कोरोना : तिसरी लाट ऑगस्ट अखेरपर्यंत येईल, पण दुसऱ्या लाटेपेक्षा धोका कमी - ICMR, #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images / NurPhoto
आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट अखेरपर्यंत येईल, पण दुसऱ्या लाटेपेक्षा धोका कमी - ICMR
राज्यांमध्ये शिथिल करण्यात आलेल्या निर्बंधांचा परिणाम म्हणून कोरोना संसर्गाची तिसरी लाट ऑगस्ट अखेरपर्यंत येईल, असा अंदाज ICMRच्या डॉ. समीरण पांडा यांनी व्यक्त केलाय. पण ही तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी गंभीर नसेल, असंही त्यांनी म्हटलं.
"तिसरी लाट देशव्यापी असेल पण ती दुसऱ्या लाटेइतकी मोठी वा गंभीर नसेल," असं डॉ. पांडा म्हणाल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलंय.
डॉ. पांडा हे ICMR म्हणजेच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे एपिडेमिऑलॉजिस्ट आणि साथीच्या आजारांचे प्रमुख आहेत.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानच्या संसर्गामुळे आलेली इम्युनिटी कमी होणं, नवीन व्हेरियंट्सनी रोग प्रतिकारकशक्तीला चकवा देण्याची शक्यता आणि राज्यांनी वेळेपूर्वी शिथिल केलेले निर्बंध या सगळ्या कारणांमुळे ऑगस्ट अखेरपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं डॉ. पांडांनी म्हटलंय.
2. सार्वजनिक मंडळांना मंडपासाठी परवानगी द्यायला BMC कडून सुरुवात
मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक ठिकाणी मंडप बांधण्यासाठी परवानगी द्यायला सुरुवात केली आहे.
गेल्यावर्षी परवानगी मिळालेल्या मंडळांना यावर्षी प्राधान्याने परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचं ई-सकाळने म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
21 जुलैला ऑफलाईन पद्धतीने आणि त्यानंतर या परवानग्या ऑनलाईन देण्यात येणार आहे. मंडळांना त्यांच्या प्रभागातील महापालिका कार्यालयात मंडप बांधण्यासाठी अर्ज करता येईल.
गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
3. त्यांनी वडिलांप्रमाणे भूमिका निभावली - शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वडिलाप्रमाणे आपली भूमिका निभावली या शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय.
एका पाहणीमध्ये उद्धव ठाकरे हे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री असल्याचं समोर आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यानंतर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं न्यूज18 लोकमतच्या बातमीत म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
सह्याद्री अतिथीगृहामध्ये महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्रांविषयीची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी हे विधान केल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.
या बैठकीनंतर शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वर्षावर गेले होते.
4. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल - अतुल भातखळकर
मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास असल्याचं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरू केलीय. बुधवारी (14 जुलै) भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आल्याचं टीव्ही9 मराठीने म्हटलंय.

नितेश राणे यांच्यावरही मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
5. भारतीय रेल्वेच्या ताब्यातील जमिनी मोदी सरकार विकणार?
भारतीय रेल्वेच्या ताब्यात असणाऱ्या जमिनी आता निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी देण्यात येणार आहेत.
यापूर्वी केंद्रातल्या मोदी सरकारने काही सार्वजनिक कंपन्यांची मालमत्ता विकून पैसे उभारायला सुरुवात केली होती. यानंतर आता रेल्वेच्या मालकीच्या मोकळ्या जमिनी 99 वर्षांच्या लीजवर देण्यात येणार असल्याचं लोकमतने म्हटलंय.
हावडा रेल्वेस्टेशनजवळ असणारी 88,400 चौरस मीटर जमीन 448 कोटी रुपयांसाठी 99 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








