Corona: भारतात कोव्हिड-19 ची तिसरी लाट येणार की नाही?

फोटो स्रोत, Getty Images
भारतात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली होती.
सप्टेंबर संपून ऑक्टोबर उजाडला. पण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या 195 दिवसांमध्ये सर्वात कमी नोंदवण्यात आलीय.
महाराष्ट्रातही मॉल, बाजारपेठ उघडण्यात आली आहेत. पण रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणावर वाढल्याचं दिसून येत नाहीय.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे साथरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, "महाराष्ट्रात व्हायरसमध्ये नवीन म्युटेशन आढळून आलेलं नाही. मोठं म्युटेशन झालं नाही. तर आपल्याकडे तिसरी लाट येण्याची शक्यता जवळपास नाही असं आपण म्हणू शकतो."
वाढणारं लसीकरण आणि कोरोनावाढीचा स्थिर झाल्यासारखा दिसणारा दर, यामुळे तिसरी लाट येणार नाही का? कधी येण्याची शक्यता आहे? ही लाट दुसऱ्या लाटेसारखीच मोठी असेल का? याबाबत तज्ञांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती काय?
राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्था म्हणजेच NDMA ने कोरोनाची लाट ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली होती.
देशात बुधवारी (29 सप्टेंबरला) 18,870 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आलीये.

फोटो स्रोत, Getty Images/NURPHOTO
फेब्रुवारी-मार्च महिन्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. तेव्हापासून पहिल्यांदाच देशात सर्वात कमी कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आलीय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार -
- भारतात कोरोना रुग्णांचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 97 दिवसात सर्वात कमी 1.74 टक्के आहे
- दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.56 टक्क्यांवर पोहोचलाय
- ऐकून कोरोनारुग्णांच्या तुलनेत अॅक्टिव्ह केसेस 1 टक्क्यापेक्षाही कमी आहेत
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, "देशातील 30 राज्यात कोरोना केसेस 10 हजारपेक्षा कमी आहेत."
महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती काय?
कोरोना संसर्गाची दुसरी लाट महाराष्ट्राच्या विदर्भातून सुरूवात झाली. अमरावतीत सापडलेला डेल्टा व्हेरियंट देशभरात पसरला आणि हाहा:कार उडाला होता.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.11 टक्के आहे. अहमदनगर, सिंधुदुर्ग, पालघर आणि पुण्यात हा दर तीन टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये गुरूवारी एकही कोरोनारुग्णाची नोंद झाली नाहीय, तर मुंबईसारख्या महानगरात कोरोनारुग्णांची संख्या 400 च्या आसपास स्थिरावलेली दिसून येतेय.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार?
देशात आणि राज्यात कोरोनारुग्णसंख्येचा दर स्थिर झाल्यासारखा दिसून येतोय.
तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचं भारतात एंडेमिक झालंय. एंडेमिक म्हणजे लाट किंवा उद्रेक संपला असं नाही. लोकांना विषाणूसोबत जगण्याची सवय होणं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथ यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल माहिती दिली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
त्या म्हणतात, "भारतातील प्रत्येक राज्याची वेगळी वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात कोरोनोविरोधी रोगप्रतिकार शक्ती वेगळ्या प्रमाणात असणार आहे. अशावेळी तिसऱ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही. पण त्याचं प्रमाण विविध राज्यांत आणि भागात वेगळं असेल."
कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेबद्दल जगभरातील तज्ज्ञांमध्ये मतमतांतरं आहेत.
चंदीगडच्या पोस्ट ग्रॅज्युएट इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एज्यूकेशन एंड रिसर्चचे (PGIMER) संचालक डॉ. जगत राम म्हणतात, "भारत सद्यस्थितीत कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरूवातीच्या टप्प्यावर आहे."

फोटो स्रोत, Getty Images
एएनआयशी बोलताना ते सांगतात, "PGIMER मध्ये 2700 मुलांची कोव्हिड अॅन्टीबॉडी टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 71 टक्के मुलांमध्ये अॅन्टीबॉडी आढळून आल्यात." याचा अर्थ तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्याप्रमाणावर त्रास होणार नाही.
पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी, भारतात तिसरी लाट अटळ असल्याचं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं.
तज्ज्ञांच्या मते कोरोनासंसर्गाची तिसरी लाट व्हायरसमध्ये होणाऱ्या म्युटेशनवर अवलंबून असेल.
महिंद्र अग्रवाल IIT कानपूरचे शास्त्रज्ञ आहेत. कोरोनासंसर्ग वाढण्याचा अंदाज वर्तवणाऱ्या तीन सदस्यीय समितीचे सदस्य आहेत. .
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तिसऱ्या लाटेबद्दल ट्विटरवर ते लिहीतात, "सप्टेंबरमध्ये व्हायरसचा नवीन म्युटंट आला. तर तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पीक गाठण्याची शक्यता आहे. त्यावेळी दिवसाला 1 लाख कोरोनारुग्ण आढळण्याची शक्यता आहे."
तज्ज्ञ सांगतात, युरोप आणि अमेरिकेत कोरोनासंसर्गाची लाट आल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी भारतात लाट दिसून येते.
आरोग्यविभागाचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, "पाश्चिमात्य देशात डेल्टा व्हेरियंटमुळे तिसरी लाट आली. भारतात दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरियंट कारणीभूत होता. आपल्या समाजात डेल्टा व्हेरियंटमुळे अॅन्टीबॉडी तयार झाल्यात. त्यामुळे डेल्टामुळे नवीन लाट येण्याची शक्यता नाही."
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार की नाही? हा प्रश्न आम्ही राज्य सरकारच्या कोव्हिड टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांना विचारला.
ते म्हणाले, "पहिली लाट कधी संपली, दुसरी कधी सुरू झाली, ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा वेगळ्या करता येत नाहीत, तशीच ही परिस्थिती आहे. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. "
तज्ज्ञ सांगतात, तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर लोकांनी काळजीपूर्वक वागलं पाहिजे. जेणेकरून संसर्ग पसरणार नाही.
ते पुढे सांगतात, "आपल्याकडे मोठ्या संख्येने अजूनही रुग्ण येत नाहीयेत. दुसरी लाट आणि सद्यपरिस्थितीमध्ये अंतर म्हणजे, आपल्याकडे आता औषधं आहेत."
व्हायरस म्युटेट झाला नाही, तर तिसरी लाट येणार नाही?
भारतात कोरोनासंसर्गाची दुसरी लाट येण्यासाठी कोरोना व्हायरसमध्ये झालेलं म्युटेशन कारणीभूत होतं. महाराष्ट्रातील अमरावतीत पहिल्यांदा डबल म्युटंट आढळून आला होता.
डॉ. गगनदीप कांग जगप्रसिद्ध लसीकरणतज्ज्ञ आणि वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. पीटीआयच्या माहितीनुसार, CII च्या लाईफसायन्स कॉनक्लेव्हमध्ये डॉ. कांग यांनी तिसऱ्या लाटेबद्दल मत मांडलं होतं.
त्या म्हणाल्या, "कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन झालं नाही. तर तिसरी लाट कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेएवढी विध्वंसक नसेल."
त्या पुढे सांगतात, "काही ठीकाणी आपल्याला केसेस वाढलेल्या आढळून येतील. कोरोनापासून सुरक्षा न मिळालेल्या आणि ज्या परिसरात व्हायरस पोहोचला नाही अशा ठिकाणी रुग्णसंख्या वाढेल."

फोटो स्रोत, Getty Images
IIT कानपूरचे शास्त्रज्ञ महिंद्र अग्रवाल ट्विटरवर लिहीतात, "कोरोना व्हायरमध्ये नवीन म्युटेशन झालं नाही. तर परिस्थिती जैसे-थे राहील. सद्यपरिस्थितीत फार बदल होणार नाही."
डॉ. प्रदीप आवटे सांगतात, लाट येण्यामागे नवीन म्युटेशनचा रोल फार महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, "कोरोना व्हायरसमध्ये मोठं म्युटेशन झालं नाही. तर, आपल्याकडे तिसरी लाट येण्याची शक्यता जवळपास नाही असं आपण म्हणू शकतो. "
लसीकरणाचा वाढलेला वेग
देशात आत्तापर्यंत 88 कोटीपेक्षा जास्त लोकांना कोरोनाविरोधी लशीचा एक डोस मिळाला आहे.
लसीकरण वाढल्याने लोकांमध्ये कोरोनाविरोधी रोगप्रतिकार शक्ती तयार होईल. त्यामुळे तिसरी लाट फार मोठी नसेल असं तज्ज्ञांचं मत आहे.
वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापिठीचे प्रो. ग्यानेश्वर चौबे सांगतात, "कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतर समाजातील सिरो पॉझिटिव्हीटी 10 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर कोरोनासंसर्गाची दुसरी लाट आल्याचं आमच्या संशोधनात आलंय."
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील काही राज्यात सिरोसर्व्हे केला होता. यात 75 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधी अॅन्टीबॉडी तयार झाल्याचं दिसून आलं होतं.
ते पुढे सांगतात, मोठ्या संख्येने लोकांच्या शरीरात अॅन्टीबॉडी असल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता दिसत नाही.
पण मे-जून महिन्यात ज्यांना लस मिळालीये. त्यांच्या अॅन्टीबॉडी पुढील काही महिन्यात कमी होणं सुरू होईल. काही लोक लस घेण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे व्हायरस पुन्हा पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








