मराठवाडा पाऊस : 650 मोसंबीची झाडं, 21 लाख रुपये उत्पन्नाचं स्वप्न आणि पावसानं केलेला घात

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

"भाऊ म्हणायचा नोकरी कर. पण, वडिलांनी कष्ट करून 6 एकरची जमीन 25 एकरवर नेली. म्हणून मग मी शेतीत उतरलो. पण आता नोकरीचं महत्त्व कळतंय. कितीही केलं तर नोकरी चांगलीच राहिली असती. दरमहिन्याला पगार खात्यात जमा झाला असता. शेतात फक्त शेतकऱ्याचं मरण आहे."

बीएपर्यंत शिक्षण झालेले 32 वर्षांचे तरूण शेतकरी श्रीनिवास थेटे यांचा कंठ दाटून आला होता.

शेतीपेक्षा नोकरीच बरी, असा पहिला विचार त्यांच्या मनात तेव्हा आला, जेव्हा त्यांना आपलं मोसंबीचं पीक पाण्यात बुडालेलं दिसलं.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या खुणा फक्त शेतकऱ्यांच्या शेतातच नाहीत, तर त्यांच्या काळजावर कोरल्या गेल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात पिकांची जी अवस्था मी गुरुवारी (30 सप्टेंबर) अनुभवली, तीच अवस्था जालना जिल्ह्यात शुक्रवारी (1 ऑक्टोबर) दिसून आली.

औरंगाबादहून जालन्याच्या घनसावंगी तालुक्याकडे निघालो तेव्हा पाणी साचलेली शेतं दिसत होती. सोयाबीनमध्ये पाणी, कापसात पाणी, असं सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं.

जिथं पाणी नव्हतं, तो शेतमाल एकतर सडला होता किंवा वाहून गेला होता.

अतिवृष्टीनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. जी पीकं पोटच्या पोरासारखी वाढवली, ती काढणीला आलेली असतानाच पावसामुळे शेतातच सडताना पाहून शेतकऱ्याचं मन विषण्ण होत आहे.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीनं मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मका, अद्रक, ऊस, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

यापैकी एक आहेत जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या दैठणा खुर्द गावचे शेतकरी श्रीनिवास थेटे.

तीन दिवसांपूर्वी थेटे यांच्या मोसंबीच्या बागेत छातीइतकं पाणी साचलं होतं.

पाण्यात असलेली 650 झाडांची ही बाग बघून त्यांचे हातपायच गळून गेले. सध्या चांगला भाव मिळत नसल्यानं दिवाळीत मोसंबी विकूया, असं त्यांनी ठरवलं. पण पावसानं मध्येच घात केला. पावसानं झालेलं मोसंबीचं नुकसान आता स्पष्टपणे दिसायला लागलंय.

मोसंबीच्या बागेतील फळ दाखवताना ते सांगत होते, "माझ्या बागेत आजपर्यंत एकही मोसंबी गळालेली नव्हती. कारण माझ्या 18 ते 20 फवारण्या झाल्या आहेत. माझा आजपर्यंतचा खर्च हा साडे तीन ते चार लाखांच्या घरात आहेत. मला गेल्यावर्षी यात रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न झालं. आता मात्र पावसामुळे फळांना बुरशी लागली आहे आणि फळं खाली गळायला लागलेत."

गेल्या वर्षी 17 लाख रुपये इतकं उत्पन्न याच बागेनं त्यांना दिलं होतं. त्यांना 50 टन इतका माल झाला होता. यंदा 21 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळवण्याचं त्यांचं टार्गेट होतं. त्यासाठीचं ते जिद्दीनं शेती करत होते.

मोसंबीच्या या बागेसाठी त्यांनी आतापर्यंत साडेतीन लाख रुपये खर्च केले आहेत.

ते सांगतात, "सात हजार रुपये प्रत्येक खुरपणीला मला लागतेत. याच्यात 4 खुरपणी झाल्यात. माझ्या प्रत्येक फवारणीला 5 हजार ते 10 हजार रुपये इतका 5 एकरसाठी औषधाचा खर्च येतोय. मजूर, डिझेल, ठिंबक सिंचन याचाही खर्च आहेच. माझ्या दरवर्षी ठिबकच्या दोन लाईन होतात. मी यंदा तीन लाईन टाकल्या, काहून झाडाला सगळीकडून पाणी मिळावं म्हणून. असा माझा सगळा खर्च साडेतीन लाखाच्या घरात आहे."

थेटे यांच्या मोसंबीच्या बागेत फिरताना झाडाच्या खोडाशी काडी-कचरा गुंतलेला दिसतो. काडी-कचराच नाही, तर दुसऱ्याच्या शेतातील खांबही त्यांच्या शेतात येऊन पडले आहेत.

कपाशी, सोयाबीन या पिकांच्या तुलनेत आपलं लाँग टर्म नुकसान झाल्याचं ते सांगतात.

"कपाशीत पाणी गेलं तुम्हाला ताबडतोब नुकसान दिसणार. पण ही जमीन खरडली आज रोजी. माझी जमीन 4 ते 5 बोटं इतकी खरडली गेली. सगळ्या झाडाच्या मूळ्या उघड्या पडल्यात. कमकुवत झाडं झालीत, याला ताळ्यावर येण्यासाठी किती वर्षं लागतील सांगताच येत नाही."

अतिवृष्टीनं थेटे यांच्या शेतमालाचंच नाही, तर शेततळ्याचंही नुकसान केलंय. थेटे यांच्या शेतापासून वाहणाऱ्या नदीतील पाण्याचा वेग इतका होता की तिनं पात्रं सोडलं आणि ती थेट शेततळ्यात घुसली.

ते सांगतात, "मोसंबीचा बाग जगवण्यासाठी मी अक्षरश: घरच्यांचे सोने-नाणे दुकानात ठेवले. मी 4 लाख रुपये बँकेचं कर्ज घेतलं. 2018ला शेततळं बांधलं. आणि दुष्काळात याला घरच्या नळाच्या पाणीसकट पाणी आणून टाकलं. पाणी साठवण्यासाठी शेततळं केलं, तर पूर्ण माझ्या डोळ्यादेखत जमीनदोस्त झालं."

थेटे यांच्या नुकसानीचा तलाठ्यांनी पंचनामा तर केलाय, पण प्रत्यक्षातल्या मदतीचं काय, असा प्रश्न आता त्यांच्यापुढे आहे.

सरकारकडून असलेल्या अपेक्षेविषयी विचारल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून देतात.

"सरसकट 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा 2019चा व्हीडिओ पाहा. कोणत्याही अर्जाशिवाय शेतकऱ्यांना तत्काळ 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्या, असं ते सांगत होते. आणि आज तुम्ही त्या खुर्चीवर बसलात, तुम्हाला लालच लागली, तुम्ही विसरून गेले."

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार म्हणून आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असा दिलासा देत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

याच गावातील शेतकरी भिष्मा बुलबुले यांच्या उसाचं पावसामुळे नुकसान झालं आहे.

नुकसानीविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, "आमचा 6 एकर क्षेत्रावरील उस आडवा झाला आहे. उसाचं पाचट निघून गेलं, वाढे निघून गेले. ऊस सारा खाली पडलाय, तो तोडणं होतोय की नाही होतोय ते काही समजेना."

पिकांच्याही पलीकडे या पावसानं नुकसान केलं आहे. बुलबुले यांच्या शेतात जाणारा शेतरस्ता पावसात वाहून गेला आहे. आता ऊस काढल्यावर त्याला मार्केटला न्यायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

दरम्यान, "महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे कृषि अधिकाऱ्यांनी तातडीनं पंचनामे सुरू करावेत. एकही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, यापद्धतीनं कार्यवाही करावी. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदतीचं धोरण ठरवलं जाईल," असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)