कोरोना व्हायरस : 'कप्पा' व्हेरियंट काय आहे?

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

राजस्थानमध्ये कोव्हिड-19 च्या 'कप्पा' व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

जयपुर, अलवर, बाडमेर आणि भीलवाडा या चार जिल्ह्यांमध्ये 'कप्पा' व्हेरियंटने संक्रमित 11 रुग्णांची नोंद करण्यात आली.

निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल सांगतात, "कप्पा व्हेरियंट अधिक तीव्रतेने पसरणारा नाही."

जागतिक आरोग्य संघटनेने कप्पा व्हेरियंटला 'व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट' या कॅटेगरीमध्ये ठेवलंय.

पण, कोरोना व्हायरसचा हा कप्पा व्हेरियंट काय आहे? हा व्हेरियंट अधिक तीव्रतेने पसरणारा आहे का? जाणून घेऊया.

कप्पा व्हेरियंट काय आहे?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 'कप्पा व्हेरियंट' भारतात आढळून आलेला नवीन व्हेरियंट नाही.

निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल म्हणतात, "कप्पा व्हेरियंट याआधीदेखील भारतात आढळून आलाय. फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारतातील काही राज्यांमध्ये कप्पा व्हेरियंटचे रुग्ण सापडले होते."

भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये कोरोना व्हायरसमध्ये सर्वांत पहिले 'डबल म्युटेशन' झाल्याचं आढळून आलं. याला संशोधकांनी शास्त्रीय भाषेत B.1.617 असं नाव दिलं होतं.

संशोधक सांगतात, कोरोना व्हायरसच्या 'डबल म्युटेशन'मध्ये पुढे आणखी एक म्युटेशन झालं. याला B.1.617.1 असं नाव देण्यात आलं. यालाच कोरोना व्हायरसचा 'कप्पा व्हेरियंट' म्हणून ओळखलं जातं.

'कप्पा व्हेरियंट' धोक्याचा आहे?

जागतिक आरोग्य संघटनेने, एप्रिल 2021 मध्ये 'कप्पा व्हेरियंट'ला व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट म्हणून घोषित केलं.

संशोधक सांगतात, व्हायरसमध्ये झालेल्या जनुकीय बदलामुळे त्याची संसर्ग क्षमता, गंभीर आजार होण्याची शक्यता, रोगप्रतिकारशक्तीला चकवण्याची क्षमता वाढते.

त्याचसोबत, व्हायरस उपाचारांना प्रतिसाद देण्याच्या क्षमतेवरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या म्युटेशन झालेल्या नवीन व्हायरसला व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट असं म्हणतात.

तिसरी लाट कोरोना टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

डॉ. पॉल पुढे सांगतात, "कोरोना व्हायरसचा कप्पा व्हेरियंट, डेल्टा व्हेरियंटशी मिळताजुळता आहे. भारतात डेल्टा व्हेरियंट तीव्रतेने पसरण्यास सुरूवात झाल्यानंतर, कप्पा व्हेरियंट मागे पडला."

भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास, अधिक तीव्रता आणि संसर्गक्षमता असलेला डेल्टा व्हेरियंट कारणीभूत होता. डेल्टा व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित करण्यात आलंय.

"कप्पा व्हेरियंट तीव्रतेने पसरणारा नाही. पण, सरकार या व्हेरियंटवर नजर ठेऊन आहे. याला व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलंय," असं डॉ. पॉल पुढे म्हणाले.

नानावटी मॅक्स सूपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. हेमलता अरोरा सांगतात, "उपलब्ध माहितीनुसार, कप्पा व्हेरियंट, व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट आहे. याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून अजूनही घोषित करण्यात आलेलं नाही."

"डेल्टा व्हेरियंटप्रमाणे, हा व्हेरियंट तीव्रतेने पसरणारा असल्याचं आढळून आलेलं नाही."

भारतात कुठे आढळून आलाय कप्पा व्हेरियंट?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात मोठ्या प्रमाणावर जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येतंय. यात कोव्हिड-19 च्या म्युटेशनबद्दल माहिती मिळते. देशात विविध प्रकारचे व्हेरियंट आढळून येत आहेत.

भारतात राजस्थान, त्रिपूरा, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये सद्यस्थितीत कप्पा व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत.

उत्तरप्रदेश सरकारच्या माहितीनुसार, राज्यात कप्पा व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.

तिसरी लाट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

गोरखपूरच्या बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमरेश सिंह वृत्त संस्था एएनआयशी बोलताना म्हणाले, "कप्पा व्हेरियंटबाबत इतक्या लवकर काहीच सांगता येणार नाही. रुग्णांची माहिती घेतल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांना खूप ताप आला आणि काही वेळातच श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला."

कप्पा व्हेरियंटवर लस प्रभावी आहे?

कोरोना व्हायरसच्या कप्पा व्हेरियंटमध्ये रोगप्रतिकारशक्तीला चकवणारं म्युटेशन असल्याने कोरोनाविरोधी लस या व्हेरियंटवर प्रभावी ठरेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोनाविरोधी लस कप्पा व्हेरियंटवर प्रभावी आहे का? यावर संशोधन केलं. ICMR च्या माहितीनुसार, कोरोनाविरोधी लस कोव्हॅक्सीन ही कप्पा, अल्फा, झेटा या व्हेरियंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं होतं.

तिसरी लाट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

तर, ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत, कोरोनाविरोधी लस बनवणारी कंपनी एस्ट्राझेन्काने कोव्हिशिल्ड लस, कप्पा आणि डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी आहे. कोव्हिशिल्ड, कप्पा आणि डेल्टा व्हेरियंटविरोधात सुरक्षा देतात, असं संशोधनात आढळून आल्याची माहिती कंपनीने दिली होती.

"भारतामध्ये उपलब्ध असलेल्या कोरोनाविरोधी लशी, कप्पा व्हेरियंटवर प्रभावी आहेत," असं डॉ. हेमलता अरोरा म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)