बँक खात्यातून आजपासून काही सेवांसाठी थेट पैसे वळते होणार नाहीत, मग काय करायचं?

    • Author, बाला सतीश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दर महिन्याला तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वा वॉलेट्सच्या मार्फत थेट काही पैसे कापून कोणत्या सेवेसाठी भरले जातात का? मग या 'Standing Instructions' साठीचे नियम आजपासून बदलले आहेत. काय आहेत हे बदल?

हैदराबादचे गुंतवणूक तज्ज्ञ नागेंद्र साई यांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स विषयीच्या बदलांची ही माहिती बीबीसीला दिली.

स्ँटडिंग इन्स्ट्रक्शन (Standing Instruction) म्हणजे काय?

ग्राहक म्हणून आपण वापरत असलेल्या विविध सेवा - वीज, फोन, इंटरनेट, OTT सबस्क्रिप्शन, इन्शुरन्स प्रिमियम यासाठी आपण बिलं भरतो. कधी दर महिन्याला, कधी दर दोन महिन्यांनी किंवा मग ठराविक काळाने.

आणि हे बिल भरलं नाही तर मग आपली ती सेवा खंडित केली जाते. आणि मग या बिलासाोबतच लेट फी देखील भरावी लागते.

पण समजा एका ठराविक तारखेला एखाद्या सेवेसाठीचे पैसे क्रेडिट वा डेबिट कार्ड वा वॉलेटच्या माध्यमातून कापावेत अशी सूचना दिली तर मग बँक हा व्यवहार पार पाडते. याला म्हणतात स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. यालाच ऑटो डेबिट (Auto Debit) म्हणजे आपोआप पैसे कापले जाणं, असंही म्हणतात.

RBI ने काय बदल केले आहेत?

रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांनुसार आता ऑनलाईन होणाऱ्या पैशाच्या प्रत्येक व्यवहारासाठी OTP द्वारे आणखी एकदा ऑथेंटिकेशन करावं लागेल.

यामुळे प्रत्यक्ष व्यवहार होण्यापूर्वी ग्राहक आणखी एकदा खात्री करू शकणार असल्याने ग्राहकांसाठीची ऑनलाईन सुरक्षितता वाढेल, असं RBI चं म्हणणं आहे.

नवीन नियम कधीपासून लागू होणार?

खरंतर रिझर्व्ह बँकेला हे नियम 2020मध्येच लागू करायचे होते. 1 एप्रिल 2021 पासून याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्तावही आरबीआयने दिला होता.

पण तेव्हा यासाठी आवश्यक असणारं सॉफ्टवेअर अनेक बँकांकडे नव्हतं. बँकांच्या संघटनांनी विनंती केल्यानंतर ही अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली. 1 ऑक्टोबर 2021 हे नियम आता अंमलात येत आहेत.

सगळ्या बँकांसाठी हे नियम लागू आहेत का?

75% पेक्षा अधिक बँकांनी या नियमाच्या अंमलबजावणीसाठीची तयारी केलेली आहे. काही लहान बँका मात्र अजून यासाठी सज्ज नाहीत. पण बहुतांश मोठ्या सरकारी आणि खासगी बँका याची अंमलबजावणी करत आहेत.

बँकांनी त्यांच्या ग्राहकांना ई-मेल्स आणि मेसेजेसच्या माध्यमातून या बदलांविषयीची माहिती दिलेली आहे.

Paytm, Mobi Kwik यासारख्या मोबाईल वॉलेट्ससाठीही हा नियम लागू होईल.

कर्जाच्या EMI चं काय?

गृहकर्ज वा वैयक्तिक कर्जासाठीच्या हप्त्यांवर या नियमाचा परिणाम होणार नाही. कर्जाचे हप्ते जर परस्पर बँकेतून कापून जात असतील तर त्या स्टँडिंग इंस्ट्रक्शन्सवर या नवीन नियमांचा परिणाम होणार नाही.

म्युच्युअल फंडातल्या गुंतवणुकीसाठीही जर दरमहा बँक खात्यातून पैसे कापले जात असतील, तर त्यावरही या नवीन नियमांचा परिणाम होणार नाही.

हे व्यवहार पूर्वीसारखेच सुरु राहतील.

जर एखाद्या वेबसाईटला बिलासाठीच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स दिल्या असतील तर?

बिलं भरण्यासाठी एखाद्या वेबसाईटच्या मार्फत तुम्ही व्यवहार करत असाल तर 2 गोष्टी होऊ शकतात.

1. जर तुमच्या बिलाची रक्कम 5 हजारांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्या तारखेच्या आदल्या दिवशी नोटिफिकेशन येईल. बिल भरा, बिल भरू नका किंवा पैसे भरण्याची पद्धत (Mode of Payment) बदला असे पर्याय यात असतील. त्यातून तुम्हाला हवा तो पर्याय तुम्ही निवडू शकता.

यापैकी कोणताच पर्याय तुम्ही निवडला नाही तर 24 तासांनी आपोआप बिलाचे हे पैसे कापले जातील. हे पेमेंट थांबणार नाही. पण फक्त 5,000 पर्यंतच्या व्यवहारांसाठी असं होईल.

2. तुमच्या बिलाची रक्कम 5 हजारांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्या तारखेच्या 24 तास आधी त्याबाबतच नोटिफिकेशन येईल. यावर क्लिक केल्यानंतर OTP जनरेट होईल. हा OTP भरला की मगच बिलाचे पैसे कापले जातील. नाहीतर बिल भरलं जाणार नाही.

या नवीन नियमांमुळे होणारी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला दर महा बिलांच्या तारखा लक्षात ठेवाव्या लागणार नाहीत. शिवाय नोटिफिकेशन आल्यानंतर ते उघडून त्यातला योग्य पर्याय निवडावा लागेल. पैसे भरायचे की नाही, हे ठरवण्याचा पर्याय तुमच्याकडे असेल.

पैसे भरण्यात खंड पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची?

महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वापरत असलेला फोन नंबर आणि ई-मेल आयडी बँक आणि वॉलेटशी जोडा. म्हणजे यावर तुमचे बँकेचे मेसेज आणि ईमेल्स येतील.

बँकेकडून येणारे हे संदेश नियमितपणे वाचा आणि त्यातल्या सूचनांचं पालन करा.

वापरात नसलेला फोन नंबर आणि ईमेल आयडी बँकेच्या तपशीलांतून काढून टाका आणि KYC अपडेट करा.

ग्राहकांचा काय फायदा?

अनेकदा आपण काही सेवा थोड्या कालावधीसाठी घेतो पण त्या थांबवण्यासाठीची प्रक्रिया मोठी असल्याने त्या पुढे काही काळासाठी सुरू राहतात आणि त्याचे पैसे कापले जातात.

पण आता हे पेमेंट तुम्हाला वेळीच थांबवता येईल.

तुमच्या बँकेची वा वॉलेटची या नियमांबद्दलची पॉलिसी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन नक्की वाचा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)