You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर खड्ड्यांवरून स्टंटबाजी करत आहेत का?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेकडून रस्ते, त्यावरची डागडुजी यावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण इतक्या वर्षांमध्ये मुंबई काही खड्डेमुक्त झाली नाही. यंदाही परिस्थिती जैसे थे आहे.
तीनच दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रस्त्यांवरच्या खड्डे पहाणी दौरा केला यावेळी कुर्ल्याला पोहोचल्यावर ज्या ठिकाणी खड्डे होते त्या ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचे विचारणा केली.
यावेळी अधिकाऱ्यांनी हे खड्डे बुजवले होते, परंतु पावसामुळे पुन्हा खड्डे तयार झाल्याचं म्हटलं.
त्यांनी त्याचे फोटो दाखवण्याचाही प्रयत्न केला. पण महापौरांनी एका अधिकाऱ्याच्या हातातून फाईल खेचत त्या अधिकार्यांला झापलं. "चष्म्याचा नंबर वाढलाय का? खड्डे दिसत नाहीत? हे फेकून द्या" असं म्हणत त्या अधिकार्यांवर संतापल्या.
महापौरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या स्टंटबाजी करत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या.
विरोधी पक्षानेही "इतके दिवस दौरा का सुचला नाही? आता स्वतः ची जबाबदारी झटकण्यासाठी अधिकार्यांना झापतायेत" अशी प्रतिक्रिया दिली. याबाबत महापौरांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "मला स्टंटबाजीची गरज नाही. मी सकारात्मकपणे माझं काम करते. मी ट्रोलर्सला गांभीर्याने घेत नाही."
आता महापौरांनी मी माझं काम करते, असं म्हटलं असलं तरी मुंबईतल्या रस्त्यांची चाळण दरवर्षीच का होते, हा प्रश्न उरतोच...
मुंबईत 9 एप्रिलपासून खड्डे भरायला सुरू केले गेले. आतापर्यंत 42 हजार खड्डे भरल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
हा दावा कितपत खरा आहे? मुंबईत खड्डे भरण्यासाठी किती पैसे महापालिकेने खर्च केले? आणि त्यानंतरही काय परिस्थिती आहे? याचा हा आढावा...
मुंबई येत्या 15 दिवसांत खड्डेमुक्त होणार?
येत्या 15 दिवसांत मुंबईतले खड्डे बुजवले जातील, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. पण ही काही डेडलाईन नसल्याचं त्या सांगायला विसरल्या नाहीत.
यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, "येत्या 15 दिवसांत खड्डे बुजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आमचं काम करतोय. ही काय डेडलाईन वगैरे नाही. पण जे अधिकारी खड्डे बुजवण्याचं काम करत आहेत, त्यांना इतर कामात अडकवू नये. खड्डे बुजवण्याच्या कामाला प्राधान्य देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. "
28 सप्टेंबरला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत अधिकार्यांना काही सूचना देण्यात आल्या.
- रस्त्यावर खड्डे निदर्शनास येताच ते भरून काढण्याची कार्यवाही एक दिवसात पूर्ण झाली पाहिजे
- 1 हजार 87 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्यांची कार्यवाही सहायक आयुक्तांनी लवकर पूर्ण करावेत.
- रस्त्यांवर खड्डे दिसताच एक दिवसात तो खड्डा बुजवला गेला पाहिजे.
- रात्रीच्या वेळी खड्डे बुजवण्याची कार्यवाही करावी जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही
- वाहतूक पोलिसांनी निदर्शनास आणून दिले खड्डे हे तातडीने बुजवण्यात यावेत जेणेकरून वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.
50 कोटी खड्यात?
2055 किलोमीटर लांबीचे रस्ते मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येतात. या रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी खड्डे 50 कोटींचा निधी खर्च करते.
इतका खर्च करूनही मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे आजही कायम आहेत. मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा याबाबत बोलताना म्हणतात, "मुंबईच्या रस्त्यावर अजूनही 17 - 18 हजार खड्डे बाकी आहेत. ते कधी बुजवणार? 42 हजार खड्डे बुजवले ही माहिती खोटी आहे. जूनपासून पाऊस पडतोय. तेव्हापासून काय हे झोपले होते?
काय आहे 'कोल्डमिक्स मटेरियल'?
2016 पर्यंत मुंबई महापालिका खड्डे बुजवण्यासाठी 'हॉटमिक्स मटेरियल' वापरत होती. पण पावसाळ्यात त्याचा फारसा उपयोग होत नाही असं सांगत त्यांनी 2017 मध्ये कोल्डमिक्स मटेरियल तंत्रज्ञान आणलं
. त्यासाठी मुंबई महापालिकेने 125 कोटी रुपये खर्च केले आहेत. हॉटमिक्स मटेरियल हे गरम करून खड्यात भरलं जायचं. पण कोल्ड मिक्स मटेरियला गरम करण्याची गरज नसून पावसातही नीट भरलं जातं असा दावा मुंबई महापालिकेचा होता.
सध्या भरलेले खड्यातून हे मटेरियल वाहून गेल्याचं चित्र आहे.
विरोधी पक्षनेते रवी राजा याबाबत बोलताना म्हणाले, "दोन वर्षांत 125 कोटी रूपये त्यांनी खड्डे बुजवण्याच्या 'कोल्ड मिक्स मटेरिअल' साठी खर्च केले आहेत. ते मटेरियल बरोबर नाही. मुंबईकरांचा पैसा महापालिकेने वाया घालवला आहे. याची श्वेतपत्रिका काढली पाहीजे. "
राज्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासह या कामांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देऊन रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल, मात्र निधीचा विनियोग योग्यप्रकारे न करणाऱ्या आणि गुणवत्ता न राखणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (30 सप्टेंबर) दिला.
'रस्त्यांसाठी ऑक्टोबरअखेर 50 टक्के निधी वितरित करणार'
अतिवृष्टी आणि पावसामुळे राज्यातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पिय तरतुदीपैकी 50 टक्के निधी ऑक्टोबरअखेर वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही मात्र रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व मुख्य अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दररोज आढावा घेऊन व्यक्तिशः लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
राज्यातील जास्त पावसाच्या भागात डांबराऐवजी कॉंक्रिटचे रस्ते तयार केल्यास दर्जेदार आणि खड्डेविरहीत रस्ते तयार होतील यादृष्टीने भविष्यात निर्णय घेण्याचे सूतोवाचही अजित पवार यांनी यावेळी केले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)