BMC सदस्यसंख्या जुन्याच पद्धतीने : उद्धव ठाकरेंना नवा दणका, शिंदे- फडणवीसांचा मोठा निर्णय

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या 236 सदस्यांऐवजी 227 सदस्य संख्या होईल. सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता तो आता बदल्यात आला आहे.

इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे ती खालील प्रमाणे :-3 लाखांपेक्षा अधिक व 6 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या 65 इतकी तर कमाल संख्या 85 इतकी असेल.

3 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 15 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

6 लाखांपेक्षा अधिक व 12 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या 85 इतकी तर कमाल संख्या 115 इतकी असेल.

6 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 20 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

12 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 40 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

24 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 50 हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

30 लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक 1 लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

12 लाखांपेक्षा अधिक व 24 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या 115 इतकी तर कमाल संख्या 151 इतकी असेल.

24 लाखांपेक्षा अधिक व 30 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या 151 इतकी तर कमाल संख्या 161 इतकी असेल.

30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या 161 इतकी तर कमाल संख्या 175 इतकी असेल.

सर्वांत मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पण, त्यातच 7 मार्च 2022 रोजी मुंबई महापालिकेची मुदत संपली आहे. पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे. त्याची 8 कारणं आहेत. ती तुम्ही इथं वाचू शकता.

शिवाय ओबीसी आरक्षणाचं भिजत घोंगडं कायम आहे. मग अशावेळी नेमक्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे.

मुंबई महापालिका निवडणूक कधी होणार आहे?

परिणामी देशातली सर्वांत मोठी आणि महत्त्वाची समजली जाणार्‍या मुंबई महापालिकेची निवडणूक लांबण्याची चिन्ह आहेत.

मुंबई महापालिकेच्या सुधारीत 236 प्रभागाच्या रचनेवर राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं आहे. निवडणूक आयोगानं मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आढावा बैठकसुद्धा घेतली आहे.

वार्डांच्या सीमांची प्रसिद्धी, त्यावर हरकती आणि सूचना मागवणे आणि सुनावणी देणे ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत 2 मार्चपर्यंत होती.

प्रभाग रचनेस मंजुरी

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना लिहीलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, "मुंबई महापालिकेच्या 2022 च्या निवडणुकीसाठी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार निवडणूक प्रभागाची लोकसंख्या, सदस्य संख्या दर्शवणारे सहपत्र अंतिम करून महापालिकेच्या प्रभाग रचनेस मंजुरी देण्यात आली आहे," त्याचबरोबर निवडणूक आयोगाने प्रभाग रचना मंजुरीनंतरचा कार्यक्रमही जाहीर केला होता.

1 फेब्रुवारीला निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राज्यपत्रात प्रसिद्ध करणे आणि त्याला प्रसिद्धी देणे.

1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत प्रारूप अधिसूचनेवर हरकती आणि सूचना मागवणे.

16 फेब्रुवारीला प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांचे विवरण पत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे.

त्या हरकती आणि सूचनांवर राज्य निवडणूक आयोगाने नेमलेल्या अधिकार्‍यामार्फत 26 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी घेणे.

सुनावणीनंतर संबंधित अधिकार्‍यांने केलेल्या शिफारसी नमूद करून 2 मार्चपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणे.

ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाची प्रतिक्षा?

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही कायम आहे. आता आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या असं कोर्टानं म्हटलंय. तर आरक्षणासहच निवडणुका झाल्या पाहिजेत अशी भूमिका विरोधीपक्ष भाजपने घेतली आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने एससी, एसटी आणि महिला प्रवर्गाचं आरक्षण राखून इतर जागा खुल्या केल्या आहेत.

एकूण प्रभाग - 236

खुला प्रवर्ग - 219

एससी - 15

एसटी - 2

महिला - 109

सध्याचं पक्षीय बलाबल किती आहे?

2017 पर्यंत मुंबई महापालिकेत 227 जागांवर निवडणूक होत होती. पण लोकसंख्येनुसार या जागा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

2017 च्या निवडणुकीच्या निकालानुसार मुंबई महापालिकेत शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष आहे त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्याच्या खालोखाल भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी शिवसेना-भाजपची महापालिकेत युती होती. ज्यानुसार मुंबई महापालिकेत युतीचं सरकार होतं म्हणून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आहे.

राज्यात जरी महाविकास आघाडी सरकार असलं तरी मुंबई महापालिकेत कॉंग्रेस हे विरोधी पक्ष म्हणूनच काम करत आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणूकीच्या निकालानुसार 227 जागांपैकी,

शिवसेना - 97

भाजप - 83

कॉंग्रेस - 29

राष्ट्रवादी कॉंग्रेस - 8

समाजवादी पक्ष - 6

मनसे - 1

एमआयएम - 2

इतर - 3

मुख्य स्पर्धा कोणामध्ये आहे?

मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्य स्पर्धा ही शिवसेना विरूद्ध भाजप अशी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर युती करण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेस स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.

पण महापालिकेत गेल्या दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या 93 तर भाजपच्या 82 जागा आहेत. राज्यातल्या सत्तेत शिवसेना भाजप युती तुटून महाविकास आघाडी उदयाला आली. यामुळे मुंबई महापालिका निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे.

शिवसेनेचा महापालिकेच्या सत्तेला छेद देण्याचं लक्ष्य असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतय. त्यामुळे निवडणूक जरी 6 प्रमुख पक्षांमधली असली तरी मुख्य स्पर्धा शिवसेना आणि भाजपमध्येच दिसेल.

आतापर्यंत कोणत्या आघाड्या झाल्या आहेत का?

आतापर्यंत कोणत्याही आघाड्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मुंबई महापालिकेत सत्तेत असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ही निवडणूक एकत्र लढविणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीच्या निमित्ताने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. प्रमुख विरोधी पक्ष भाजप असल्यामुळे तीनही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली होती. पण कॉंग्रेस महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं कॉंग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.

भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय. पण भाजप आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीची चर्चा होत आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)