कर्नाटकमध्ये 2 वर्षांच्या दलित मुलाच्या मंदिर प्रवेशामुळे वडिलांना 25 हजारांचा दंड

मंदिर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

"एका दलित लहानग्याच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर खराब होत नाही, घाण आपल्याच विचारात आहे."

कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्याचे डेप्युटी कमिशनर गावकऱ्यांना सांगत होते. दलित समाजातील दोन वर्षांच्या चिमुकल्याने मंदिरात प्रवेश केल्याने याच जिल्ह्यात गावकऱ्यांनी मुलाच्या वडिलांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

'चूक' वडिलांचीच होती ना... ते आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मंदिराच्या बाहेर उभे राहून प्रार्थना करत होते. तेवढ्यात त्यांचा मुलगा धावत मंदिरात गेला आणि सर्वांत महत्त्वाची 'चूक' होती त्यांचं दलित असणं...

मुलाचे वडील चंद्रू यांनी पत्रकारांना म्हटलं, "आम्ही तिथे प्रार्थना करत होतो, तेव्हा हलका पाऊस पडत होता. मी मुलाला लगेचच पकडलं होतं. पण 11 सप्टेंबरला एका सार्वजनिक बैठकीत गावातील प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं की, मी मंदिराच्या अभिषेक आणि शुद्धिकरणासाठी पैसे देणं गरजेचं आहे. मला एकट्याला बाजूला नेऊन सांगितलं की 25 ते 30 हजार रुपये मी द्यायला हवेत."

चंद्रू यांना भीती वाटत होती...

चंद्रू एवढी मोठी रक्कम भरु शकले नाहीत. त्यांनी आपल्या समाजातील लोकांशी चर्चा केली आणि कुश्तगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पण चंद्रू खूप घाबरले होते. त्यामुळेच कदाचित त्यांनी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केली नाही.

आपल्यासोबत हा प्रकार पुन्हा होऊ शकतो अशी भीती चंद्रू यांना वाटत होती.

कोप्पलचे डेप्युटी कमिशनर विकास किशोर सुलकर यांना जेव्हा ही घटना कळली तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना सुनावलं की, एका लहानग्याच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर खराब होत नाही, घाण आपल्याच विचारात आहे.

त्यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं की, मी गावकऱ्यांना ही गोष्ट ऐकवली. कारण गावात जाण्याआधी मी वाचलं होतं की, चंद्रूला मंदिर सफाईसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.

पाच जणांना अटक

डेप्युटी कमिशनरांनी सांगितलं, "पीडित कुटुंबाने अधिकृत तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. तरीही तालुक्याच्या समाज कल्याण पदाधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली. आम्ही या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्ती मंदिर समितीच्या सदस्य आहेत.

कोप्पलमधील मियापूर गावात 450 कुटुंब आहेत, त्यापैकी 20 टक्के दलित आहेत.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

कोप्पलचे पोलीस अधीक्षक टी. श्रीधर यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं की, "मियापूरमधले बाकी लोक हे वेगवेगळ्या समुदायातील आहेत. सर्वजण शेती करतात. सगळ्याच गावकऱ्यांचे विचार असे आहेत, असंही नाही. समाजातील अनेक लोकांनी दलित समुदायातील व्यक्तीवर झालेल्या कारवाईचा निषेध केला आहे. पण एक छोटा वर्ग असा आहे, ज्याच्या विचारसरणीतच समस्या आहे."

अशा घटना वारंवार का होतात?

कोप्पल जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वीच दलित तरुणांसोबत अशीच काहीशी घटना घडली होती. या तरुणांना केस कापायचे होते. या कारणावरुन त्यांना गावातून बहिष्कृत करण्यात आलं.

लिंगायत समुदायातील उच्च जातीचे लोकच केस कापू शकतात असं त्यांना सांगण्यात आलं.

मियापूरमध्येही ज्या लोकांनी चंद्रूला दंड ठोठावला आहे, ते लिंगायतच आहेत. मात्र ते लिंगायतांमधील गनिगा समाजातील आहेत.

डेप्युटी कमिशनर विकास किशोर सुलरकर सांगतात, "आम्ही जागरुकता अभियान चालवण्यासाठी काही गावांची निवड केली आहे. आम्ही याला आयईसी कॅम्पेन म्हणतो. म्हणजेच माहिती, शिक्षण आणि संवादासाठीची मोहिम. समाजातील सर्व वर्गांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरुक केलं जातं. त्यांना सांगितलं जातं की, तक्रार वेळेत नोंदवली तरच परिणाम दिसून येतो. इतर लोकांना सांगितलं जातं की, आपण जर एकविसाव्या शतकात राहत असू तर आपले विचारही बदलायला हवेत."

या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनानं ज्या 38 गावांची निवड केली आहे, त्यात मियापूरचा समावेश नाहीये.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)