दुष्काळी मराठवाड्यात पूर का येतो आहे?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

पश्चिम महाराष्ट्रानंतर गेल्या आठवड्यात मराठवाड्यात पावसानं थैमान घातलं. हाहा:कार उडाला. शेतं बसली, 15 हून अधिकांचे जीव गेले. प्रचंड नुकसान झालं.

बंगालच्या उपसागरात आलेल्या गुलाब चक्रिवादळाचा परिणाम म्हणून मध्य भारत, महाराष्ट्रात मराठवाडा इथं कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि परिणामी मराठवाड्यात कहर झाला, हे तात्कालिक हवामानशास्त्रीय कारण आहे.

पण गेल्या काही वर्षांमध्ये मराठवाड्यात ढगफुटीसदृश मोठ्या पावसाच्या, गारपिटीच्या, पूरांच्या घटना वाढत्या संख्येनं नोंदवल्या जात आहेत.

ज्या भागात नद्या वा ओढे कोरडे वाहात होते, ते एकदम मोठ्या पावसाने दुथडी भरुन वाहायला लागले आहेत. थोडक्या काळात मोठा पाऊस असे हवामानशास्त्राच्या भाषेत 'एक्स्ट्रीम इव्हेंट्स' मराठवाड्यात अधिक वारंवारतेनं पाहायला मिळताहेत.

वर्षाचा बहुतांश काळ कोरडा आणि अचानक काही दिवस मोठा पाऊस वा गारपीट अशी स्थिती पाहायला मिळते आहे. नेहमी दुष्काळी प्रदेश म्हणून गणला गेलेल्या मराठवाड्यात हे काय होतं आहे?

जागतिक हवामान बदलाचे आणि ग्लोबल वॉर्मिंगची परिमाणं त्याला आहेत का? की मानवी जलव्यवस्थापनाचेही काही परिणाम असे दिसताहेत? थोडक्या वर्षांच्या निरिक्षण आणि नोंदींवरुन तत्काळ काही निष्कर्ष काढता येणार नाही, पण शक्यतांची नोंदही होणं आवश्यक आहे.

पावसाची नोंद

यंदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात, जेव्हा मान्सून परतण्याचा काळ आहे, तेव्हा मराठवाड्यात बंगालच्या उपसागरातल्या 'गुलाब' चक्रीवादळामुळे मराठवाड्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होऊन जोराचा पाऊस झाला.

या अधिक झालेल्या पावसाची नोंद 'महारेन' या सरकारच्या संकेतस्थळावरही पाहायला मिळते.

त्यावरून एक दिसतं की मान्सूनच्या काळात सलग पाऊस मराठवाड्यात पडला आहे असं नाही, पण थोडक्या काळात, म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तो प्रचंड कोसळला आहे आणि पूराची स्थिती निर्माण झाली आहे.

जून ते ऑगस्ट या पावसाच्या तीन महिन्यांत मराठवाड्यात, म्हणजे औरंगाबाद विभागात 643 मिलीमीटर एवढा पाऊस झाला जो सरासरीच्या 125 टक्के इतका होता. पण एकट्या सप्टेंबर महिन्यात तो 379 मिलीमीटर एवढा नोंदला गेला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेतही ही वाढ जवळपास तेवढीच आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अशाच्या थोडक्या काळामध्ये मोठा पाऊस होऊन मराठवाड्यात औरंगाबाद बीड, नांदेड अशा जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

त्यावर्षी सप्टेंबरपर्यंत 655 मिलीमीटर पाऊस झाला होता, म्हणजे सरासरीच्या 97 टक्के, 2019 च्या सप्टेंबरमध्ये तो 83 टक्के इतका होता.

मराठवाड्यातल्या या वाढलेल्या 'एक्स्ट्रीम इव्हेंट्स'ची कारणं काय?

अरबी समुद्रावरून नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह तीव्र असताना पश्चिम घाटामुळे वारे अडून किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार होतो, ज्याला 'ऑफ शोअर ट्रफ' म्हणतात.

ऑफ शोअर ट्रफमुळे कोकण आणि घाटात मोठा पाऊस होतो. हा पाऊस घाटालगतच्या पूर्वेकडील काही भागांनाही मिळतो.

दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर त्या क्षेत्रांचा जमिनीवर येण्याचा सर्वसाधारण मार्ग ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान असा असतो.

या मार्गावरून कमी दाबाची क्षेत्रं जात असताना विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला पाऊस मिळतो.

मराठवाड्याला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांचा असा थेट फायदा क्वचितच मिळतो. त्यामुळे येथील पावसाचं सर्वसाधारण प्रमाणही कमी असतं.

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बंगालच्या उपसागरातील काही कमी दाबाच्या क्षेत्रांचा प्रवास महाराष्ट्रावरून पश्चिमेकडे झाला. अशा वेळेस मराठवाड्यात मोठा पाऊस नोंदला गेला. त्याचप्रमाणे यंदा मॉन्सून प्रवाह क्षीण असल्यामुळे संपूर्ण हंगामात सातत्याने विजांसह वादळी पावसाच्या घटना घडल्या. या घटनांचं क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भात असल्यामुळे मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण त्यामुळेही वाढलं.

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ आणि सतर्क या महाराष्ट्रातील हवामानशास्त्राशी संबंधित संस्थेचे उपाध्यक्ष डॉ जे. आर. कुलकर्णी म्हणतात की, "दोन प्रकारे मराठवाड्याच्या वाढलेल्या पावसाकडे पाहता येईल. एक म्हणजे गेल्या 3-4 दिवसात तिथं जो पाऊस पडला आहे त्याचं कारण अर्थात बंगालच्या उपसागरात जे चक्रिवादळ निर्माण झालं त्यामुळे मध्य भारत, मराठवाडा इथं कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि हा पाऊस झाला."

"पण दुसरं कारण जास्त महत्वाचं आहे आणि ते म्हणजे हवामान बदल. जर तुम्ही गेल्या काही वर्षांतल्या नोंदी पाहिल्यात तर असे एक्स्ट्रीम इव्हेंट्स वाढले आहेत आणि सोबतच देशातला बहुतांश पाऊस हा उत्तरेपेक्षा दक्षिण भारतात एकवटला आहे. म्हणजे मराठवाडा, मध्य भारतापासून खाली.

हवेचं तापमान वाढल्यानं जास्त आर्द्रता वाढली, परिणामी ढगांची निर्मिती वाढली, पण ती अधिक आर्द्रता ढग फार काळ धरुन ठेवू शकत नाहीत म्हणून कमी काळात मोठा पाऊस होण्याची ठिकाणं वाढली. तेच मराठवाड्यात होतंय. हवामान बदल आपल्या दारावर आले आहेत."

पुणेस्थित 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी' इथल्या जागतिक हवामान बदलाचा भारतावरचा अभ्यास करणाऱ्या केंद्रात संशोधन करणारे डॉ. रॉक्सी कोल यांच्या मते जेव्हा त्यांनी 1950 ते 2018 पर्यंत मराठवाड्यातल्या पावसाच्या नोंदींचा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसलं की या प्रदेशातला एकूण पाऊस कमी होत गेला, पण इथल्या 'एक्स्ट्रीम इव्हेंट्स'ची वारंवारता मात्र वाढत गेली.

याचा संबंध जागतिक तापमान वाढीशी लावता येतो. "मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांचा पावसाचा डेटा दाखवतो की एकूण पाऊस हा कमी होत गेला आहे, पण कमी काळात प्रचंड पाऊस अशा घटना मात्र वाढल्या आहेत," डॉ कोल सांगतात.

"एकूण पडलेल्या पावसामध्ये 15 ते 20 टक्के घट झाली आहे असं दिसतं आहे. बहुतांशानं हे नांदेड, बीड, जालना, लातूर हे भाग आहेत. आता ज्या घटना वारंवार घडताहेत त्या मान्सूनच्या भारतातल्या बदललेल्या पॅटर्नमुळे होतं आहे, असं म्हणता येईल."

"तापमान वाढीमुळे या भागात मान्सूनचे ढग घेऊन येणाऱ्या वाऱ्यांवर परिणाम दिसतो आहे. कधी ते जास्त तर कधी कमी आहेत. जेव्हा ते जास्त ताकदीनं येतात तेव्हा ते कमी काळात जास्त आर्द्रता आणतात आणि या भागात तेव्हा प्रचंड पाऊस होतो. सोप्या भाषेत असं म्हणता येईल.

पण जास्त तापमान असलेली हवा आर्द्रता अधिक काळ धरु शकत नाही. त्यामुळे जास्त काळ पाऊस पडत नाही आणि जी आर्द्रता आणलेली असते ते एकदम जोरात पावसाच्या स्वरुपात या ढगांकडून सोडली जाते. मग पूर येतात. हा तापमान वाढ आणि हवामान बदलाचाच परिणाम आहे," डॉ कोल सांगतात.

मराठवाड्यातला पूर अतिवृष्टीनं की पाण्याच्या गैरव्यवस्थापनामुळे?

हवामान बदलाचा परिणाम पश्चिम घाटावर, मराठवाड्यावर दिसतो आहे हे नक्की. त्यानं पावसावर आणि परिणामी शेतीवरही बदल घडून आलेत हेही दिसतं आहे.

पण मराठवाड्यात यंदा जे घडलं ते केवळ हवमान बदलामुळं घडलं असं म्हणता येईल का? काही पर्यावरणवाद्यांच्या मते या पूराचं कारणं हे पाण्याचं चुकीचं व्यवस्थापन हेही होतं आणि त्याची चौकशी झाली पाहिजे.

प्रसिद्ध पर्यावरण पत्रकार अतुल देऊळगांवकर यांच्यामते हे चुकलेल्या व्यवस्थापनाचं उदाहरण आहे.

"अशा प्रकारचा पूर येतो तेव्हा त्यामागे अनेक घटक असतात. त्यातला एक हवामान बदल हा आहे यात शंका नाही. पण अतिवृष्टीनंच पूर येतो हा याबद्दल शंका आहे. आतापर्यंतचा अभ्यास हे सांगतो की धरणं, बंधारे, अतिक्रमणं अशामुळं पाणी अडतं त्या कारणानं पूर येतात," देऊळगांवकर म्हणतात.

पण त्यांच्यामते मराठवाड्यातली स्थानिक कारणंही यावेळेस महत्वाची आहेत. "जलयुक्त शिवारच्या कामांमुळे इथं काय झालं की माती उचलून बाजूला ठेवली. अगोदरच झाडं कमी झाली आहेत. दुसरं, हवामानाचा अंदाज असूनही सांगितलं नाही.

यंदा मांजरा धरणाची पहिल्यांदा 18 दारं उघडली गेली. ती एकदम उघडली गेली. हळूहळू व्यवस्थापन करुन का उघडली नहीत? एकदम उघडल्यानं झालं असं की ते पाणी नदीत आलं नाही. ते शेतात गेलं आणी आजही शेतात पाच पाच फूट पाणी आहे. त्यामुळे चौकशी झाली पाहिजे," देऊळगांवकर म्हणतात.

हवामान बदलाचे हे परिणाम तात्पुरते नाही आहेत. त्यामुळे आता पुन्हा असा पाऊस झाल्यावर मराठवाड्याच्याच नाही तर राज्यभरात सगळीकडेच जलव्यवस्थापनात आपण काय योग्य कृती करतो याकडे आता लक्ष आहे.

धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. "बीड जिल्ह्यात जून ते आजपर्यंत 11 वेळा अतिवृष्टी झाली, गेल्या 15 दिवसात तीनवेळा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली आहे."

पुढे ते म्हणतात, "यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन बहुतांश भागात पुरसदृश परिस्थिती आहे. 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे 100% नुकसान झाले आहे. घरे, रस्ते, पूल यांचेही प्रचंड नुकसान झालं."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)