You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गंगुबाई काठियावाडी आणि सूर्यवंशीसह हे '5' मोठे चित्रपट कधी रिलीज होणार?
- Author, सुप्रिया सोगले
- Role, बीबीसी
कोरोना आरोग्य संकटामुळे जवळपास गेल्या दोन वर्षांपासून भारतासह जगभरातील मनोरंजन उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता भारतात अनेक गोष्टी पूर्वपदावर येताना दिसत आहेत. अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठीही प्रयत्न सुरू झालेत.
हिंदी सिनेसृष्टीबाबत बोलायचं झाल्यास, सिनेमागृह बंद असल्याने सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. आता काही ठिकाणी सिनेमागृह सुरू होत आहेत. महाराष्ट्रातही 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरू होत आहेत.
यासंदर्भात अलीकडेच दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी, पेन सिनेमाचे प्रमुख जयंतीलाल गाडा आणि सिनेमागृह संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
सिनेसृष्टीसाठी राज्यातील सिनेमागृह सुरू होणं यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण 30 टक्के महसूल महाराष्ट्रातून येतो. म्हणूनच देशातील सिनेमा मनोरंजन उद्योगाच्या दृष्टीने महाराष्ट्र सर्वांत मोठं क्षेत्र मानलं जातं.
कोणत्याही सिनेमाचं यश आणि कमाई याचा अंदाज महाराष्ट्रात मिळालेल्या यशाच्या आधारे लावला जातो.
चित्रपटगृह दीर्घकाळापासून बंद असल्याने बॉलीवुडच्या अनेक सिनेमांचं प्रदर्शन प्रलंबित आहे. काही सिनेमांना प्रदर्शनासाठी नुकत्याच तारखा मिळाल्या आहेत.
आपण अशाच काही सिनेमांविषयी जाणून घेणार आहोत जे आगमी काळात प्रदर्शित होणार आहेत.
सूर्यवंशी
हिंदी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सुपरस्टार अक्षय कुमार यांचा 'सूर्यवंशी' सिनेमा जवळपास वर्षभरापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.
पोलिसांवर आधारित अॅक्शन ड्रामा असलेला हा रोहित शेट्टीचा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी अजय देवगणचा 'सिंघम' आणि रणवीर सिंगचा 'सिंबा' बऱ्यापैकी यशस्वी झाला होता.
'सूर्यवंशी' सिनेमाच्या घोषणेपासूनच त्याला ब्लॉकबस्टर मानलं जात आहे. कारण त्यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंग हे तीन स्टार पहिल्यांदाच स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. अभिनेत्री कतरिना कैफदेखील या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
गेल्या वर्षी 24 मार्च 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता परंतु लॉकडाऊन लागू झालं. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत असताना सिनेमा 30 एप्रिल 2021 रोजी रिलीज होणार असल्याचं जाहीर केलं. परंतु कोरोनाची दुसरी लाट आली आणि सिनेमाचं प्रदर्शन पुन्हा पुढे ढकलण्यात आलं.
अखेर राज्य सरकारने सिनेमागृह सुरू होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सूर्यवंशी आता दिवाळीत रिलीज होणार असल्याचं रोहित शेट्टींनी स्पष्ट केलं.
83
क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या पहिल्या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेल्या '83' सिनेमात रणवीर सिंग क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
कबीर खान दिग्दर्शित '83' सिनेमात दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तसंच ती या सिनेमाची निर्माती सुद्धा आहे.
पंकज त्रिपाठी, राज भसिन, साकिब सलीम, साहिल खतर, एमी विर्क आणि हार्डी संधू हे देखील या सिनेमात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसतील.
खरं तर हा सिनेमा गेल्यावर्षी 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार होता परंतु कोरोनामुळे प्रदर्शनाची तारीख 25 डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली.
नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एका प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि सिनेमा 4 जून 2021 ला रिलीज होणार असल्याचं सांगितलं. पण कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पाहता तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
आता महाराष्ट्रात चित्रपटगृह सुरू होण्याची घोषणा करण्यात आली असून, '83' च्या निर्मात्यांनी वर्षाअखेर नाताळच्या निमित्ताने सिनेमा रिलीज करणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सत्यमेव जयते 2
2018 मध्ये रिलीज झालेल्या 'सत्यमेव जयते' या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहम आणि मनोज वाजपयी एकत्र दिसले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 100 कोटींची कमाई केली होती.
या सिनेमाच्या यशानंतर 'सत्यमेव जयते 2' सिनेमाची घोषणा निर्मात्यांनी केली होती. या सिनेमात जॉन अब्राहमचा डबल रोल असणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दिव्या खोसला कुमार पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी हा सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.
बंटी और बबली 2
यशराज फिल्म स्टुडिओचा सिनेमा चित्रपटसृष्टीत मोठा मानला जातो. 2005 मध्ये आलेला राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या 'बंटी और बबली' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.
चित्रपटातील "कजरारे कजरारे" हे गाणं खूप लोकप्रिय झालं. आता 15 वर्षांनंतर 'बंटी और बबली 2' हा सिनेमा येत असून सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांची जोडी दिसणार आहे.
'गली बॉय' सिनेमात दिसलेला सिद्धांत चतुर्वेदी हा सुद्धा 'बंटी और बबली 2' या सिनेमात नायक म्हणून दिसणार असून शर्वरी वाघ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या वर्षी 26 जून 2020 रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमाचं शूटिंग कोरोना काळात पूर्ण होऊ शकलं नव्हतं. सप्टेंबर 2020 मध्ये सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून अद्याप रिलीजची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
यशराज स्टुडिओचे अनेक मोठे सिनेमे प्रदर्शनासाठी प्रतिक्षेत आहेत. यात अक्षय कुमारचा सिनेमा 'पृथ्वीराज', रणबीर कपूरचा 'शमशेर', रणवीर सिंगचा 'जयेश भाई' यांचा समावेश आहे.
आमचे सिनेमे चित्रपटगृहासाठी बनवले आहेत त्यामुळे ते सुरू झाल्यानंतर रिलीजच्या तारखा जाहीर केल्या जातील, असं यशराज स्टुडिओजने स्पष्ट केलं होतं.
'बंटी और बबली 2' 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होईल. तर इतर सिनेमे 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहेत.
गंगुबाई काठियावाडी
मनीषा कोईराला, ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबत काम केल्यानंतर संजय लीला भन्साळी आता आलिया भट्टसोबत गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा बनवत आहेत.
या सिनेमासाठी आलिया त्यांची पहिली पसंती नव्हती. राणी मुखर्जी आणि प्रियांका चोप्रा यांना सिनेमासाठी आधी विचारणा झाली पण त्यांनी नकार दिल्यानंतर हा सिनेमा आलियाकडे आला.
मुंबईचा रेडलाईट भाग समजल्या जाणाऱ्या कामाठीपुराच्या एका सत्यकथेवर हा सिनेमा आधारित आहे. यात अजय देवगण पाहुणा कलाकार असणार आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात चित्रपटाचं चित्रिकरण काही काळासाठी थांबवावं लागलं होतं. त्यावेळी चित्रपट 70 टक्के पूर्ण झाला होता.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये उर्वरित चित्रपटाचं चित्रीकरण पुन्हा सुरू झालं आणि जून 2021 मध्ये शूटिंग संपलं. त्यानंतर सिनेमा 30 जुलै 2021 रोजी प्रदर्शित करण्याचं ठरलं परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली.
दरम्यानच्या काळात हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार अशी चर्चा सुरू होती परंतु निर्माता पेन स्टुडिओजने निवेदन जारी करत ही बाब फेटाळली आहे. सिनेमा मोठ्या पडद्यासाठी तयार करण्यात आला आहे त्यामुळे तो सिनेमागृहातच प्रदर्शित होईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
आता मोठ्या ब्रेकनंतर सिनेमागृह पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे निर्मात्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)