांनी आपलं मताधिक्य जवळपास दुप्पट करून दोन नंबरच्या उमेदवाराला एक लाख दहा हजार मतांनी हरवलं. अशाप्रकरे ते दुसऱ्यांदा खासदार बनले. या दणदणीत विजयाने हे तर स्पष्ट झालं होतं ती मिश्रांची राजकीय ताकद अनेक पटींनी वाढलीये.
2019 ते 2021 या काळात ते अनेक संसदीय समित्यांचे सदस्य होते पण नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांची गृह राज्य मंत्री पदावर नियुक्ती होणं ही त्यांची सगळ्यांत मोठी कामगिरी ठरली.
जातीचं राजकारण की आणखी काही?
लखनौचे वरिष्ठ पत्रकार शरत प्रधान म्हणतात की मिश्रा यांना अचानक केंद्रीय मंत्रिपद मिळणं ही चकित करणारं होतं.
ते म्हणतात, "मग लक्षात आलं की ब्राह्मण असल्यामुळे त्यांना मंत्री बनवलं गेलं. ब्राह्मणांची मतं आपल्या हातातून निसटतील याची भाजपला भीती होती. उत्तर प्रदेशात ब्राह्मण आणि ठाकूर समुदायात कायम तेढ असते. योगी आदित्यनाथ यांची कार्यशैली ठाकुरांना पुरक अशी आहे त्यामुळे ब्राह्मण भाजपवर नाराज होते आणि म्हणून त्यांना खुश करण्यासाठी अजय मिश्रा यांना मंत्रीपद दिलं."
वरिष्ठ पत्रकार वीरेंद्र नाथ भट्ट यांचंही हेच मत आहे. ते म्हणतात, "ब्राह्मण कोट्यातून कोणाला तरी आणायचं होतं आणि त्यांच्या मतदार संघ लखीमपूर, सीतापूर, शाहजहांपूर हा भाग कव्हर करतो. इथे ब्राह्मणांची संख्या जास्त आहे."

फोटो स्रोत, Ani
भट्ट यांच्यानुसार मिश्रा कधीही इतके मोठे नेते नव्हते की पत्रकार त्यांच्याविषयी तथ्यं हुडकून काढतील, "ते समीकरणात बसले आणि मंत्री झाले. उत्तर प्रदेशातून जाणाऱ्या मंत्र्यांमध्ये एक ब्राह्मण हवा होता म्हणून यांच्या नावावर मंत्रीपद गेलं."
लोकसभेच्या वेबसाईटवर अजय मिश्रा यांच्या प्रोफाईलमध्ये ते 'लहानपणापासूनच अंतर्मुख आहेत' असं म्हटलं गेलंय. या प्रोफाईलनुसार ते 'सामाजिक असमानतेमुळे आणि मानवाधिकारापासून वंचित असणाऱ्या लोकांसाठी' राजकारणात आले. त्यांनी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस म्हणून राजकीय कारकिर्द सुरू केली. आणि 'अल्पावधीतच खासदार झाले.'
2019 च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार मिश्रा यांच्याविरोधात 2000 साली खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि हेही लिहिलं आहे की कोर्टाने त्यांना 2004 साली निर्दोष मुक्त केलं.
या शपथपत्रात असंही म्हटलंय की त्यांना निर्दोष मुक्त करण्याच्या विरोधात सरकार आणि तक्रारदार यांनी हायकोर्टात अपील केलंय आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
शरत प्रधान म्हणतात की अजय मिश्रांनी स्थानिक पातळीवर खूप काम केलंय आणि लोकांमध्ये त्यांचा चांगला जम बसलाय.
ते म्हणतात, "तिथल्या लोकांकडून तुम्ही मिश्रांबद्दल चांगलंच ऐकाल. पण गेल्या काही दिवसांपासून ते चिथवणीखोर भाषणं करत होते. म्हणायचे की मी बघून घेईन, दोन मिनिटात सरळ करीन. गृह राज्यमंत्री बनल्यानंतर त्यांना वाटत असेल की ते काहीही करू शकतात."
वीरेंद्र नाथ भट्ट म्हणतात की अजय मिश्रा, "धाकदपटशाच्या बळावर चालणाऱ्या राजकारणावर विश्वास ठेवतात."
ते म्हणतात, "अजय मिश्रा उर्फ टेनी आपलं राजकारण डेयर डेव्हिल पद्धतीने करतात. जर मिश्रा मंत्री नसते तर हा वाद झालाच नसता. त्यांना मंत्री बनवण्यामागे सरकार आणि भाजपचा हाही हेतू असेल की कोणीतरी शेतकरी आंदोलनावर सडकून टीका करावी कारण 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत."
भट्ट म्हणतात की तराई भागात राहाणारे शीख शेतकरी आंदोलनानंतर भाजपसाठी आव्हान उभं करत आहेत. कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लखीमपूरहून पैसा, धान्य आणि इतर सामान पाठवलं जात आहे.
त्यांच्यामते या गोष्टीला मात देण्यासाठी मिश्रांना मोठं केलं गेलं.
मग भाजप आता त्यांना मंत्रीपदावरून हटवेल का?
शरत प्रधान म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबरला लखनौला आले होते आणि त्यांनी या घटनेचा उल्लेखही केला नाही. जर इतकीही संवेदनशीलता दाखवता येत नसेल तर कशी अपेक्षा करणार की ते काही कारवाई करतील."
वीरेंद्र भट्ट यांच्या मते पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी अजय मिश्रांना पदावरून हटवलं जाईल अशी शक्यता सुतारामही नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








