You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईच्या आरे कॉलनीत बिबट्याच्या वारंवार हल्ल्यामागे असू शकतात ही 3 कारणं
मुंबईतील आरे कॉलनी परिसरात गेल्या एका महिन्यातच बिबट्याचे सहा हल्ले झालेत.
एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे स्थानिक नागरीकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. तर, वारंवार होणाऱ्या या घटनांवर तज्ज्ञांनी देखील चिंता व्यक्त केलीये.
माणसांवर होणाऱ्या या हल्ल्यांमागे बिबट्याची एक मादी असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. प्रशासनाने हल्ला करणाऱ्या बिबट्याची शोधमोहिम सुरू केलीये.
पण, महिनाभरात बिबट्याचे सहा हल्ले का झाले? या मागचं कारण काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
बिबट्याचा हल्ला नेमका कसा झाला?
गुरूवारी रात्री 9.30 च्या सुमारास पुन्हा आरे कॅालनीमधील युनिट -3 मध्ये बिबट्याने एका पुरुषावर हल्ला केलाय. त्यात तो पुरूष जखमी झालाय.
गेल्या महिन्यात याच ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता.
संजय गांधी नॅशनल पार्कचे रेंज फॅारेस्ट officer विजय बारब्धे म्हणाले, "बिबट्याने केलेला हा सातवा हल्ला आहे."
दुसरीकडे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या सापडलाय. "या बिबट्याला संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येईल. वैद्यकीय अभ्यासानंतर माणसांवर हल्ला करणारा हा तोच बिबट्या आहे का याचा शोध घेतला जाईल"
बुधवारी (29 सप्टेंबरला) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आरे कॉलनीमधील युनिट-31 मध्ये बिबट्याने 55 वर्षांच्या निर्मलादेवी सिंह यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.
बिबट्याच्या या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.
संध्याकाळी निर्मलादेवी घराबाहेर मोकळ्या जागेत आल्या होत्या. पण, त्याआधीच एक बिबट्या त्यांच्या घराजवळ दबा धरून बसला होता. त्या घराबाहेर येऊन कट्ट्यावर बसताच बिबट्याने पाठीमागून हल्ला केला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या बिथरल्या. पण, धीर न सोडता त्यांनी हातातील काठीने जीव वाचवण्यासाठी बिबट्यावर प्रतिकार केला.
बिबट्याने निर्मलादेवींना सोडलं. पण, या हल्ल्यात त्यांच्या मानेवर आणि खांद्यावर चावा घेतला. उपचारांसाठी निर्मलादेवींना महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
निर्मलादेवी यांचा मुलगा संजय सिंह म्हणाला, "बिबट्या आईच्या अंगावर चढला होता. त्याने खांद्यावर चावा घेतला आणि चेहऱ्यावर नखं मारली. पण, आईने हातातील काठीने त्याचा प्रतिकार केला."
निर्मलादेवींवर हल्ला केल्यानंतरही बिबट्या काहीकाळ त्याच परिसरात होता, असं स्थानिक नागरीक म्हणतात.
महिन्याभरात बिबट्याचे सहा हल्ले
मुंबईच्या आरे कॉलनीत गेल्या महिन्याभरात बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याची ही सातवी घटना आहे, असल्याचं स्थानिक अधिकारी सांगतात.
- 31 ऑगस्ट- बिबट्याने पहिल्यांदा हल्ला केला
- 26 सप्टेंबर- चार वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेलं. मुलाच्या नातेवाईकांनी पाठलाग केला. बिबट्याने मुलाला सोडलं. पण, मुलाच्या डोक्यावर आणि पाठीवर जखम झाली
- युनिट-31 मध्ये रहाणाऱ्या लक्ष्मी उंबरसाडे नावाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. यात तिच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली.
हे बिबट्याने केलेले तीन मोठं हल्ले आहेत.
"घराबाहेर पडायला भीती वाटते"
शकिला बानो गेल्या 25 वर्षांपासून आरे कॉलनीच्या युनिट-31, विसावा परिसरात रहातात. निर्मलादेवी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय.
त्या सांगतात, "गेल्या महिनाभरात बिबट्यांचे हल्ले वाढलेत. घराबाहेर जाताना खूप भीती वाटते. लहान मुलांना बाहेर सोडणं बंद केलंय. मुलं नजरेआड झाली तर, लगेचच आम्ही त्यांना घरात घेऊन जातो."
बिबट्याची दहशत या वाडीतील लोकांशी बोलताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सकाळी, संध्याकाळी बिबट्या हमखास दिसतो, असं लोक सांगतात.
"बिबट्याच्या हल्ल्याची इतकी भीती बसलीये की, एकटं बाहेर पडणं शक्य नाही. दोन-तीन लोकांनी एकत्र बाहेर पडावं लागेल," शकीला बानो पुढे सांगतात.
बिबट्याच्या हल्यानंतर पालिका प्रशाननाने या वाडीतील लोकांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलीये.
'माझ्यावर बिबट्याने केला होता हल्ला'
याच वाडीत रहाणाऱ्या विजया मोरेंवर 2005 साली बिबट्याने जीवघेणा हल्ला केला होता.
विजया यांचा जीव वाचला. पण, या जीवघेण्या हल्ल्याच्या आठवणी अजूनही त्यांच्या मनात ताज्या आहेत.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणतात, "मी शेजारच्या मुलाला आणायला बाहेर पडले होते. तेवढ्यातच बिबट्याने हल्ला केला. माझ्या अंगावर उडी घेतली. मी खाली पडले."
विजया यांनी प्रतिकार केला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. कालच्या हल्यानंतर विजया यांना त्यांच्यावर हल्ला झालेल्या दिवसाची आठवण झाली.
त्या पुढे सांगतात, "तो दिवस सतत डोळ्यासमोर उभा रहातो. त्यादिवशी माझा जीव गेला असता. आता बाहेर जाताना, काम करताना बिबट्याने हल्ला केला तर? खूप भीती वाटते."
हल्ला करणारी मादी बिबट्या आहे?
वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे वनविभागही सतर्क झालाय. वनविभागाने माणसांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप केज लावण्याचं काम सुरू केलंय.
बिबट्यांचा सातत्याने वावर असलेल्या परिसरात तीन ट्रॅपकेज लावण्यात आले आहेत.
विजय प्रारब्धे संजय गांधी नॅशनल पार्कचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहेत. ते म्हणतात, "गेल्याकाही दिवसात बिबट्याचे सात हल्ले नोंदवण्यात आलेत."
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गेल्या दोन वर्षात बिबट्याने हल्ला केल्याची एकही घटना समोर आली नव्हती. त्यामुळे, वारंवार होणाऱ्या या हल्ल्यामागे एकच बिबट्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबत बोलताना विजय प्रारब्धे सांगतात, "आत्तापर्यंत आढळून आलेल्या माहितीनुसार, एक मादी बिबट्या या हल्लांमागे असण्याची शक्यता आहे."
वनविभागाने या मादी बिबट्यासाठी शोधमोहीम सुरू केलीये.
वारंवार बिबट्याचा हल्ला होण्यामागची कारणं काय?
एका महिन्यातच बिबट्याने सहा हल्ले केल्यामुळे वन्यजीव तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केलीये.
बिबट्याने पाठोपाठ हल्ले का केले? यामागे कारण काय? हे आम्ही वन्यजीव संरक्षक केदार गोरे यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला.
बिबट्याच्या हल्ल्यांमागील तीन शक्यता ते सांगतात.
1) हल्ला करणाऱ्या या प्राण्यामध्ये काहीतरी गंभीर समस्या निर्माण झाली असावी
2) या प्राण्याला इजा झाल्याने त्याला शिकार करता येत नसावी. त्यामुळे माणसांवर हल्ला करतोय.
3) हा बिबट्या अत्यंत लहान असावा. शिकारीचं तंत्र येत नसल्याने समोर दिसणाऱ्यावर तो हल्ला चढवतोय.
या घटना का घडत आहेत. यावर अभ्यास महत्त्वाचा आहे असं वन्यजीवतज्ज्ञ सांगतात.
केदार गोरे पुढे म्हणाले, "हल्ला करणारा एकच बिबट्या आहे, का एकापेक्षा जास्त याचा योग्य अभ्यास महत्त्वाचा आहे. हल्ला करणारा बिबट्या पकडला जाईपर्यंत ठोस भाष्य करणं योग्य ठरणार नाही."
वन्यजीवतज्ज्ञ म्हणतात, लोकांच्या सुरक्षेसाठी बिबट्याला पकडण्यात आलं पाहिजे. प्राणी आणि माणसातील संघर्ष खूप वर्षांपासून सुरू आहे. मनुष्य आणि प्राणी एकाच जागेत असल्याने हा संघर्ष होतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)